मुरगाव नगर पालिकेची वेतन, अनुदानासाठी सरकारकडे मागणी

प्रतिनिधी
मंगळवार, 18 ऑगस्ट 2020

ऑगष्ट महिन्याचे वेतन ३१ ऑगस्टपर्यंत न मिळाल्यास ३ सप्टेंबरपासून पुन्हा संपावर जाण्याचा इशारा मुरगाव पालिकेच्या कामगारांनी दिल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्याधिकारी अरविंद बुगडे यांनी सरकारकडे एक कोटी रूपयांच्या वेतन अनुदानाची मागणी केली आहे

मुरगाव: ऑगष्ट महिन्याचे वेतन ३१ ऑगस्टपर्यंत न मिळाल्यास ३ सप्टेंबरपासून पुन्हा संपावर जाण्याचा इशारा मुरगाव पालिकेच्या कामगारांनी दिल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्याधिकारी अरविंद बुगडे यांनी सरकारकडे एक कोटी रूपयांच्या वेतन अनुदानाची मागणी केली आहे.तसे अधिकृत पत्र पालिका संचालकांना पाठविण्यात आले आहे.

जुलै महिन्याचे वेतन कामगारांनी संप पुकारल्याने ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात दिले. मात्र निवृत्त कर्मचाऱ्यांचे वेतन आजपर्यंत दिले नाही. गणेशोत्सवामुळे वेतन लवकर मिळणे आवश्यक होते, पण पालिकेच्या तिजोरीत खडखडाट असल्याने तसेच गेल्याच आठवड्यात वेतन मिळाल्याने ऑगस्ट महिन्याचे वेतन ३१ ऑगस्ट पर्यंत दिले तरी चालेल असा समजूतदारपणा कामगारांनी दाखवून पालिकेची अडचण समजून घेतली आहे. तरीही ३१ ऑगस्टला वेतन मिळाले नाही तर ३ सप्टेंबर पासून संपावर जाण्याचा इशारा देण्यात आला आहे.त्यामुळे पालिका अधिकाऱ्यांनी वेतनाची तरतूद करण्यासाठी सरकारकडे एक कोटी रुपयांच्या वेतन अनुदानाची मागणी केली आहे. पालिकेच्या कर्मचाऱ्यांना जसे वेतन मिळाले नाही. तसेच नगरसेवकांना दरमहा मिळणारे मानधन अद्याप मिळाले नाही. 

पालिकेच्या बॅंक खात्यात २५ नगरसेवकांना देण्यात येणारे मानधनाची रक्कम नसल्याने नगरसेवकांना फक्त धनादेश देऊन खात्यात रक्कम जमा झाल्यावर धनादेश वटवावा असे सांगण्यात आले आहे. त्यामुळे नगरसेवक पालिकेने जुलै महिन्याचा दिलेल्या मानधनाचा धनादेश खिशात घालून गेल्या काही दिवसांपासून फिरत आहेत पण, तिजोरीत पैसेच नसल्याने नगरसेवकही हक्काच्या मानधनासाठी लटकले आहेत. गणेशोत्सव चार दिवसांवर येऊन ठेपल्याने मानधन तत्पूर्वी मिळावे, असे नगरसेवकांचे म्हणणे आहे. याविषयी नगराध्यक्ष राऊत यांना विचारले असता नगरसेवकांना धनादेश दिले आहे पण बॅंकेत वटविण्यासाठी थोडे दिवस थांबा, असे कळविल्याचे राऊत यांनी सांगितले.

संबंधित बातम्या