नव्या काळाप्रमाणे ‘आई’ बदलतेय!

प्रतिभा कारंजकर
बुधवार, 12 ऑगस्ट 2020

पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये तिला चाकोरीबद्ध जीवन जगावं लागत होतं. पण आताची आई स्वत:ला अपडेट ठेवत मुलांना त्यांच्या प्रश्नांमध्ये मार्गदर्शन करू शकते. आता तर ऑनलाईन शिक्षणाची मुहुर्तमेढ रोवली गेलीय, त्यासाठी तिला आधी त्याची माहिती असायला हवी. तरच आपले मूल काय शिकते, हे तिला कळू शकेल. आताची आई ही आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र आहे.

पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये तिला चाकोरीबद्ध जीवन जगावं लागत होतं. पण आताची आई स्वत:ला अपडेट ठेवत मुलांना त्यांच्या प्रश्नांमध्ये मार्गदर्शन करू शकते. आता तर ऑनलाईन शिक्षणाची मुहुर्तमेढ रोवली गेलीय, त्यासाठी तिला आधी त्याची माहिती असायला हवी. तरच आपले मूल काय शिकते, हे तिला कळू शकेल. आताची आई ही आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र आहे.

‘आई’ या शब्दा बरोबरच प्रेम, जिव्हाळा, ममता, वात्सल्य, स्नेह या भावना जोडल्या गेल्या आहेत, पण आता त्यात भर पडलीय ती शक्तीरूपी असण्याची, कारण पूर्वीसारखी ती आता अबला राहिली नाही, ती एक आत्मनिर्भर सबला झाली आहे. आपल्याच घरातल्या स्त्रियांचा विचार केला, तर आज्जी, आई, आत्या, काकू, आणि सून, मुलगी, नात या सर्वांच्या जीवन शैलीत किती तरी बदल होत गेलेले दिसतात.

नव्या काळाप्रमाणे त्यांच्या जबाबदाऱ्या, कर्तव्यही बदलत गेली. आज्जीचा काळ म्हणजे बहुतेक स्त्रिया अल्पशिक्षित. रांधा, वाढा, उष्ठी काढा एव्हढेच तिचे काम आणि स्वयंपाकघर ते अंगण इतकच तिचं विश्व, मुलांचं संगोपन त्यांचं खाणं, पिणं सांभाळणं इतकच करावं लागे, आईच्या काळात स्त्रिया शिकून नोकरी करायचं धाडस करू लागलेल्या, घराबाहेर पडू लागल्या चार पैसे त्यांच्या हाती खेळू लागले, पण आता घरची आणि बाहेरची अशा दोन्ही आघाड्यांवरून चालण्याची कसरत तिला करावी लागत होती. तरी मुलांकडे दुर्लक्ष होऊ नये, यासाठी ती जिवाचा आटापिटा करायची, मुलांना आईविना काही काळ राहायची सवय झालेली,  माझी एक मैत्रीण नेहमी म्हणायची मी नोकरी करणार नाही, कारण मी लहान असल्यापासून शाळेतून घरी आल्यावर किंवा शाळेत जाताना आई घरीच नसे. 

आईने करून ठेवलेलं थंडगार जेवण जेवावं लागे. माझ्या मुलांना तरी माझ्यासारखं असं वाटू नये. आताचा काळ मात्र जास्तीत जास्त मुलींचा कल हा शिकून नोकरी करून स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा असल्याने आया, सून असो की मुलगी दोघांनाही सपोर्ट करताना दिसतात. 

आजकालच्या मुली शिकून चार आकडी पगार आणून देत, घराची घडी नीट बसवायला मदतच करतात. हे आयांना आणि सासवांना ही ठाऊक झाले आहे, अशा वेळेला तिला आपल्या आधाराची गरज आहे, हे त्यांना जाणवू लागले आहे. थकली असेल बाहेरचं काम करून तिला करूदे आराम असा तिच्या बाजूने विचार करू लागल्या आहेत. तिच्यावरची घरची जबाबदारी थोडी वाटून घेतली, तर बिघडलं कुठं असा समजूतदारपणा दाखवू लागल्या आहेत. पूर्वी मुलीच्या घरचं पाणी पण वर्ज्य मानणारी आई आता मुलीच्या सोयीसाठी तिच्या घरी राहताना दिसते. नाती केवळ रक्तसंबंधावर टिकत नाहीत, ती प्रयत्नपूर्वक टिकवावी लागतात. आई मुलीचं नातं असुदे किंवा सासू सुनेचं! एकमेकींना समजून घेत एकमेकांचा आधार बनत तयार झालं तर ते टिकून राहतं. तसे एकमेकांमध्ये ताणेबाणे, कुरबुरी असायच्याच. दोन पिढीत विचारांची तफावत असतेच. तरी ते नाते एका अतूट धाग्यांनी बांधलेले असते. त्याला अनेक पदर असतात. 

पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये तिला चाकोरीबद्ध जीवन जगावं लागत होतं. पण आताची आई स्वत:ला अपडेट ठेवत मुलांना त्यांच्या प्रश्नांमध्ये मार्गदर्शन करू शकते. आता तर ऑनलाईन शिक्षणाची मुहुर्तमेढ रोवली गेलीय, त्यासाठी तिला आधी त्याची माहिती असायला हवी. तरच आपले मूल काय शिकते, हे तिला कळू शकेल. आताची आई ही आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र आहे, ती स्वतंत्र विचार करू शकते आणि निर्णय घेऊ शकते. तिच्या गुणांना प्रोत्साहन मिळाले, तर ती स्वत:ला सिद्ध करून दाखवू शकते. आपल्या मुलांनी सजग आदर्श नागरिक बनावं म्हणून तिची धडपड असते, अर्थार्जना बरोबरच घरची आघाडी सांभाळते आहे. तिची केशभूषा वेशभूषा आधुनिक तिला सोयीची वाटेल अशी तिने अंगीकारली  आहे,  पण अंतर्यामी आईचे हृदय मात्र तेच आहे. स्वत:ला विसरून मुलांना घडवणारी, त्यांच्यावर संस्कार करणारी आई सगळीकडे सारखीच असते. 

‘मूल आणि संकट’ यामध्ये नेहमीच आई उभी असते. आपल्या मुलाच्या रक्षणासाठी. अंगभर साडी आणि कपाळी टिळा लावणाऱ्या आईच्या जागी आता जीन,  शर्ट घातलेली आई दिसू लागलीय, पदराची जागा तिच्या ओढणीने किंवा स्ट्रोलने घेतलीय तिच्या बाह्य रूपात बदल झाले असले, तरी मुलांविषयीची तिची सजगता, तिची ममता त्रिकालाबाधित आहे. वयाच्या प्रत्येक टप्प्यावर मुलांना मार्गदर्शन करणारी, त्यांना सल्ला देणारी शिक्षित आई आता सर्वत्र दिसत आहे. काळ बदलतोय तसे तिचे विचार जास्त  बहुश्रुत आणि परिपक्व होत आहेत, तिच्या कार्यकक्षा रुंदावत आहेत. मुलांचा अभ्यास, त्यांच्या प्रोजेक्टमध्ये त्यांना मदत करणं, हे तिला जमू लागलय. आता इंटरनेट, मोबाईलच्या जमान्यात तिच्यावर जास्त जबाबदारी येऊन पडली आहे,  मुलांना वळण लावणं त्यांना नको त्या गोष्टींपासून दूर ठेवणं गरजेचं झालं आहे, हेही तिला करावं लागतं,  सध्याचं युग हे स्पर्धेचं असल्याने आपली मुले कुठे मागे पडू नयेत म्हणून त्यांची सर्वतोपरी काळजी घेणं, करियर च्या जीवघेण्या स्पर्धेत त्यांना मानसिक आधार देणं, आजूबाजूच्या गोष्टींचं मुलांना भान करून देणं हे गरजेचे झाले आहे. सध्या भौतिक सुखं इतकी वाढली आहेत, की त्यामुळे मुले आत्ममग्न राहू लागलीत. बऱ्यावाईटांची  जाणीव त्यांना करून देत, कुटुंबाच्या छताखाली त्यांना आधार देत, सुरक्षिततेची भावना त्यांच्या मनात निर्माण करणं हे एक आईच करू शकते. मुलांना त्यासाठी शेयरिंग पासून केयरिंग पर्यन्त शिकवलं पाहिजे. तिला तिच्या स्वत:च्या नोकरीचा व्याप असतोच शिवाय घरचा, मुलांचा विचार करावा लागतो. मुलांची मैत्रीण होऊन त्यांच्या सुखदुःखात भागीदार व्हावं लागतं. एखादीच्या नशिबी जर ‘विशेष’ मूल असेल तर मग तिची तारांबळ बघायलाच नको. पण तरीही ती सारे मनापासून करत आपल्या कुटुंबाला सावरण्याचा प्रयत्न करताना दिसते. संसारात दुर्दैवाने पतीची साथ अर्धवट सुटली तर मुलांची आई आणि बाबा असा डबलरोल तिला करावा लागतो. तिथे ती कुठेही कमी पडताना दिसत नाही. तिचा पूर्वीपासूनच भ्रूण हत्येला विरोध होता, पण तिचं मत कोणी विचारात घेत नव्हतं, पण आता ती आवाज उठवू शकते, विरोध करू शकते, पूर्वी ‘तिला शिकून कुठे जायचय? चूल आणि मूलच सांभाळायचं आहे’ ही रूढीवादी परंपरा मोडून ती स्वत: आत्मनिर्भर बनलीय.  ‘आई कुठे काय करते’ या प्रश्नाला तिने सणसणीत चपराक देवून 
निरुत्तर केलय.

संबंधित बातम्या