Monsoon: गोव्यात तीन दिवस जोरदार पावसाची शक्यता
goa rain

Monsoon: गोव्यात तीन दिवस जोरदार पावसाची शक्यता

पणजी: गोवा(GOA) राज्यात 28 मे पासून पुढील तीन दिवस मोठ्या पावसाची(rains) शक्यता हवामान वेधशाळेने वर्तविली आहे. ‘तौक्ते’ वादळानंतर राज्यात दररोज पावसाची हजेरी लागत आहे. पण, मान्सून(Monsoon) आगमनाच्या पार्श्‍वभूमीवर काही दिवस मुसळधार पावसाची शक्यता आहे, असे हवामान वेधशाळेचे शास्त्रज्ञ एम. राहूल यांनी सांगितले. (Monsoon Heavy rains expected in Goa in next three days)

31 मे रोजी मान्सून केरळमध्ये पोहोचणार आहे. त्याशिवाय ओडिसामध्ये ‘यास’ वादळ घोंघावत आहे. त्याचा परिणाम म्हणून अरबी समुद्राच्या किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा तयार होऊन पावसाचा जोर वाढेल, असे राहूल म्हणाले. पुढचे काही दिवस अरबी समुद्रात कोणत्याही वादळाची शक्यता नाही. तरीही मासेमारांना दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. राज्यात ठरलेल्या वेळेतच मान्सून हजेरी लावणार आहे. आज पहाटे राज्यातील अनेक भागात पावसाच्या तुरळक सरींनी हजेरी लावली.

दरम्यान पश्‍चिम किनाऱ्यावरील ‘तौक्ते’नंतर काही दिवसांतच  पूर्व समुद्रात निर्माण झालेले ‘यास’ चक्रीवादळ काल सकाळी नऊच्या सुमारास पश्‍चिम बंगाल आणि ओडिशाच्या किनाऱ्याला धडकले. 130 ते 145 किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहत होते. वादळाच्या प्रभावामुळे ओडिशातील किनारी भागात अनेक भागात झाडे पडली. फांदी अंगावर पडून एकाचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. पण त्याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. बंगालमध्ये दोन ते चार मीटरपर्यंत लाटा उसळत असल्याने समुद्रानजीकच्‍या गावांमधील अनेक घरे व दुकानांमध्ये पाणी शिरले, वाहने वाहून गेली. या वादळाचा जोर दुपारनंतर कमी झाला.

अति तीव्र श्रेणीतील ‘यास’ काल ओडिशातील भद्रक जिल्हातील धरमा या उत्तर किनारपट्टीवर धडकले. राज्यातील सागरी भागात दुपारी दीडपर्यंत वादळाचा परिणाम दिसून आला. बालासोर जिल्ह्यातील बहनागा आणि रेमुना विभाग आणि भद्रकमधील धरमा व वासुदेवपूरमधील गावांमध्ये समुद्राचे पाणी शिरले, अशी माहिती ओडिशाचे विशेष मदत आयुक्त पी. के. जेना यांनी दिली. 

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com