‘त्या’ प्रकल्पांमुळे मोले गाव होईल उद्‍ध्वस्त

विलास महाडिक
बुधवार, 19 ऑगस्ट 2020

मोले भागातून जाणाऱ्या दुहेरी रेल्वेमार्ग, उच्च दाबाची वीज वाहिनी व चारपदरी रस्त्यांच्या प्रकल्पामुळे पर्यावरणाचा ऱ्हास, पर्यटन व्यवसायावर परिणाम व शेती तसेच बागायतींवर अवलंबून असलेल्या सुमारे हजार कुटुंबांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याबरोबर गावही उद्‍ध्वस्त होऊ शकतो.

पणजी

मोले भागातून जाणाऱ्या दुहेरी रेल्वेमार्ग, उच्च दाबाची वीज वाहिनी व चारपदरी रस्त्यांच्या प्रकल्पामुळे पर्यावरणाचा ऱ्हास, पर्यटन व्यवसायावर परिणाम व शेती तसेच बागायतींवर अवलंबून असलेल्या सुमारे हजार कुटुंबांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याबरोबर गावही उद्‍ध्वस्त होऊ शकतो. या प्रकल्पामुळे कोणालाही त्रास होणार नाही अशा भागातून ते नेण्यात यावे अशी मागणी आज मोले ग्रामस्थांनी केली.
प्रोग्रेसिव्ह फ्रंट ऑफ गोवातर्फे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना पर्यावरणप्रेमी व इतिहास अभ्यासक प्रा. प्रजल साखरदांडे यांनी मत व्यक्त करताना म्हणाले की, मोले हा भाग जैव विविधतेचा असून तो भगवान महावीर वन्यजीव अभयारण्य तसेच राष्ट्रीय उद्यानामध्ये येतो. हे प्रकल्प या भागातून नेण्यासंदर्भात पर्यावरण आघात मूल्यांकन (ईआयए) केलेला अभ्यास योग्यरित्या करण्यात आला नाही तर हे प्रकल्प पैशांसाठी लादले जात आहेत. जैविक संप्रदाय नष्ट होणार असून त्याचा मोठा आघात गोव्यावर होणार आहे. त्यामुळे हे प्रकल्प रद्द व्हायला हवेत, असे ते म्हणाले. यावेळी प्रोग्रेसिव्ह फ्रंट ऑफ गोवाचे महेश म्हांबरे म्हणाले की, जे तीन प्रकल्प मोले भागातून नेताना खाण कंपन्यांचे हित जपण्यात आले आहे. एका कंपनीची खाण वाचविण्यासाठी हे प्रकल्प गावातून नेण्यात येत असल्याचा आरोप त्यांनी केला.
टुर ऑपरेटर ऑफ दूधसागर धबधबा ट्रिबेलो सौझा म्हणाले की, कुळे गावात दुहेरी रेल्वेमार्ग झाला तर पर्यटन स्थळ असलेला दूधसागर धबधबा धोक्यात येणार आहे. दरवर्षी या धबधब्याला सुमारे पाच लाख पर्यटक भेट देतात. त्यामुळे मोले व कुळे गावातील बाजार या पर्यटन स्थळावर अवलंबून आहे. सुमारे हजार कुटुंबांचा उदारनिर्वाह यावर चालतो. अगोदर या धबधब्याकडे घेऊन जाणाऱ्या ४८ जीप्स होत्या. येथील तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी या जीप्सची संख्या ४३१ झाली आहे. दूधसागर धबधबा ही नैसर्गिक भेट आहे त्यामुळे या भागातून दुहेरी रेल्वेमार्ग झाल्यास येथील लोकांवर उपासमारीची पाळी येणार आहे. या भागात मोठ्या प्रमाणात नव्यजीव जनावरांचा संहार असल्याने त्यांना धोका पोहचणार आहे. रानटी जनावरे ही वस्तीमध्ये पोहचून शेती व बागायतीची नासधूस करतील अशी भीती त्यांनी व्यक्त केली.
मोले येथील अभयारण्य व राष्ट्रीय उद्यानातून जाणाऱ्या या तीन प्रकल्पांबाबत केंद्र व राज्य सरकारने फेरअभ्यास करावा. सध्या एकेरी रेल्वेमार्ग आहे त्याचा वापर कोळसा वाहतुकीसाठी केला जात आहे. दुहेरी रेल्वेमार्ग झाल्यावर ही वाहतूक वाढणार असून कोळसा धूळ प्रदुषणाचा परिणाम येथील पर्यावरणावर होणार आहे, असे ज्युलिओ आगियार म्हणाले. मोले गावातील व पुणे येथे एरॉनॉटिकल अभियंता असलेले कृष्णा झोरे म्हणाले की, ही उच्च दाबाची वीज वाहिनी देवशेत येथून पळसकाटा या गावापासून काही अंतरावरून जाते. यासाठी सुमारे २७०० झाडे कापण्यात आली आहेत. ही ४०० केव्ही दाबाची वीज वाहिनीचे ‘स्पार्क’ अधुनमधून होतात त्यामुळे वनक्षेत्राला आग लागण्याचे प्रकार घडू शकतात व त्याची झळ जवळ असलेल्या गावांना बसण्याचा धोका आहे. हा भाग घनदाट असल्याने आगीचे लोण दूरपर्यंत पोहचू शकतात.
व्यवसायाने शेतकरी व बागायतदार असलेले पाळी - सुर्ला येथील गजानन सावईकर म्हणाले की, सरकार तरुणांना शेती व्यवसायाकडे वळण्याचे आवाहन करत आहे. मी वाणिज्य पदवीधर झाल्यानंतर शेती व्यवसाय करतो आहे. माझ्या जमिनीत कुळागर आहे त्यातील सुमारे एक हजार झाडे कापण्यासाठी त्यावर क्रमांक टाकण्यात आले आहे. ही वीज वाहिनी माझ्या जमिनीमधून जात आहे. प्रकल्पांना विरोध नाही मात्र हे प्रकल्प बागायती व शेती नष्ट होणार नाही याचे भान ठेवून त्याची आखणी करण्याची आवश्‍यकता होती असे मत त्यांनी व्यक्त केले.

संबंधित बातम्या