Mopa International Airport Goa : मोपा विमानतळ नामांतराचा घोळ कुणाच्या फायद्याचा?

राज्यातील दुसऱ्या विमानतळाचे नामकरण ‘मोपा इंटरनॅशनल एअरपोर्ट’ असे करणे जास्त संयुक्तिक ठरणार नाही का? यामुळे विमानतळाच्या नामकरणावरून सुरू झालेल्या वादविवादाला कायमचा पूर्णविराम मिळेल.
Mopa International Airport | Goa Marathi News | Goa News
Mopa International Airport | Goa Marathi News | Goa NewsDainik Gomantak

Mopa International Airport Goa : सध्या गोव्यात नजीकच्या काळात सुरू होणाऱ्या मोपा गावातील आंतरराष्ट्रीय विमानतळाला कोणाचे नाव द्यावे, यावरून वाद-प्रतिवाद सुरू आहेत. सहसा आपल्या देशात कोणत्याही नव्या प्रकल्पाला राजकीय नेत्यांच्या नावाशिवाय दुसरे नाव सुचतच नाही. काँग्रेस जेव्हा सत्तेवर होती, तेव्हा गांधी-नेहरू घराण्याशिवाय अन्य कोणाची नावे पुढे येत नव्हती. तेव्हा विरोधी पक्षांकडून घराणेशाहीचा आरोप व्हायचा. पण आता सत्ताबदल होऊन भाजप सरकार आले व आता या प्रकल्पांना त्यांच्या नेत्यांचीच नावे पुढे येऊ लागली. आता घराणेशाहीचा आरोप काँग्रेस व अन्य विरोधी पक्षांकडून होतो, हाच काय तो फरक.

एखाद्या नव्या कोऱ्या प्रकल्पाला नाव देणे म्हणजे ‘नामकरण’ व एखाद्या प्रकल्पाचे प्रचलित नाव बदलून दुसरे नाव देणे म्हणजे ‘नामांतर’. सध्या या दोन्ही प्रकारांची सबंध देशात प्रचंड चलती आहे. त्यासाठी विविध गट आपली नित्याची कामे बाजूला सारून पूर्णपणे या नामकरणाला किंवा नामांतराला वाहून घेत असल्याचे चित्र आहे. अनेकदा या वादातून गंभीर दंगली होऊन देशाचे प्रचंड नुकसान झाल्याचा इतिहासही आहे.

यासंदर्भात मला महान नाटककार सर विलियम्स शेक्सपियर यांच्या ‘रोमियो ज्युलिएट’ या अजरामर अशा कलाकृतीतील एक वाक्य आठवतं; ते वाक्य म्हणजे, ‘नावात काय आहे? गुलाब या फुलाला अन्य कुठल्याही नावाने संबोधलं, तर त्याचा सुगंध तसाच राहणार आहे.’ त्याकाळी या वाक्याला एक संदर्भ होता. पण सध्याच्या युगात ‘नावालाच सर्वथा अर्थ आहे, नावाशिवाय काहीच नाही’ अशीच वल्गना राज्यकर्ते करतील, यात तीळमात्रही शंका नाही.

सध्या सबंध देशात गुलामगिरीच्या खुणा नष्ट करण्यासाठी अनेक शहरांची, विद्यापीठांची किंवा रस्त्यांची नामांतरे घडवण्याची जणू अहमहमिकाच लागली आहे. प्रमुख अशा शहरांमध्ये बॉम्बे (मुंबई) मद्रास (चेन्नई) कलकत्ता (कोलकाता) आणि बेंगलोर (बंगळुरू) अशा शहरांचा समावेश होतो. मुंबई शहरामध्ये ब्रिटिश राजवटीपासून प्रचलित असलेल्या नावात बदल करून नवीन नावे देण्यात आली आहेत. पण ही जुनी नावे लोकांच्या नसानसांत व मनात इतकी खोलवर रुजली आहेत की, बहुतेकांची या नवीन नावांचा स्वीकार करण्याची मानसिकताच दिसत नाही. याचा प्रत्यय मला एकदा मुंबईत आला. चर्चगेट स्टेशनबाहेर टॅक्सी पकडून मी त्या टॅक्सीचालकाला ‘सीएसटी’ला नेण्यास सांगितले. तो गोंधळलेला पाहून मी, ‘तुला ते स्टेशन माहीत नाही का’, अशी विचारणा केली. पण, नंतर जेव्हा मी ‘व्हीटी’ (व्हिक्टोरिया टर्मिनस) स्टेशनचा उल्लेख केला, तेव्हा त्याचा चेहरा उजळला आणि त्याने टॅक्सी थेट ‘सीएसटी’ला (छत्रपती शिवाजी टर्मिनस) नेली.

