गोव्यात 64 गुन्हेगारांच्या तडिपारीसाठी हालचाली सुरू

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 23 फेब्रुवारी 2021

राज्यात गुन्हेगारी पार्श्‍वभूमी असलेल्या व पोलिसांत अनेक गुन्हे नोंद असलेल्या 64 गुन्हेगारांविरुद्ध उत्तर व दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांसमोर सादर केलेल्या तडिपारप्रकरणी सुनावणी गेल्या कित्‍येक वर्षापासून प्रलंबित आहेत.

पणजी :  राज्यात गुन्हेगारी पार्श्‍वभूमी असलेल्या व पोलिसांत अनेक गुन्हे नोंद असलेल्या 64 गुन्हेगारांविरुद्ध उत्तर व दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांसमोर सादर केलेल्या तडिपारप्रकरणी सुनावणी गेल्या कित्‍येक वर्षापासून प्रलंबित आहेत. हल्लीच म्हापसा पोलिसांनी रेव्हुलेशनरी गोअन्सचे सर्वेसर्वा मनोज परब याच्यावरील 5 गुन्हे व 1 चॅप्टर प्रकरण नोंदवून तडिपारसाठीचा प्रस्ताव उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला आहे. तडिपार प्रकरणे सहा महिन्यात निकालात काढण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात या प्रकरणांच्या सुनावणीसाठी हालचाली सुरू झाल्या आहेत.

कर्नाटकने म्हादईच्या पळवलेल्या पाण्याची सर्वोच्च न्यायालय पाहणी करणार

उत्तर गोव्यात गेल्या काही वर्षात पोलिसांनी गुन्हेगारी पार्श्‍वभूमी तसेच समाजाला धोकादायक असलेल्या एकूण 18 जणांविरुद्ध तडीपार करण्याचा प्रस्ताव सादर केला होता. त्यातील राहुल यादव, गणेश पांजल व जावेद बेपारी या तिघांना वैयक्तिक हमीवर सुनावणीनंतर सोडण्यात आले आहे. पेडणे येथील स्वप्नील परब याला उत्तर गोव्यातून तडिपार करण्यात आले आहे. 14 जणांविरुद्ध सध्या तडिपार प्रकरणीची सुनावणी जिल्हाधिकाऱ्यांमसोर सुरू आहे. हल्लीच फातोर्डा येथे भरदिवसा अन्वर शेख या गुंडप्रवृत्तीच्या तरुणावर दुसऱ्या गुन्हेगारी टोळीने हल्ला केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची दखल घेत तडीपार करण्यासाठी ज्यांच्याविरुद्ध तक्रारी नोंद आहेत त्या निकालात काढण्याचे निर्देश दिले आहेत.

सध्या तुरुंगात असलेल्या आलेक्स रॉनी डिसोझा याच्याविरुद्ध ८ गुन्हे व ३ चॅप्टर प्रकरणे, मार्सेलिनो डायस याच्याविरुद्ध 6 गुन्हे व 3 चॅप्टर प्रकरणे, साम्युएल डिसोझा याच्याविरुद्ध 3 गुन्हे व 1 चॅप्टर प्रकरण, संतेश काणकोणकर याच्यावर 3 गुन्हे व 5 चॅप्टर प्रकरणे, दिपक ऊर्फ गुरुदास आरोंदेकर याच्यावर 17 गुन्हे व ६ चॅप्टर प्रकरणे, थॉमस फर्नांडिस याच्यावर 4 गुन्हे व 1 चॅप्टर प्रकरण, विनोद नाईक याच्यावर 7 गुन्हे, रितेश नागवेकर याच्यावर 6 गुन्हे व 1 चॅप्टर प्रकरण, मनोज परब याच्यावर 5 गुन्हे व 1 चॅप्टर प्रकरण, रफिक बेनकीपूर याच्यावर 5 गुन्हे व 2 चॅप्टर प्रकरण, इम्रान बेपारी याच्यावर १४ गुन्हे व २ चॅप्टर प्रकरण, अरबाझ बेपारी 4 गुन्हे व 2 चॅप्टर प्रकरण, करीम बेपारी 9 गुन्हे व 3 प्रकरण तसेच जेनिटो कार्दोझ याच्यावर 8 गुन्हे व 7 चॅप्टर प्रकरणे नोंद आहेत.

कोरोना नियंत्रणात ठेवण्यास गोवा सरकारच्या आरोग्य खात्याला यश

यातील काहीजण गंभीर गुन्ह्याप्रकरणी कोलवाळ कारागृहात आहेत. दक्षिण गोव्यात आतापर्यंत 54 तडीपार प्रकरणांवर सुनावणी सुरू झाली आहे तर काहींची सुनावणी पूर्ण होऊन त्यावर निर्णय देण्यात आला नाही. हे सर्वजण गुन्हेगारीशी संबंधित आहेत तसेच त्यांच्याविरुद्ध पोलिस ठाण्यात गुन्हे तसेच चॅप्टर प्रकरणे नोंद आहेत. या प्रकरणावरील सुनावणीला विलंब होत असल्याने ती निकालात निघत नाही. काहीजणांवर तडिपारप्रकरणी सुनावणी सुरू असताना ते वैयक्तिक हमीवर तुरुंगाबाहेर असतात मात्र त्यांच्या गुन्हेगारी कारवाया सुरूच असतात.

संबंधित बातम्या