मोप परिसरातील भुयारांत काय आहे? ऐतिहासिक पाश्वर्भूमी आहे का? गूढ कायम

प्रकाश तळवणेकर
शुक्रवार, 29 जानेवारी 2021

मोप विमानतळाचे काम गेल्या काही महिन्यांपासून जोमाने सुरू आहे. जेसीबी यंत्राद्वारे जमीन सपाटीकरणाचे काम सुरू हे काम सुरू असताना गेल्या डिसेंबर महिन्यापासून ठिकठिकाणी लहान मोठी भुयारे सापडण्यास सुरवात झाली. जानेवारीपर्यंत अशी भुयारे सापडत होती.

पेडणे - मोप विमानतळाचे काम गेल्या काही महिन्यांपासून जोमाने सुरू आहे. जेसीबी यंत्राद्वारे जमीन सपाटीकरणाचे काम सुरू हे काम सुरू असताना गेल्या डिसेंबर महिन्यापासून ठिकठिकाणी लहान मोठी भुयारे सापडण्यास सुरवात झाली. जानेवारीपर्यंत अशी भुयारे सापडत होती. विमानतळाचे काम करणाऱ्या कंपनीने हा प्रकार दडपून टाकण्याचा प्रयत्न केला. पण, वस्‍तुस्‍थिती ग्रामस्‍थांना कळली व ‘दैनिक गोमन्‍तक’ने भुयारांसंदर्भात छायाचित्रासह बातमी प्रसिद्ध केल्‍यावर सर्वत्र खळबळ उडाली. 

मोप परिसरातील भुयारांत काय आहे? ऐतिहासिक पाश्वर्भूमी आहे का? किंवा भुयाराच्या पोकळीमुळे उद्या विमाने धावपट्टीवर उतरल्‍यावर विमानाच्या वजनामुळे जमीन खचून एखादी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. याचा विचार करून  पुरातत्त्व खात्याने तसेच नागरी विमान वाहतूक खात्याने प्रत्यक्ष पहाणी करून सत्य लोकांसमोर आणणे गरजेचे आहे. 

भुयारांना ऐतिहासिक महत्त्‍व
मोप विमानतळ परिसरात वेगवेगळ्या बाजूंनी असलेली भुयारे पुढे एकत्र मिळाली नसावीत ना? गोव्‍यात पोर्तुगीज राजवट होती, त्या काळात परकीय राजवटीविरोधात लपून राहून काम करण्यासाठी किंवा पुढच्या योजना आखण्यासाठी या भुयारांचा उपयोग होत तर नव्हता ना? पोर्तुगीज राजवटीपूर्वी  काही काळ पेडणे तालुका सावंतवाडी संस्थानात होता. त्यापूर्वी अनेक राजवटी येऊन गेल्या असतील. त्यापैकी एखाद्या राजवटीत ही भुयारे खोदली नसावीत ना? विमानतळाच्या ह्या प्रकल्पाकडून काही अंतरावर हळर्ण किल्ला आहे. त्यामुळे कदाचित या किल्ल्याशीही या भुयारांचा संबंध असू शकतो. ही भुयारे मानवनिर्मिती की नैसर्गिक याचे संशोधन न झाल्याने काहीही माहिती नाही. पण, भुयारे नैसर्गिक असतील तर पोकळीमुळे उद्या विमान धावपट्टीवर उतरतेवेळी विमानाच्या भाराने जमीन खचून एखादी दुर्घटना घडू शकते. तसे झाले तर मोप बरोबर येथील सगळी गावे व पेडणे तालुक्याच्या नावाचीही बदनामी होइल, अशी भीती पेडणेवासीयांकडून व्‍यक्‍त केली जात 
आहे.

सत्य लोकांपुढे येणे आवश्यक
पुरातत्त्व खात्याने या भुयारांची तपासणी केली असती आणि यदा कदाचित इतिहासाच्या काही खाणाखुणा सापडल्या असत्या, तर एक नवा इतिहास किंवा एखाद्या माहित नसलेल्या संस्कृतीची महिती पुढे येऊ शकली असती. ही भुयारे विमानतळ क्षेत्रात असल्याने भूपृष्टावरून त्याची पातळी किती आहे. ती विमानांच्या वजनाचा भार पेलण्याची त्याची क्षमता आहे किंवा नाही याची पडताळणी आणि अभ्यास होणे गरजेचे आहे. विमानतळाचे कंत्राट घेतलेली कंपनी अशाच स्थितीत काम गडबडीत पुढे रेटू पाहत आहे. सरकारने याप्रकरणी हस्तक्षेप करणे गरजेचे आहे. पुरातत्व खाते राजधानी पणजीला आहे. त्‍याने तरी याप्रकरणी सरकारकडे पाठपुरावा करावा, अशी मागणी पेडणेवासीयांकडून केली जात 
आहे.

तीन मोठी भुयारे 
विमानतळाचे सपाटीकरण करताना वारखंड येथे एक, मोप, कासारवर्णे व चांदेल गाव अशा चार सीमा एकत्र मिळतात त्या ‘लिंगुड सर्यान’ (विमानतळाचे काम सुरू होण्यासाठी जिथे धनगर समाजाची गुरे व बकऱ्यांचे गोठे होते) या भागात दुसरे भुयार हे ‘नाण्याचे पाणी’ - वारखंड गावच्या बाजूने तर तिसरे तुळसकरवाडी - वारखंडच्या दिशेने ज्या भागाला या परिसरात ‘दुकुरलो गुणो’ या नावाने ओळखले जायचे. तुळसकरवाडीच्या बाजूने असलेले भुयाराचे तोंड हे सुमारे सात ते आठ फूट उंचीचे आहे. भुयाराच्या तोंडावरून जरा पुढे डाव्या व उजव्या अशा दोन बाजूंनी याच आकाराची भुयारे गेली आहेत. ह्या सगळ्या भुयारातून एका माणसाला सहजपणे चालत जाता येईल, असा आकार आहे. 

खचलेला डोंगर  
मोप विमानतळ प्रकल्पापासून  जेमतेम एक किलोमीटर अंतरावर असलेल्या उगवे गावातील आडवण नामक मोठा डोंगर चाळीस वर्षांपूर्वी खचला होता. एवढा मोठा डोंगर खचणे हे आश्‍चर्यकारक होते. तत्कालीन मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांनीही दुसऱ्या बाजूने जाऊन या डोंगराची पाहणी केली होती. खचलेल्या या डोंगरात सगळीकडे सतत वाहणाऱ्या पाण्यामुळे दलदल झाल्याने सुमारे पंधरा वर्षे शेतकऱ्यांना दुसऱ्या बाजूने आपल्या शेती काजू बागायतीत जावे लागत होते. अशाच प्रकारे विमानतळ क्षेत्रापासून जवळच्या अंतरावर कासारवर्णेच्या बाजूनेही डोंगर खचण्याची घटना घडलेली आहे. यामुळे भूगर्भ तज्‍ज्ञांद्वारे या सर्व भागांची तपासणी होणे आवश्यक आहे. 

Edited By - Prashant Patil

संबंधित बातम्या