Mopa International Airport | Goa Marathi News | Goa News
Political Interference in IFFI : राजकीय हस्तक्षेपामुळे इफ्फीला ओहोटी लागतेय का?

आता गोव्याच्या बाबतीत बोलायचे झाल्यास नावांच्या संदर्भात इथे वेगळीच समस्या आहे. इथे गावांची, शहरांची नावे ही वेगवेगळ्या पंथानुसार किंवा लिपीनुसार बदलतात. त्यामुळे अनेकांचा त्याबाबत गोंधळ उडतो. हरमल गावाचा उल्लेख रोमन लिपीत ‘आराम्बॉल’ असा केला जातो. इतर ठळक अशी उदाहरणे द्यायची झाल्यास केळशी (कावेलोशिम) मुरगाव (मोर्मूगांव) मडगाव (मारगाव), डिचोली (बिचोलीम) अशी नावे समोर येतात. यासारख्या असंख्य गावाच्या नावांचा राजरोसपणे अपभ्रंश चाललेला पाहून मन विषण्ण होते. तेव्हा जोपर्यंत या गावांचा उल्लेख एकसारखा होत नाही, तोपर्यंत याला काहीच अर्थ असणार नाही.

शेवटी या नामकरणाबाबत काही स्वैर विचार मनाला शिवले. त्याचा ऊहापोह करण्याचा मोह आवरत नाही. काही वर्षांपूर्वी आपल्या राजकारण्यांना गोव्याच्या गुलामगिरीचा साक्षात्कार होऊन त्यांनी ‘वास्को’ या शहराचे नाव बदलून त्याचे ‘संभाजीनगर’ केले. सुरुवातीला काही लोकांनी ते नाव वापरायला सुरुवात केली खरी; पण अजूनपर्यंत या शहराची ओळख सरकार दरबारी किंवा जनमानसात ‘वास्को’ अशीच आहे.

दुसरा एक विचार मांडायचा मोह आवरत नाही. केवळ गांधी-नेहरू घराण्याच्या वारसदारांची नावे देण्याबाबत विरोधी पक्षांकडून प्रचंड टीका झाली. पण, 24 डिसेंबर 2015 रोजी ‘रावी’ या नदीवर पठाणकोट-काश्मीर येथे एका केबल स्टेड पुलाचे तत्कालीन संरक्षणमंत्री (दिवंगत) मनोहर पर्रीकर यांच्या हस्ते उदघाटन झाले. त्या पुलाचे नामकरण ‘अटल सेतू’ असे करण्यात आले. आश्चर्य म्हणजे, तीन वर्षांपूर्वी 5 फेब्रुवारी 2019 रोजी जेव्हा गोव्यात मांडवी नदीवर उभारलेल्या केबल स्टेड पुलाचे तत्कालीन मुख्यमंत्री (म्हणजे माजी संरक्षणमंत्री) मनोहर पर्रीकर यांच्याच हस्ते उदघाटन झाले, तेव्हा त्या पुलालाही ‘अटल सेतू’ हेच नाव देण्यात आले आणि दोन वेगळ्या पुलांना, ज्यांचे उदघाटन एकाच व्यक्तीच्या हातून झाले होते, त्यांना एकच नाव देण्याविषयी कोणीही ‘ब्र’ सुद्धा काढला नाही.

माझ्या मते, ज्याप्रमाणे दाबोळी येथील विमानतळाला ‘दाबोळी इंटरनॅशनल एअरपोर्ट’ म्हणून संबोधले जाते, त्याचप्रमाणे दुसऱ्या विमानतळाचे नामकरण ‘मोपा इंटरनॅशनल एअरपोर्ट’ असे करणे जास्त संयुक्तिक ठरणार नाही का? यामुळे विमानतळाच्या नामकरणावरून सुरू झालेल्या वादविवादाला कायमचा पूर्णविराम मिळेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com