गहाणवट ठेवलेले दागिने हातून निसटताहेत

वार्ताहर
शुक्रवार, 11 सप्टेंबर 2020

खाणभागासह ग्रामीण भागातील कर्जदार हवालदिल, कर्जफेडीसाठी तगादा, सरकारने लक्ष

पाळी: बंद खाणींमुळे खाण अवलंबित अडचणीत आले असतानाच आता कोरोनाच्या महामारीमुळे लॉकडाऊन झाल्यामुळे गरीब लोक अधिकच अडचणीत आले आहेत. रोजगार हिरावला गेल्याने जगण्यासाठी आणि नव्याने व्यवसाय सुरू करण्यासाठी घरातील सोने कर्ज देणाऱ्या वित्तसंस्था, बँकांत, पतसंस्थात आदी ठिकाणी गहाणवट ठेवले असले तरी कर्ज फेडून हे सोने परत मिळवणे सध्या कठीण बनत चालले आहे. खाण व्यवसाय पुन्हा सुरू होणार की नाही, याबाबत शाश्‍वती नाही, कोरोना महामारीमुळे व्यवसाय डबघाईला आला आहे.

आणि यापूर्वी कर्जासाठी तारण ठेवलेले सोने पैसे फेडा आणि सोने न्या म्हणून बँका व वित्त आणि पतसंस्थांकडून तगादा लावला जात असल्याने गरजूंच्या अडचणीत भरच पडली आहे. विशेष म्हणजे राज्यात कार्यरत सोने गहाणवट ठेवून कर्ज देणाऱ्या वित्तसंस्थांच्या घशात बहुतांश सोने गेले आहे, त्यामुळे झक मारली आणि गरज केली, असा प्रकार गरजवंतांच्याबाबतीत ठरला आहे. 

गेल्या वर्षी सोने तारण ठेवून कर्ज देणाऱ्या वित्तसंस्था व बँकांनी जप्तीसाठी कर्जदारांची यादी जाहीर केली होती, त्यात सत्तर टक्के कर्जदार हे खाण भागातील असल्याचे स्पष्ट झाले आहे. सत्तर टक्के खाण भागातील लोकांबरोबरच अन्य ग्रामीण भागातील गरजूंची नावेही या यादीत असून सोने तारण ठेवून कर्ज घेतल्यावर व्याजाच्या चक्रात अडकत असल्याने कर्जदार त्यातून मुक्त होऊ शकत नसल्याचेही काही कर्जदारांनी सांगितले. व्याजाच्या चक्रात भरडले गेल्याने पै पैसा साठवून सोन्याचे दागिने बनवले पण या वित्त संस्था व बँकांच्या घशात घातल्याच्या कडवट प्रतिक्रियाही या कर्जदारांनी व्यक्त केला आहे. काही सुदैवी कर्जदारांनी वेळीच पैसे फेडून सोने नेल्याने ते बचावले आहेत, मात्र हा टक्का नगण्य असून बहुतांश जण कर्जाच्या फेऱ्यात अडकत असल्याने आयुष्यभराची पुंजी बँका व वित्तसंस्थानी हिरावली असल्याचेही या लोकांचे मत आहे. 

सध्या बँका व वित्त आणि पतसंस्थांकडून कर्जबाजारी लोकांना कर्जाची परतफेड करण्यासाठी तगादा लावला जात आहे. 

खिशात पैसाच नाही, तर कर्ज फेडायचे कसे असा सवाल लोकांकडून करण्यात येत आहे. खाण भागातील लोक तर हवालदिल झाले असून मागच्या काही महिन्यात खनिज मालाची वाहतूक करण्यात आली, त्यासाठी मोठी रक्कम खर्च करून वाहने तयार केली, पण अपेक्षित व्यवसाय मिळाला नाही. 

ही वाहने तयार करण्यासाठी कर्ज घेतले गेले, पण आता ते फेडण्यासाठी पुरेसा पैसाही नाही, असे सांगण्यात आले. त्यातच बहुतांश वाहने तशीच पडून आहेत. खाणींचा व्यवसाय व्यवस्थित सुरू होईल, म्हणून बरेच लोक थांबले असल्याने त्यांची वाहने गंजत चालली आहे. त्यामुळे इकडे आड तर तिकडे विहिर अशी स्थिती असून खाण भागाबरोबरच डिचोली आणि फोंडा तालुक्यातील ग्रामीण भागातील लोकांचा लॉकडाऊन काळात व्यवसायच हिरावला गेल्याने लोक हैराण झाले आहेत. 

सुवर्ण कर्ज देणाऱ्या संस्थांकडून आमिषे!
राज्यात कार्यरत सुवर्ण कर्ज देणाऱ्या वित्तसंस्थांकडून गरजवंताला मोठी आमिषे दाखवली जात आहेत. पाच मिनिटात कर्ज मंजूर करून देतो, व्याजाचा दर एकदम कमी असून किमान कागदोपत्री सोपस्काराने कर्ज लगेच देतो, असे सांगून कर्जदारांना मोठी आमिषे दाखवली जातात. गरजवंतही अशा आमिषांना फशी पडत असून एकदा कर्ज काढल्यावर मग व्याजाच्या चक्रात हे लोक अडकत आहेत. व्याजाचे नूतनीकरण करायचे आहे, म्हणून दर तीन ते चार महिन्यांनी व्याजाचे पैसे वाढवले जात असतात, कर्जदार बिचारा अंधारात असतो, मात्र व्याजाची रक्कम पाहिल्यावर भोवळच येण्याची बाकी असते, अशा प्रतिक्रिया काही कर्जदारांनी दिल्या. हा प्रकार म्हणजे दुष्काळात तेरावा महिना असा प्रकार कर्जदारांच्याबाबतीत झाला आहे. 

संबंधित बातम्या