मोतिडोंगर ‘कंटेन्मेंट झोन’ जाहीर

dainik Gomantak
बुधवार, 1 जुलै 2020

एकूण १७ कोरोना रुग्ण आढळलेली मोतिडोंगर झोपडपट्टी ‘कंटेन्मेंट झोन’ म्हणून जाहीर करण्यात आली असून मोतिडोंगरवरील सर्व मार्ग ‘सील’ करण्यात आले आहेत. १ जुलै रोजी मोतिडोंगर येथे पुन्हा स्वॅब चाचणीची मोहीम हाती घेण्यात येणार आहे.

मडगाव
शनिवारी मोतिडोंगर येथील ७६ वर्षीय ज्येष्ठ नागरिक कोरोना पॉझिटिव्ह आढळला होता. त्यानंतर गेल्या दोन दिवसांत २९७ जणांची स्वॅब चाचणी करण्यात आली. त्यात १२ जण कोरोना पॉझिटिव्ह निघाले. यात त्या ज्येष्ठ नागरिकाची सून व नातवंडांचा समावेश आहे. १२ पैकी बहुतांश या ज्येष्ठ नागरिकाचे नातेवाईक असून वृद्धाच्या घराशेजारीच ते राहतात. काही दिवसांर्पूवी मोतिडोंगर येथील एका कुटुंबातील चार सदस्य कोरोना पॉझिटिव्ह सापडले होते.
मोतिडोंगर येथे रविवारी व सोमवारी स्वॅब चाचणी घेण्यात आली. आज चाचणी बंद ठेवण्यात आली. १ जुलै रोजी मोतिडोंगर येथील उर्वरीत नागरिकांची स्वॅब चाचणी करण्यात येणार आहे. चार वैद्यकीय पथके ही चाचणी करतील. मोतिडोंगर येथील सर्व मार्ग बॅरिकेडस उभारून पोलिसांनी सील केले आहेत, अशी माहिती विरोधी पक्षनेते व मडगावचे आमदार दिगंबर कामत यांनी दिली.
पॉझिटिव्ह रुग्णांपैकी चौघांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी पाठवण्यात आले आहे. घरात विलगीकरणात त्यांना ठेवण्यात आले आहे, अशी माहिती मोतिडोंगर येथील नागरिक ज्ञानेश्‍वर पाटेकर यांनी दिली.
मोतिडोंगर झोपडपट्टीचा मडगाव पालिकेच्या प्रभाग १८ व प्रभाग २२ मध्ये समावेश होतो. प्रभाग २२ मधील पाण्याची टाकी ते प्रभाग १८ मधील सुलभ शौचालय ते बीएसएनएल क्वार्टर्स व प्रभाग २२ मधील रेणुका देवी मंदिर ते पाण्याची टाकी परिसर ‘कंटेन्मेंट झोन’ करण्यात आला आहे. दोन्ही प्रभागांतील उर्वरीत भाग ‘बफर झोन’ म्हणून जाहीर झाला आहे.

संबंधित बातम्या