उसगावात "एमआरएफ' ठरतोय हॉटस्पॉट!

Anand Mayekar
शुक्रवार, 7 ऑगस्ट 2020

वेर्णा औद्योगिक वसाहतीतील टुलीप सह इतर प्रकल्पांतून कोरोनाचा प्रसार झाल्यानंतर आता तिस्क - उसगाव येथील एमआरएफ कंपनीच्या कामगारांकडून राज्यात विविध ठिकाणी प्रसार होत आहे. तिस्क - उसगावसह, कवळे, म्हार्दोळ व राज्यातील इतर ठिकाणचे लोक एमआरएफमध्ये कामगार म्हणून कामाला आहेत, तेथे कोरोना पोचला आहे

फोंडा, फोंडा तालुक्‍यासह राज्यातील इतर ठिकाणी तिस्क - उसगाव येथील टायर उत्पादक "एमआरएफ' कंपनीच्या कोरोनाग्रस्त कामगारांकडून कोरोनाचा फैलाव होत असून सरकारने याप्रकरणी त्वरित लक्ष घालून एमआरएफ कंपनी कामगारांसह त्यांच्या कुटुंबियांची त्वरित कोरोनाची चाचणी करावी, अशी जोरदार मागणी उसगाववासीयांनी केली आहे. यासंबंधीचे एक निवेदन येथील उसगाव - गांजे पंचायतीच्या सरपंच, फोंड्याचे उपजिल्हाधिकारी तसेच आरोग्याधिकाऱ्यांसह मुख्यमंत्री व इतर संबंधितांना देण्यात आले आहे. सद्यस्थितीत एमआरएफ कंपनीचे पन्नासपेक्षा जास्क कामगार कोरोनाग्रस्त असून काहीजणांची नावेही या निवेदनात नमूद करण्यात आली आहेत.
आतापर्यंत वेर्णा औद्योगिक वसाहतीतील टुलीप सह इतर प्रकल्पांतून कोरोनाचा प्रसार झाल्यानंतर आता तिस्क - उसगाव येथील एमआरएफ कंपनीच्या कामगारांकडून राज्यात विविध ठिकाणी प्रसार होत आहे. तिस्क - उसगावसह, कवळे, म्हार्दोळ व राज्यातील इतर ठिकाणचे लोक एमआरएफमध्ये कामगार म्हणून कामाला आहेत, तेथे कोरोना पोचला आहे. एमआरएफ कंपनीकडून कामगारांची त्वरित तपासणी केली नाही तर राज्यात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढतील, अशी भीती उसगाव येथील नागरिकांनी व्यक्त केली आहे.
उसगावचे एक नागरिक लक्ष्मीकांत नाईक यांनी यासंबंधी बोलताना एमआरएफ कंपनी कामगारांबरोबरच त्यांच्या सर्व कुटुंबियांची कोरोनासंबंधी त्वरित तपासणी करण्यासाठी सरकार अथवा एमआरएफ कंपनीने पुढाकार घ्यावा, अशी मागणी केली आहे. कोरोनाचे रुग्ण वाढल्यानंतर इतर ठिकाणी असलेल्या औद्योगिक वसाहतीत काही कंपन्यांकडून खुद्द त्यांच्या कामगारांची तपासणी करण्यासाठी योग्य कार्यवाही करण्यात येत आहे. त्यासाठी अशा कंपन्यांनी यंत्रणाही उभारली आहे, मात्र एमआरएफकडून अशाप्रकारे कोणतीच कार्यवाही झालेली नसून कामगारांना घरी थांबण्याचे सल्ले दिले जात असल्याचे नागरिकांनी म्हटले आहे. या कंपनीकडून फक्त तिस्क - उसगाव भागात मर्यादित सॅनिटायझेशन करण्यात आले आहे, जे कुचकामी ठरले असल्याचा आरोप येथील नागरिकांनी केला आहे. एमआरएफ कंपनीची सरकारी यंत्रणेने त्वरित चौकशी करावी, अशी जोरदार मागणी उसगाववासीयांनी निवेदनात केली आहे.
राज्यातील औद्योगिक प्रकल्पांकडून त्यांच्या कामगार वर्गाची त्वरित तपासणी करण्यासाठी योग्य यंत्रणा उभारण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. एखादा कामगार कोरोनाग्रस्त निघाला तर त्याला घरी बसण्याचा सल्ला दिला जातो, मात्र या कामगारासह त्याच्या कुटुंबियांची कोरोना चाचणी करण्यासाठी अशा कंपन्या पुढाकार घेत नाहीत, त्यामुळे आता सरकारनेच लक्ष घालण्याची मागणी पुढे येत आहे.

संबंधित बातम्या