सुमारे २०० हून अधिक पोलिस कोरोनाग्रस्त 

विलास महाडिक
गुरुवार, 13 ऑगस्ट 2020

पोलिस उपमहानिरीक्षक परमादित्य यांना दोन दिवसांपासून ताप येत असल्याने त्यांनी आज कोविड चाचणी करून घेतली असता तो पोझिटीव्ह आली.

पणजी

राज्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असतानाच कोरोना योद्धे पोलिस कर्मचाऱ्यांचीही संख्या वाढत आहे. पोलिस कर्मचाऱ्यांपाठोपाठ वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही त्याची लागण झाली आहे. पोलिस मुख्यालयातील बहुतेक सर्व विभागात कोरोना बाधित कर्मचारी सापडले आहेत त्यामुळे भीतीचे वातारण कर्मचाऱ्यांमध्ये आहे. पोलिस उपमहानिरीक्षक परमादित्य यांना कोरोना बाधित झाल्याने त्यांचे कार्यालय सील करण्यात आले आहे. आतापर्यंत कोरोना योद्धे असलेले दोनशेहून अधिक पोलिस कोरोनाग्रस्त झाले आहेत. त्यातील काहीजण बरे होऊन कामावर परतले आहेत. 
मिळालेल्या माहितीनुसार पोलिस उपमहानिरीक्षक परमादित्य यांना दोन दिवसांपासून ताप येत असल्याने त्यांनी आज कोविड चाचणी करून घेतली असता तो पोझिटीव्ह आली. त्यामुळे त्यांच्या कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांचीही चाचणी केली गेली मात्र त्यांचा अहवाल नेगेटीव्ह आल्याने या कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. गेल्या काही दिवसांत काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कामानिमित्त भेट घेतली होती त्यांनीही कोविड चाचणी केली. त्यांचा अहवाल येणे बाकी आहे. पोलिस मुख्यलयात कोरोनाची लागण होऊ नये म्हणून सर्व सावधगिरी बाळगण्यात येत आहे मात्र कोरोनाचे दीड महिन्यापूर्वीच प्रवेश केला आहे. 
पोलिस मुख्यालयातील राज्य गुन्हे दस्तावेज विभाग, विशेष विभाग, मोटार वाहतूक विभाग, पणजी पोलिस स्थानक, विदेशमनविषयक 
विभागातील काही कर्मचारी हे कोरोना बाधित सापडले आहेत. त्यामुळे या मुख्यालयात काम करणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. खात्याचा प्रशासन व लेखा विभागही मुख्यालयात आहे. कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात सापडत आहेत त्या भागातील कर्मचाऱ्यांना ड्युटीवर नेहमी बोलावले जात आहे. या विभागात कर्मचाऱ्यांना बसण्याची व्यवस्थाही कमी पडत आहे. कर्मचारी एकमेकाच्या बाजूला खुर्च्यावर बसत असल्याने काम करणेही धोक्याचे बनले आहे. वरिष्ठ अधिकारी मात्र स्वतः सावधगिरी बाळगताना सामान्य कर्मचाऱ्यांना असलेल्या समस्या सोडविण्याकडे लक्ष देत नसल्याने काही कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी आहे. 

 

 

संबंधित बातम्या