गोव्यात निवडणुकीच्या रणधुमाळी आधी राज्यपाल नियुक्तीच्या हालचाली  

गोव्यात निवडणुकीच्या रणधुमाळी आधी राज्यपाल नियुक्तीच्या हालचाली  
BJP Goa 1.jpg

पणजी : राज्याचा नवा राज्यपाल (Governor) कोण, याचे उत्तर दृष्टिपथात येत आहे. येत्या काही महिन्यांत विधानसभा निवडणुकीची (Election)  रणधुमाळी जोर पकडण्याआधी राज्यपाल नियुक्ती केले जाऊ शकते. सत्ताधारी भाजपने (BJP) १५ ऑगस्टपूर्वी गोव्याला (Goa) राज्यपाल नेमण्याचे ठरवल्याची माहिती मिळाली आहे.

राज्याला पूर्णवेळ राज्यपाल नसल्यावरून विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी टीका केली होती. त्याचवेळी राज्यपाल नेमण्याविषयी हालचाली सुरू होत्या, मात्र विरोधी पक्षाने मागणी केली आणि ती पूर्ण केली असे चित्र निर्माण होऊ नये यासाठी राज्यपालपदावरील व्यक्तीची नियुक्ती लांबणीवर टाकण्यात आली.

दरम्यान, राज्यपाल सत्यपाल मलीक यांची बदली झाल्यानंतर महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे गोव्याच्या राज्यपालपदाचा अतिरिक्त ताबा देण्यात आला आहे. कोविड प्रतिबंधांमुळे अलीकडच्या काही महिन्यांत ते गोव्यात आलेले नाहीत. लोकायुक्तपदी नियुक्त झालेले माजी न्यायमूर्ती अंबादास जोशी यांनाही पदाची शपथ त्यांनी ऑनलाईन पद्धतीने दिली आहे. त्यावरूनही विरोधकांनी टीका केली आणि कोविड महामारीचा आढावा घेण्यासाठी राज्यात येण्याची संधी राज्यपालांनी गमावली असे नमूद केले होते. 

राजभवनावर भरती
आता नव्याने राज्यपाल नियुक्तीची हालचाल सुरू झाली आहे. राज्यपाल येण्यापूर्वी राजभवनावर आवश्यक ती कर्मचारी भरती करण्यात येत आहे. त्या पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. येत्या दोन महिन्यांत या नियुक्त्या होईपर्यंत नवे राज्यपाल राजभवनात आलेले असतील असे नियोजन आहे.

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com