गोव्याच्या अर्थकारणाचा कणा मुरगाव तालुका

प्रतिनिधी
रविवार, 13 सप्टेंबर 2020

दळणवळणाच्या अनेक सोयीसुविधा; कामधंद्यानिमित्त देशभरातील लोकांना घेतले सामावून

मुरगाव: गोव्याच्या अर्थकारणाचा कणा असलेल्या मुरगाव तालुक्यातील जनता सद्यस्थितीत विविध समस्यांच्या गर्तेत सापडली आहे. रोजगाराचा प्रश्न लोकांना मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे. त्यामुळे तालुक्यातील उत्साही वातावरण गढुळ झाले आहे.

मुरगाव, ता. १२ (प्रतिनिधी)ः गोव्याच्या अर्थकारणाचा कणा असलेल्या मुरगाव तालुक्यातील जनता सद्यस्थितीत विविध समस्यांच्या गर्तेत सापडली आहे. रोजगाराचा प्रश्न लोकांना मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे. त्यामुळे तालुक्यातील उत्साही वातावरण गढुळ झाले आहे.

देशातील प्रत्येक राज्यातील लोकांना सामावून घेणारा गोव्यातील एकमेव तालुका म्हणजे मुरगाव! आकाराने लहान असलेला मुरगाव तालुका लोकसंख्येच्या बाबतीत सर्वात मोठा तालुका म्हणून गणला जातो. राज्याच्या अर्थकारणाचा कणा म्हणून मुरगाव तालुक्याची शान आहे, पण, खाणबंदी आणि आता कोरोना महामारीमुळे मुरगाव तालुक्यातील अर्थकारण बिघडले आहे.

मुरगाव बंदर, आंतरराष्ट्रीय विमानतळ, रेल्वे स्टेशन, औद्योगिक वसाहत, झुआरी खत प्रकल्प, गोवा शिपयार्ड, इंधन टर्मिनल, मच्छिमारी जेटी, अशा अनेक प्रकारच्या वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी मुरगाव तालुक्यात आढळून येतात. अरबी समुद्र आणि झुआरी नदीच्या कुशीत मुरगाव तालुका वसलेला आहे. सर्वप्रकारच्या दळणवळणाच्या सोयीसुविधा याच तालुक्यात सापडतात. त्यामुळेच कामधंद्याच्या निमित्ताने देशभरातील लोक मुरगाव तालुक्यात वास्तव्यास आहेत. मिनी इंडिया म्हणून मुरगाव तालुक्याला ओळखले जाते.

मुरगाव बंदर या तालुक्यासाठी वरदान आहे. तथापि, खाण व्यवसाय ठप्प झाल्याने बंदरातील विविध प्रकारच्या व्यवसायावर गदा आली आहे. सध्या या बंदरात कोळसा आयात - निर्यात व्यवसाय तेजीत चालला आहे. पर्यटनाला वाव देण्याच्या उद्देशाने बंदरात क्रूझ टर्मिनल उभारला आहे. त्यामुळे व्यवसायवृध्दी होत होती, पण कोरोना महामारीमुळे हा व्यवसायही ठप्प झाला आहे.

मुरगाव तालुक्यातील सडा भागात भारतीय समुद्र विज्ञान केंद्र, बोगदा येथे शिपबिल्डिंग इन्स्टिट्यूट, झुआरीनगर येथे बिट्स पिलानी शैक्षणिक केंद्र आहे. आंतराष्ट्रीय विमानतळ दाबोळीत आहे. वास्को आणि उपासनगर येथे इंधन कंपन्यांचे टर्मिनल आहे. सांकवाळ आणि वेर्णा या दोन औद्योगिक वसाहती असल्याने मुरगाव तालुक्यात रोजगाराच्याही भरपूर संधी आहेत, पण कोरोना महामारीत सर्वाधिक बाधीत झालेल्या मुरगाव तालुक्यातील जनतेच्या आशा आकांक्षा फस्त झाल्या आहेत. अनेकांचा रोजगार गेला आहे. मिळकतीवर विपरीत परिणाम झाला आहे. यातून सावरण्यासाठी जो तो प्रयत्नांची शिकस्त करीत आहे.

मुरगाव बंदरापर्यंत जाण्यासाठी वेर्णा ते सडा पर्यंत चौपदरी महामार्ग गेल्या वीस वर्षांपासून उभारण्यात येत आहे, पण तो राजकीय हेवेदाव्यामुळे अजूनही अपूर्ण आहे.महामार्गाच्या आड येणारी घरे वाचविण्यासाठी राजकारण खेळले जात आहे.ह्याच कारणांमुळे प्रकल्प लांबणीवर पडला आहे.गांधीनगर ते तारीवाडा पर्यंत बांधण्यात येत असलेला उड्डाणपूल पैशांअभावी अर्धवट स्थितीत आहे. दरम्यान, पर्यटनवृद्धीसाठीसुद्धा मुरगाव तालुका महत्त्वाचा मानला जातो. या तालुक्यात असलेले समुद्र किनारे पर्यटकांना भुरळ पाडीत आहे. मुरगाव बंदरात असलेल्या क्रूझ टर्मिनलमुळे पर्यटनाला अधिक वाव मिळाला आहे. बायणा किनाऱ्यावरून फेरीबोटसेवा सुरू करून पर्यटनात भर घालण्यासाठी दृष्टी मरीन या कंपनीने बायणा समुद्रात फ्लोटिंग जेटी उभारून प्रकल्प सुरू केला, पण एकाच हंगामानंतर फेरीबोटसेवा बंद करण्यात आली. 

