कोरोना रुग्णांमुळे मोलेवासीय भयभीत

Dharbandoda
Dharbandoda

धारबांदोडा

ग्रीन झोन’ असलेल्या गोव्याची ‘रेड झोन’कडे वाटचाल सुरू असून मोलेमार्गे काही कोरोनाग्रस्त रुग्ण गोव्यात आल्याचे स्पष्ट झाल्याने मोलेवासीयांनी धसका घेतला आहे. त्यामुळेच मोले पंचायतीने यासंबंधी तत्काळ बैठक घेऊन मोलेतील वाहतूक त्वरित बंद करण्यासंबंधीची मागणी करणारे एक निवेदन आज सरकारी यंत्रणेला सादर केले.
मोले चेकनाक्‍यावर नागरिक व पंच जमा झाल्याचे पाहून धारबांदोड्याचे मामलेदार अभीर हेदे यांनी चेकनाक्‍यावर जाऊन संबंधितांकडे बोलणी केली. यावेळी कुळेचे पोलिस निरीक्षक प्रज्योत फडते उपस्थित होते. यासंबंधीचे म्हणणे लेखी स्वरुपात द्या, आपण ते वरिष्ठांपर्यंत पोचवू असे सांगितल्यावर यासंबंधीचे एक निवेदन पंचायतीतर्फे धारबांदोडा उपजिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.
गोव्यात कोरोनाचे रुग्ण वाढले असून हे सर्व रुग्ण गोव्याबाहेरून आले असल्याने कर्नाटकहून मोले मार्गे येणारी वाहतूक त्वरित बंद करावी व फक्त जीवनावश्‍यक वस्तू घेऊन येणाऱ्या वाहनांनाच तपासून परवानगी द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी व पंचायत मंडळाने केली आहे.
गोव्यात कोरोनाचा प्रादूर्भाव होण्याचा धोका असलेली वाहतूक प्रशासकीय यंत्रणेने त्वरित बंद न केल्यास लोकच रस्त्यावर उतरतील, असा इशारा यावेळी देण्यात आला. यापूर्वी अनमोड घाटमार्गे वाहतूक मर्यादित होती, पण आता कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर वाहतूक वाढल्याने हा धोका संभवत असल्याचे येथील नागरिकांनी सांगितले.
अनमोड घाटमार्गे मोलेत शिरणारी बहुतेक वाहने मोले येथे थांबवली जात असून ट्रक तसेच इतर वाहनांचे चालक व अन्य प्रवासी बिनधास्तपणे इतस्ततः फिरत असतात. चहा घेताना हा चहाही सांडला जात असल्याने त्यामुळे धोका संभवत असल्याचे काही नागरिकांनी सांगितले.
मोलेतील ही धोकादायक वाहतूक बंद न केल्यास दुकानदार व ग्रामस्थच रस्त्यावर ठाण मांडतील, असा इशारा ग्रामस्थांतर्फे शरदचंद्र खांडेपारकर यांनी दिल्यावर ग्रामस्थांनी कायदा हातात घेऊ नये, असे मामलेदारांनी सांगितले. वरिष्ठांपर्यंत हा विषय पोचवून आवश्‍यक कार्यवाही केली जाईल, असे यावेळी सांगण्यात आले.
यावेळी मोले पंचायतीच्या सरपंच स्नेहलता नाईक, उपसरपंच सुशांत भगत, पंच रामकृष्ण गावकर, समर कदम, बाबू शेळके, तन्वी केरकर आदी उपस्थित होते.

गोवा गोवा गोवा गोवा गोवा गोवा गोवा गोवा  गोवा गोवा 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com