मोप विमानतळासाठीचा रस्ता राष्ट्रीय महामार्ग करू नये

गोमंतक वृत्तसेवा
सोमवार, 25 जानेवारी 2021

मोप विमानतळासाठी नव्याने होऊ घातलेल्या मार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देण्यात येऊ नये, असा ठराव धारगळ ग्रामपंचायतीतर्फे पंचायत सदस्य प्रदीप नाईक यांनी पंचायत मंडळाच्या बैठकीत मांडला.

पेडणे: मोप विमानतळासाठी नव्याने होऊ घातलेल्या मार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देण्यात येऊ नये, असा ठराव धारगळ ग्रामपंचायतीतर्फे पंचायत सदस्य प्रदीप नाईक यांनी पंचायत मंडळाच्या बैठकीत मांडला. त्याला सरपंच सुनिता राऊळ यांनी अनुमोदन देवून सर्वानुमते ठराव संमत करण्यात आला.

प्रमोद साळगावकर यांनी अशा आशयाचे निवेदन धारगळ ग्रामपंचायतीला दिले होते. यासंदर्भात राष्ट्रीय महामार्ग 1956 च्या 3 अ उपकलम 1 च्या कायद्याअंतर्गत स्थानिक वृत्तपत्रात (31 डिसेंबर 2020) प्रसिध्द केलेली अधिसुचना मार्ग, वाहतूक मंत्रालयातर्फे प्रसिद्ध केलेली अधिसूचना रद्द करण्यात यावी. तसेच मोप आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे जाणाऱ्या रस्त्याची रुंदी जास्तीच जास्त 40 मीटर रुंदी ठेवण्यात यावी जी तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनीही सुचवली होती. या ठरावाच्या प्रती संबंधित अधिकारी व कार्यालयांना पाठविल्या आहेत. तसेच या ठरावाच्या प्रती मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री तथा पेडण्याचे आमदार बाबू आजगावकर यांना सादर करण्यात येण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.

संबंधित बातम्या