जहाजोद्योग क्षेत्रात ‘क्‍लस्‍टर’ची मुहूर्तमेढ!

गोमंतक वृत्तसेवा
सोमवार, 26 ऑक्टोबर 2020

वेर्णा औद्योगिक वसाहतीत विजयादशमीदिनी जहाजोद्योग क्षेत्रात क्रांती घडविणाऱ्या क्लस्टरची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. गोव्यात जहाजोद्योग शेकडो वर्षापासून सुरू आहे. राज्यात या उद्योग क्षेत्रातून मासळी, वस्रोद्योग तसेच इतर व्यवसायाला प्रोत्साहन देण्यासाठी गोवा सरकार प्रयत्नशील आहे.

मुरगाव : वेर्णा औद्योगिक वसाहतीत विजयादशमीदिनी जहाजोद्योग क्षेत्रात क्रांती घडविणाऱ्या क्लस्टरची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. गोव्यात जहाजोद्योग शेकडो वर्षापासून सुरू आहे. राज्यात या उद्योग क्षेत्रातून मासळी, वस्रोद्योग तसेच इतर व्यवसायाला प्रोत्साहन देण्यासाठी गोवा सरकार प्रयत्नशील आहे.

‘सागरमाला’ योजनेंतर्गत ‘ब्लू इकॉनॉमी’मध्ये अर्थव्यवस्था वाढविण्यावर भर देणार येईल. आत्मनिर्भर भारत योजनेद्वारे गोव्यात विविध उद्योगक्षेत्र निर्माण करणे गरजेचे आहे. वेर्णा येथील कोकण मरीटाईम क्लस्टरमध्ये निर्माण होणारे यंत्र देश-विदेशात निर्यात होणार आहे. त्यामुळे राज्यात मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती होईल, असे मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले. राष्ट्रीय रस्ता महामार्ग मंत्रालयातर्फे पेडणे - मोप येथे  बांधण्यात येणाऱ्या विमानतळाला राष्ट्रीय महामार्ग जोडण्याचे काम लवकरच हाती घेण्यात येतील, असेही त्‍यांनी सांगितले.

वेर्णा येथील औद्योगिक वसाहतीत भारतातील पहिल्या कोकण मरीटाईम क्लस्टर प्रकल्पाच्या पायाभरणी कार्यक्रमावेळी मुख्यमंत्री डॉ. सावंत बोलत होते. यावेळी त्‍यांच्‍यासमवेत उद्योगमंत्री विश्‍वजित राणे, कोकण मरीटाईम क्लस्टरचे चेअरमन सुरज दियालानी, गोवा औद्योगिक महामंडळाचे अध्यक्ष आमदार ग्लेन टिकलो, नुवेचे आमदार विल्फ्रेड डिसा, बार्ज मालक संघटनेचे अतुल जाधव, रमाकांत खडपकर, राजाराम नाईक, विष्णू बांदेकर यांच्‍यासह अन्‍य मान्‍यवर उपस्थित होते.

केंद्रीयमंत्री गडकरी यांच्‍याकडून शुभेच्छा
कोकण मरीटाईम क्लस्टर पायाभरणी सोहळ्यात केंद्रीय रस्ते, महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आपल्या भाषणात कोकण मरीटाईम क्लस्टरच्या संपूर्ण संचालक मंडळाला शुभेच्छा दिल्‍या. देशात जहाज क्षेत्रात या क्लस्टरमुळे क्रांती निर्माण होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी केंद्रीय जहाजोद्योग मंत्री मनसुख मांडवीया आणि डीजी शिपिंगचे संचालक अमिताभ कुमार यांची व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे भाषणे झाली. सोहळ्यास उपस्थित असलेले उद्योगमंत्री विश्‍वजित राणे यांनी ही याप्रसंगी उपस्‍थितांना संबोधित केले. 
सर्वप्रथम मुख्यमंत्री सावंत यांच्या हस्ते ‘कोकण मरीटाईम क्लस्टर’ आस्थापनाची पायाभरणी करण्यात आली. नंतर केंद्रीय राज्यमंत्री मनसुख मांडवीया यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मेरीटाइम क्लस्टरच्या फलकाचे अनावरण करण्यात आले. अध्यक्ष सूरज दियालानी यांनी  उपस्‍थितांचे आभार मानले. पायाभरणी सोहळ्यात गोवा बार्ज संघटनेचे पदाधिकारी, गोवा पोर्टचे अधिकारी यांच्‍यासह अन्‍य मान्‍यवर उपस्थित 
होते.

कोळशावरून विरोधकांचा विनाकारण धुरळा!
गोव्यात कोळसा आम्ही आणलेला नाही, आणि तो वाढवलेलाही नाही. राज्यात साधनसुविधा वाढण्यासाठी कोळसा नाही. विरोधकांकडून कोळशावरून जनमानसात चुकीचा संदेश पसरविला जात आहे. राज्याचा विकास विरोधकांच्या नजरेत खुपत आहे. त्‍यामुळेच त्यांना केवळ आंदोलने, आरोप, टीका करणे सोपे झाले आहे. राज्याच्या विकास हा औद्योगिक क्षेत्राबरोबर येथील साधनसुविधा वाढवण्यासाठी होत आहे. यामुळे याला कोळसा व्यवसायाचे कारण देणे एकदम चुकीचे आहे. विनाकारण टीका ही गोष्‍ट अयोग्‍य असल्याचे मुख्‍यमंत्री म्‍हणाले.

संबंधित बातम्या