पेट्रोल दरवाढीबाबत मोदींचा जागतिक विक्रम : गिरीश चोडणकर

dainik Gomantak
मंगळवार, 30 जून 2020

पेट्रोल व डिझेलवर संपूर्ण जगभरात भारताएवढा कर कुठल्याच देशात नाही. पेट्रोल दरवाढीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उच्चांक गाठून जागतिक विक्रम प्रस्थापित केला आहे, असा दावा गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केला. इंधन दरवाढीसंदर्भात उत्तर गोवा काँग्रेस समितीतर्फे म्हापसा येथील उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर आयोजित करण्यात आलेल्या सरकारविरोधातील निदर्शनावेळी ते बोलत होते.

म्हापसा
ते पुढे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्तेवर येण्यापूर्वी सांगितले होते, की काँग्रेसने महागाई वाढवली असल्याने ‘अच्छे दिन’ येण्यासाठी भाजपला सत्तेवर आणा, परंतु त्यांच्या नेतृत्वाखालील सरकारने जनतेच्या अपेक्षा धुळीस मिळवल्या आहेत. पेट्रोल व डिझेलचे दर मोदी सरकारने गेल्या काही दिवसांपासून भरमसाट वाढवले आहेत. संपूर्ण जगात पेट्रोल व डिझेल स्वस्त दरात मिळते. श्रीलंका, पाकिस्तान, बांगलादेश अशा शेजारील देशांच्या तुलनेत भारतात इंधनाचे दर खूपच महाग आहेत.
आज जगभरात सर्वाधिक करआकारणी भारतात आहे. जेव्हा पेट्रोल व डिझेलचे दर वाढतात, तेव्हा महागाई वाढत असते. त्यामुळे शेतकरी, रिक्षाचालक, टॅक्‍सीचालक, ट्रक व्यावसायिक, मध्यमवर्गीय पगारदार अशा सर्व समाजघटकांना त्याचा मोठा फटका बसणार आहे. या एकंदर घडामोडींतून भाजप सरकार असंवेदनशील आहे, हे प्रत्ययास येते. सध्या आर्थिक मंदी असल्याने लोकांना नोकऱ्या नाहीत. पर्यटन व्यवसायावरही मोठा परिणाम झाला आहे. अशा स्थितीत इंधनाच्या दरात सरकारने केलेली वाढ ही अर्थव्यवस्थेच्या बाबतीत धोक्‍याची घंटा आहे, असेही चोडणकर यांनी नमूद केले.
यावेळी उत्तर गोवा काँग्रेसचे अध्यक्ष विजय भिके, सरचिटणीस भोलानाथ घाडी, उपाध्यक्ष चंद्रन मांद्रेकर तसेच पक्षाचे स्थानिक नेते राजेंद्र कोरगावकर, सुधीर कांदोळकर, दत्ताराम पेडणेकर, राजन घाटे, सुप्रिया राठोड आदींची उपस्थिती होती.

संबंधित बातम्या