मोबाईल हा शिक्षणासाठी अंतिम पर्याय नाही

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 17 ऑक्टोबर 2020

मोबाईल नाहीतर शिक्षण नाही हे धोरण अशा कमकुवत घटकांसाठी मारक ठरू शकते. यासाठी काणकोणमधील काही शैक्षणिक संस्थांनी पुढाकार घेऊन अशा मुलांना सहृदयी दात्याच्या दानाने विद्यार्थ्यांना नवीन मोबाईल घेऊन दिले आहेत. त्यामध्ये माशे येथील श्री निराकार शिक्षण संस्था, पैंगीण येथील श्री श्रद्धानंद ज्ञानप्रसारक मंडळ यांनी गरजू मुलांना मोबाईल देऊन त्यांची अडचण सोडवली आहे.

काणकोण- मोबाईल हा महामारी काळातील शिक्षणाचा अंतिम पर्याय नाहीच. त्यापेक्षा मुलांना कोरोना महामारी काळात विद्यादान करण्यासाठी अनेक मार्ग चोखाळता येणे शक्य आहे. समस्या निर्माण होतात त्याचवेळी त्यातून समस्यांचे निराकरण करणाऱ्या वाटा दृष्टीक्षेपात येतात. त्यासाठी शिक्षण प्रक्रियेत सहभागी असलेल्या पालक, शिक्षक, शैक्षणिक संस्थांचे चालक यांनी डोळसपणे या पर्यायांचा शोध घेऊन त्या पर्यायांची प्रभावीपणे कारवाई करणे गरजेचे आहे. त्यासाठी पालक शिक्षक संघाची भूमिका महत्वाची ठरते.

आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या विद्यार्थ्यांना या महामारीच्या काळात आणि आर्थिक बोजा न देता त्यावर तोडगा काढण्याची भूमिका सर्वांनीच घ्यायला हवी. मोबाईल नाहीतर शिक्षण नाही हे धोरण अशा कमकुवत घटकांसाठी मारक ठरू शकते. यासाठी काणकोणमधील काही शैक्षणिक संस्थांनी पुढाकार घेऊन अशा मुलांना सहृदयी दात्याच्या दानाने विद्यार्थ्यांना नवीन मोबाईल घेऊन दिले आहेत. त्यामध्ये माशे येथील श्री निराकार शिक्षण संस्था, पैंगीण येथील श्री श्रद्धानंद ज्ञानप्रसारक मंडळ यांनी गरजू मुलांना मोबाईल देऊन त्यांची अडचण सोडवली आहे. श्रद्धानंद ज्ञानप्रसारक मंडळाने "ब्राम्ही" ही मोबाईलचे संच असलेली लायब्ररी विद्यार्थ्यांसाठी निर्माण केली आहे.

दै.‘गोमन्तक’नेही यापूर्वी दात्यांनी पुरस्कृत केलेले मोबाईल देऊन गरजू विद्यार्थ्यांची गरज भागवली आहे. अजूनही समाजातून सहृदयता व दातृत्व गुण लयास गेला नाही याचेच ते द्योतक आहे. आमोणे येथील बलराम शिक्षण संस्थेच्या निवासी शाळेचे शिक्षक वावुर्ला व अन्य अंतर्गत भागात मोबाईलची कनेक्टिव्हिटी नाही. त्या भागात जाऊन त्या भागातील विद्यार्थ्यांसाठी सामाजिक दूरी व अन्य बंधने पाळून वर्ग घेत आहेत. त्यामुळे विद्यार्थी मोबाईल नाही किंवा कनेक्टिव्हिटी नाही म्हणून तणावमुक्त होत आहेत. ज्यांना कनेक्टिव्हिटी नाही त्यांना काणकोणमधील शिक्षक शैक्षणिक व अभ्यासाचे  साहित्य विद्यार्थ्याच्या घरपोच पाठवीत आहेत. काणकोणमधील खोतिगाव, गावडोंगरी या भागात अद्याप कनेक्टिव्हिटीची समस्या आहे. 

शाळा बंद असल्या तरी विद्यादान थांबले नाही

शिक्षण ही निरंतर प्रक्रिया आहे असे म्हणातात. मूल जन्माला आल्यापासून शेवटपर्यंत शिकत असते. कोरोना महामारीमुळे शिकणे व शिकवणे थांबलेले नाही. त्यासाठी वेगवेगळे पर्याय काणकोणमधील शैक्षणिक संस्था व शिक्षक चोखाळत आहेत. त्यांना पालकांनी साथ देणे गरजेचे आहे. मोबाईल हा शिक्षण घेण्याचा अंतिम पर्याय नाही. ज्यांना कनेक्टिव्हिटी नाही, त्यांना मोबाईल असून काहीच कामाचा नाही. त्यासाठी विद्यार्थी व पालकांनी सर्व भिस्त मोबाईलवर न ठेवता अन्य मार्ग शोधण्यासाठी शिक्षक व विद्यार्थ्यांना प्रवृत्त करण्याची गरज श्रद्धानंद विद्यालयाच्या पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष व्यंकटराय नाईक यांनी व्यक्त केली. सरकानेही आता ठोस भूमिका घेण्याची वेळ येऊन ठेपल्याचे त्यांनी सांगितले.

संबंधित बातम्या