विक्रमाच्या उंबरठ्यावर मुंबई सिटी आयएसएल स्पर्धेत सर्वाधिक सामने अपराजित राहण्याची संधी

Mumbai City ISL most unbeaten matches on record
Mumbai City ISL most unbeaten matches on record

पणजी: मुंबई सिटी एफसीने नॉर्थईस्ट युनायटेडवर विजय मिळविला किंवा बरोबरी नोंदविली, तर शनिवारी सर्जिओ लोबेरा यांच्या मार्गदर्शनाखालील संघाच्या नावे इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत नवा विक्रम नोंदीत होईल. सध्या ते स्पर्धेच्या सातव्या मोसमात सलग 12 सामने अपराजित आहेत.

एफसी गोवा संघाने आयएसएल स्पर्धेच्या दुसऱ्या मोसमात 2015 साली सलग 12 सामने अपराजित राहण्याचा पराक्रम केला होता. त्याच्याशी आता मुंबई सिटीने बरोबरी साधली आहे. शनिवारी विजय किंवा बरोबरी नोंदविल्यास आयएसएल स्पर्धेत सलग 13 सामने अपराजित राहणारा पहिला संघ हा मान मुंबई सिटीस मिळेल. त्यांची नॉर्थईस्टविरुद्धची लढत बांबोळी येथील जीएमसी स्टेडियमवर होईल. यंदा मुंबई सिटीने सलग लढतीत नऊ विजय व तीन बरोबरीची नोंद केली आहे. त्यांचे सर्वाधिक 30 गुण आहेत.

मुंबई सिटी बदला घेणार?

मुंबई सिटीला यंदाच्या मोहिमेतील पहिल्याच लढतीत नॉर्धईस्ट युनायटेडने धक्कादायक पराभव पत्करण्यास भाग पाडले, मात्र त्यानंतर लोबेरा यांच्या मार्गदर्शनाखालील संघाने स्पर्धेत फार मोठी मजल मारत अग्रस्थान भक्कम केले आहे. सध्याचा फॉर्म पाहता, परतीच्या लढतीत मुंबईच्या संघास पराभवाचा बदला घेण्याची संधी असेल. गुवाहाटीचा नॉर्थईस्ट संघ गुणतक्त्यात पहिल्या चार संघांत स्थान मिळवून प्ले-ऑफ फेरीच्या आशा कायम राखण्यासाठी प्रयत्नशील असेल. सध्या ते 18 गुणांसह पाचव्या क्रमांकावर असून चौथ्या क्रमांकावरील हैदराबादपेक्षा त्यांचा एक गुण कमी आहे. अंतरिम मुख्य प्रशिक्षक खालिद जमील यांच्या मार्गदर्शनाखालील मागील दोन्ही लढती जिंकताना अनुक्रमे जमशेदपूर व एटीके मोहन बागान संघाला हरविले आहे, तो धडाका कायम राखत मुंबई सिटी आणखी एकदा चकीत करण्यासाठी नॉर्थईस्टचे प्रयत्न असतील.

‘‘नॉर्थईस्टने मागील दोन सामन्यांत प्रगती साधली आहे. ते आक्रमक शैलीतील चांगले फुटबॉल खेळत आहेत आणि त्यांचे खेळाडू चेंडूवर नियंत्रण व वर्चस्व राखत आहेत. आम्हाला शंभर टक्के योगदान द्यावे लागेल,’’ असे सांगत मुंबई सिटीचे प्रशिक्षक लोबेरा यांना सावध पवित्रा घेतला. मुंबई सिटीने दुसऱ्या क्रमांकावरील एटीके मोहन बागानवर सहा गुणांची आघाडी घेतली आहे. नॉर्थईस्टविरुद्ध पूर्ण तीन गुण प्राप्त केल्यास मुंबई सिटीस गाठणे इतर संघांना कठीण ठरेल. चेन्नईयीन एफसीविरुद्ध मध्यरक्षक अहमद जाहू याच्या चुकीमुळे पेनल्टी गोल स्वीकारावा लागल्यामुळे मुंबई सिटीस बरोबरीमुळे दोन गुणांचे नुकसान सहन करावे लागले होते. हैदराबादनेही त्यांना गोलशून्य बरोबरीत रोखले होते.

धारदार आक्रमण, भक्कम बचाव

मुंबई सिटीने सातव्या आयएसएल स्पर्धेत धारदार आक्रमण रचताना 19 गोल नोंदविले आहे. त्यांचा बचाव स्पर्धेत भक्कम ठरला आहे. त्यांनी सर्वांत कमी पाच गोल स्वीकारले आहेत, तर गोलरक्षक अमरिंदर सिंग याने सर्वाधिक आठ क्लीन शीट्स राखल्या आहेत. नॉर्थईस्टने 17 गोल नोंदविले असून तेवढेच गोल स्वीकारले आहेत.

दृष्टिक्षेपात...

- स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात वास्को येथे नॉर्थईस्ट युनायटेडची मुंबई सिटीवर 1-0 फरकाने मात

- मुंबई सिटीचे 9 विजय, 3 बरोबरी, 1 पराभव

- नॉर्थईस्ट युनायटेडचे 4 विजय, 6 बरोबरी, 3 पराभव

- मुंबई सिटीच्या ॲडम ली फाँड्रे याचे 6 व बार्थोलोमेव ओगबेचे याचे 5 गोल

- नॉर्थईस्ट युनायटेडतर्फे लुईस माशादो याचे 4 गोल

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com