
पणजी : गोवा बचाव म्हादई बचाव आघाडीच्या वतीने रविवारी आयोजित केलेल्या मानवी साखळी आंदोलनात हजारो नागरिकांनी भाग घेतला. मानवी साखळीतील सहकार्याबद्दल लोकांचे आभार मानत या आघाडीने हे आंदोलन पुढे चालू ठेवण्याचा निर्धार केला आहे.
यासाठीच आता मडगावमध्ये 18 जूनच्या सुमारास भव्य जाहीर सभा घेतली जाणार आहे,अशी माहिती या आघाडीचे कार्यकर्ते प्रा. प्रजल साखरदांडे यांनी दिली. यावेळी ॲड. हृदयनाथ शिरोडकर, महेश म्हांबरे, तनोज अडवलपालकर उपस्थित होते.
ॲड. शिरोडकर म्हणाले, या आघाडीच्या वतीने रविवारी आयोजित केलेल्या मानवी साखळी आंदोलनाला गोव्यातील सर्वच भागातून आलेल्या लोकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्याची माहिती संपूर्ण देशभर पोचली आहे. आम्हाला देशवासीयांना जो संदेश द्यावयाचा होता, तो सर्वत्र देशभरात पोहोचला आहे. या आंदोलनाबरोबर हजारो लोक आहेत, हेही या आंदोलनाच्या निमित्ताने स्पष्ट झाले आहे.
सध्या मॉन्सूनपूर्व दिवस असल्याने अनेक लोक आपल्या घरगुती कामामध्ये व्यग्र होते. त्यामुळे या आंदोलनाला थोडा कमी प्रतिसाद मिळाला. मात्र, आंदोलन यशस्वी झाले.
प्रा. साखरदांडे म्हणाले हे आंदोलन गोमंतकीयांच्या अस्मितेचा लढा असून जीवन मरणाचे आंदोलन आहे. त्यामुळे ते यापुढेही चालूच राहील. यासाठीच 18 जून या क्रांती दिनाच्या निमित्ताने मडगाव मध्ये जाहीर सभा घेण्याचे नियोजन सुरू आहे. याबाबतचा निश्चित कार्यक्रम आम्ही लवकरच जाहीर करू,असेही त्यांनी सांगितले.
हा लढा राजकीय पक्षाशी किंवा विरोधात नाही !
कर्नाटकात सत्तांतर झाले असून सध्या काँग्रेस पक्ष सत्तेवर आला आहे. याचा आंदोलनावर आणि डीपीआरच्या अंमलबजावणीबाबत काही परिणाम होईल का ? असे विचारले असता ॲड. शिरोडकर म्हणाले आमचे आंदोलन कोणत्याही राजकीय पक्षासोबत वा विरोधात नाही. त्यामुळे कर्नाटकातील सत्तांतराचा कसलाच परिणाम होणार नाही. आणि आमचे आंदोलन यापुढेही चालूच ठेवू.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.