कधी सुरू होणार मुंबई-गोवा महामार्गाची सिंगल लेन? मंत्र्यांनी सांगितली तारीख, मनसेलाही लिहले खास पत्र

सप्टेंबरमध्ये महामार्गाची सिंगल लेन सुरू करणार असल्याचे आश्वासन बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिले आहे.
Mumbai-Goa Highway
Mumbai-Goa Highway Dainik Gomantak

Mumbai Goa Highway: रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाबाबत मनसेने आंदोलन सुरू केले आहे. मनसैनिकांनी यापूर्वी कंत्राटदारांचे कार्यालय फोडण्यापासून यंत्रांची नासधुस केली आहे. यावरून राज्याचे बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी मनसेला खास पत्र लिहले आहे.

'कोकणचा सुपुत्र म्हणून मुंबई-गोवा महामार्ग पूर्ण व्हायलाच पाहिजे याच भूमिकेतून काम करत आहे. केवळ खड्डे न बुजवता CTB तंत्रज्ञानाच्या माध्यमातून महामार्गाचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्याचा आमचा प्रयत्न आहे. असे मंत्री चव्हाण यांनी म्हटले आहे.' तसेच, सप्टेंबरमध्ये महामार्गाची सिंगल लेन सुरू करणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे.

बांधकामंत्री रवींद्र चव्हाण यांनी पत्रात काय लिहले आहे?

"दगड फोडला तर कलाकृती उभी राहते आणि दगड फेकला की विध्वंस होतो याची कोणीतरी कधीतरी आठवण करून द्यावी म्हणून आज हे पत्र लिहीत आहे. मुंबई गोवा महामार्गाचं काम अंतिम टप्प्यात अतिशय वेगाने सुरु आहे आणि त्यात ही सार्वजनिक मालमत्तेची तोडफोड महाराष्ट्र विरोधी आणि विनाशकारी मानसिकतेची आहे.

जे कार्यकर्ते स्वतःला महाराष्ट्र सैनिक म्हणवतात त्यांनी स्वतःला प्रश्न विचारायला हवा की कुठला सैनिक आपल्या देशाचे आणि आपल्या राज्याच्या मालमत्तेचे तोडफोड करून नुकसान करतो....? तो कसा काय महाराष्ट्र सैनिक...... ? आम्हीही रस्त्यावर आंदोलन करून इथपर्यंत पोहोचलो पण आमची निष्ठा सर्वप्रथम देश नंतर पक्ष आणि शेवटी स्वतः हीच आहे.... त्यात अशी तोडफोड करून विघ्न आणण्याचं कारण समजण्यापलीकडे आहे.....

मुंबई गोवा महामार्ग आता खरोखरी दृष्टीपथात येत आहे. येत्या गणेशोत्सवासाठी चाकरमानी कोकणात जाण्यापूर्वी सिंगल लेन पूर्ण झालेली असेल याचा मी अत्यंत जबाबदारीने पुनरुच्चार करतो आणि डिसेंबर 2023 पर्यंत पूर्ण मुंबई गोवा महामार्ग देशसेवेसाठी तयार होईल हा शब्द देतो. म्हणून... दगड भिरकावून तोडफोड करणारी विनाशकारी विचारसरणी नको आता त्या ऐवजी दगड रचून नवा इतिहास रचणारी प्रगतिशील कामं करणारी तरुणाईची साथ हवी आहे.... अवघ्या महाराष्ट्राला......"

Mumbai-Goa Highway
तोडफोड, जाळपोळ भूमिका चुकीची; मुंबई-गोवा महामार्ग आंदोलनावरून बांधकाम मंत्र्यांचा मनसेवर निशाणा

"कोकणचा सुपुत्र म्हणून अनेक लहान-मोठ्या समस्या जवळून बघितल्या होत्या. यातल्या अनेक समस्यांचं मूळ मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या चौपदरीकरण हेच आहे, याची देखील जाणीव आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याचा मंत्री या नात्याने पनवेल ते झाराप मुंबई गोवा महामार्गावर रस्त्यावर कडक उन्हात आणि भर पावसात उतरून रस्ते कामाची सलग आठ वेळा पाहणी केलेला मी कोकणी माणूस आहे.

खात्याचा कार्यभार स्वीकारल्यानंतर हा रखडलेला प्रश्न कायमस्वरूपी सोडवणं ही स्वाभिमानी प्रतिज्ञा केली होती ती कार्यसिद्धी झाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही हे व्रत म्हणून स्वीकारलं आहे.

केवळ खड्डे न बुजवता CTB टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून समस्येला कायमस्वरूपी पूर्णविराम दिला जातो आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाची कार्यालयं फोडण्यापर्यंत या श्रेयजीवींची मजल गेली आहे. या तोडाफोडीमुळे महामार्गांचे काम करणाऱ्या कामगारांमध्ये दहशत पसरत आहे, अनेक अडचणी निर्माण होत आहेत. सुरु असलेल्या कामांना हातभार लावण्याऐवजी अशाप्रकारे आडकाठी आणून यांना नेमकं काय साध्य करायचं आहे ? हा प्रश्नच आहे.

गणेशोत्सवापूर्वी सिंगल लेन आणि वर्षाअखेरपर्यंत पूर्ण महामार्ग पूर्ण करणारच या निश्चयातूनच आपला विभाग काम करत आहे." असे चव्हाण यांनी पत्रात म्हटले आहे.

कधी सुरू होणार सिंगल लेन?

"महामार्गाच्या रोजच्या कामाचे ड्रोन शूट करण्यात येत आहे. दररोज या कामाच्या प्रगतीवर लक्ष ठेवून आहे. यापूर्वी अनेकदा सांगितल्याप्रमाणे 10 सप्टेंबरपर्यंत महामार्गाच्या सिंगल लेनचे उच्च दर्जाचे काम पूर्ण होणार ही खात्री आहे. उर्वरित सिंगल लेनचे काम देखील टाईम बाउन्ड पिरियडमध्ये म्हणजेच वर्षाअखेरपर्यंत पूर्ण करण्यात येईल." असे आश्वासन मंत्री चव्हाण यांनी दिले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com