मुडकूड बंधाऱ्याची जलस्त्रोत खात्याकडून अखेर पाहणी

प्रतिनिधी
शुक्रवार, 4 सप्टेंबर 2020

आगोंद पंचायत क्षेत्रातील मुडकूड बंधाऱ्याच्या कोसळलेल्या संरक्षक भिंतीची जलस्त्रोत खात्याच्या अभियंत्याकडून आज पाहणी करण्यात आली.

काणकोण: आगोंद पंचायत क्षेत्रातील मुडकूड बंधाऱ्याच्या कोसळलेल्या संरक्षक भिंतीची जलस्त्रोत खात्याच्या अभियंत्याकडून आज (ता.३) पाहणी करण्यात आली. जलस्त्रोत खात्याचे सहाय्यक अभियंता सत्यवान देसाई व कनिष्ठ अभियंता संदेश देसाई यांनी पाहणी करून कोसळलेल्या भागाची दुरूस्ती करण्यासाठी मोजमाप काढले. यावेळी आगोंद पंचायतीचे सरपंच प्रमोद फळदेसाई यांच्‍यासह अन्‍य मान्‍यवर उपस्थित होते. कोसळलेल्या बाजूकडे पन्नास व दुसऱ्या बाजूला सुमारे तीस मीटर लांबीची संरक्षक भिंत  आपत्‍कालीन व्यवस्थापनांतर्गत उभारण्यासाठी प्रस्ताव तयार करण्यात येणार आहे. त्यासाठी पंचायतीतर्फे ठराव खात्याला लवकरच पाठवून देण्यात येणार असल्याचे सरपंचांनी सांगितले.

आगोंद पंचायत क्षेत्रातील मुडकूड येथील बंधाऱ्याची एका बाजूची संरक्षक भिंत कोसळल्याने दुसऱ्या बाजूची संरक्षक भिंतही कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्याचप्रमाणे बंधाऱ्यालाही धोका असल्याचे पंचायतीचे सरपंच प्रमोद फळदेसाई यांनी सांगितले. 

हा बंधारा शेतीच्या व बागायतीच्या जलसिंचन तसेच भूगर्भ जलपातळी वाढवण्यासाठी माजी मंत्री दिवंगत संजय बांदेकर याच्या कारकिर्दीत उभारण्यात आला होता. 

या बंधाऱ्याची योग्य देखभाल न केल्याने या बंधाऱ्याची संरक्षक भिंत कोसळली आहे. या बंधाऱ्यावर पदपूल आहे. त्या पदपुलावरून काऱ्यामळ, पारव्यामळ, कुडय येथील रहिवासी ये-जा करतात बंधाऱ्याला धोका निर्माण झाल्यास बंधाऱ्याबरोबर पदपूलही कोसळण्याची शक्यता आहे. 

त्यामुळे या तीन वाड्यावरील रहिवाशांचा संपर्क तुटणार असल्याचे सरपंच फळदेसाई यांनी सांगितले. त्यामुळे तातडीने संरक्षक भिंतीची उभारणीसाठी प्रयत्न करण्याची मागणी जलस्त्रोत खात्याच्या अभियंत्याकडे करण्यात आल्याचे सरपंच फळदेसाई यांनी सांगितले.

संबंधित बातम्या