या प्रकल्पाचे उद्‌घाटन केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी केले होते. या तालुक्यातील राजकारण चार विधानसभा मतदारसंघ, दोन जिल्हा पंचायत मतदार संघ, दहा पंचायती आणि एक पालिका यात विभागले आहे. सध्या तालुक्यावर भारतीय जनता पार्टीचे वर्चस्व आहे, पण स्थानिक स्वराज्य संस्था असलेल्या पंचायत आणि पालिका राजकारणात पक्षीय राजकारणाऐवजी मंत्री - आमदारांच्या गटाला महत्व देऊन राजकारण खेळले जात आहे.

क्रीडा विकास प्रकल्पाबाबत सरकारची उदासीनता
क्रीडा क्षेत्रातही मुरगाव तालुका सदैव आघाडीवर राहिला आहे. गोव्याचा राजा खेळ असलेल्या फुटबॉल खेळात तालुक्यातील अनेक फुटबॉलपटूंनी देशाचे प्रतिनिधित्व करून आंतरराष्ट्रीय मानांकन मिळविलेले आहे. क्रिकेट खेळातही मुरगाव तालुक्याने राज्यासाठी सरस खेळाडू दिलेले आहेत. क्रिकेट खेळाची पंढरी म्हणून मुरगाव तालुक्यातील वास्को शहराकडे पाहिले जायचे.गोव्यात पहिला रणजी सामना वास्कोतच खेळला गेला. यू एस ओपन स्क्वॉश स्पर्धा जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू बनलेला यश फडते हाही मुरगाव तालुक्यातील आहे. आंतराष्ट्रीय ग्रॅन्डमास्टर विश्वनाथ आनंद यांनी आपल्या आयुष्यातील पहिली राष्ट्रीय बुद्विबळ स्पर्धा गोव्यात वास्को येथे जिंकली होती. वास्को स्पोट्स क्लबची रिव्हर मेराथॉन स्पर्धा जागतिक स्तरावर पोचली आहे. या काही घडामोडीमुळे क्रीडा क्षेत्रातही  मुरगाव तालुका आघाडीवर राहिलेला आहे. मात्र क्रीडा विकास प्रकल्प थाटण्याच्या बाबतीत सरकारची उदासीनता दिसून येते. विमानतळ रस्त्यावरील चिखली येथील सरकारी मैदान अद्याप पूर्ण होत नाही. तेथे बांधण्यात येणाऱ्या स्क्वॉश कोर्टचे काम संथगतीने चालले आहे.

गोवा शिपयार्ड एक भूषण
मुरगाव तालुक्यातील वास्को शहरात असलेले गोवा शिपयार्ड एक भूषण आहे. या शिपयार्डमधून संरक्षण विभागाला अत्याधुनिक गस्ती नौका व अन्य आवश्यक जहाजे बांधली जात आहेत. सार्वजनिक क्षेत्रातील देशातील एक आघाडीचे शिपयार्ड म्हणून गोवा शिपयार्ड गणले जात आहे.

राज्यातील एकमेव खत प्रकल्प
सांकवाळ औद्योगिक वसाहत परिसरात झुआरीनगर येथे असलेला खत प्रकल्प हा राज्यातील एकमेव खत प्रकल्प आहे. पन्नास वर्षांपूर्वी उभारण्यात आलेल्या या प्रकल्पामुळे राज्याच्या अर्थकारणाला बळकटी मिळत आहे. या एका वैशिष्ट्यपूर्ण प्रकल्पामुळे मुरगाव तालुक्यात झुआरीनगर या गावाचा जन्म झाला.तेथेच गोव्यातील सर्वात मोठी बिगरगोमंतकीयांची झोपडपट्टी आहे.

नवीन जेटी उभारण्याची गरज
या तालुक्यातील वास्को शहरात असलेली मच्छिमारी जेटी गोव्याच्या अर्थकारणाला पोषक आहे. मच्छिमारी ट्रॉलर्ससाठी सर्व सोयीसुविधा असलेली १०० कोटी रुपये खर्च करून नवीन जेटी उभारण्याची घोषणा करून प्रकल्पाचा शिलान्यास कार्यक्रमसुद्धा चार वर्षांपूर्वी उरकला, पण आजपावेतो प्रकल्प उभारण्याच्या कामाला प्रारंभ करण्यात आलेला नाही. त्यामुळे मच्छिमारी लोकांना सध्याच्या जेटीवर अनेक यातना भोगून व्यवसाय करावा लागत आहे.

संबंधित बातम्या