गोव्यात पालिका निवडणूक पक्ष चिन्हांविनाच लढवली जाणार

गोमन्तक वृत्तसेवा
रविवार, 31 जानेवारी 2021

नगरपालिका निवडणुका पक्षीय पातळीवर घेऊ नयेत, असे सत्ताधारी भाजपने सरकारला कळवले आहे.

पणजी : नगरपालिका निवडणुका पक्षीय पातळीवर घेऊ नयेत, असे सत्ताधारी भाजपने सरकारला कळवले आहे. त्यामुळे पालिका निवडणुका हा पक्षीय पातळीवर होणार नाही, अशी घोषणा सरकारी पातळीवर होण्याची औपचारिकता बाकी आहे. राज्यातील ११ पालिकांचा कार्यकाळ चार महिन्यांपूर्वीच संपला आहे. सरकारने पालिकांवर प्रशासकही नियुक्त केले आहेत. पणजी महापालिका मंडळाचा कार्यकाळ संपत आला आहे.

यामुळे पणजी महापालिकेसह ११ पालिकांची निवडणूक एकत्रित घेण्याचे ठरवण्यात आले आहे. राज्य  निवडणूक आयोग ही निवडणूक घेणार आहे. आयोगाने ही निवडणूक घेणे आणखीन तीन महिन्यांनी लांबणीवर टाकल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे येत्या एप्रिलपर्यंत ही निवडणूक घेतली जाणार आहे. जिल्हा पंचायत निवडणुकीत मोठे यश मिळाल्यानंतर सत्ताधारी भाजपचा उत्साह दुणावला असून त्यांनी त्याच नेटाने या निवडणुकीला सामोरे जाण्याचे ठरवले आहे.

जागतिक पातळीवर भारताचे नाव गांधींमुळे पोहोचले'

भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी या माहितीस दुजोरा दिला. ते म्हणाले, पालिकांचे प्रभाग छोटे आहेत. पाचशे मतांचेही प्रभाग आहेत. तेथे एकेका प्रभागातून लढण्यासाठी अनेक कार्यकर्ते निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. त्यामुळे त्यांनी वैयक्तीक पातळीवर निवडणूक लढवावी, असे ठरवण्यात आले आहे. माझी याबाबत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी चर्चा झाली आहे. त्यांना पक्षाचे म्हणणे सांगितले आहे. आजवर पालिका निवडणूक ज्या पद्धतीने घेतली जात होती, त्याच पद्धतीने घेतली जावी, असे त्यांना नमूद केले आहे. अर्थात याविषयी सरकार जो निर्णय घेईल त्याचे आम्ही पालन करू. जिल्हा पंचायत निवडणुकीत मतदारसंघ मोठे होते, म्हणून पक्षीय पातळीवर ती निवडणूक घेण्यात आली.

गोवा विधानसभा अधिवेशन: "विरोधकांनी विधानसभेत भाजप पक्षावर केली टीका अकारणच"

पालिका निवडणुकीत जवळ जवळचेच उमेदवार असतात. त्यामुळे कोणालाही मतदान करताना प्रश्न पडू नये, यासाठी उमेदवाराने आपल्या मित्र परिवार, कुटुंबीयांच्या मदतीने निवडणूक लढवावी, अशी सूचना इच्छुक उमेदवारांना करण्यात आली आहे. पालिका निवडणुकीत पक्षाचे चिन्ह नको, असे आमचे म्हणणे आहे. दोन कार्यकर्ते आपापसात निवडणूक लढले तरी अमुक एक पक्षाचा अधिकृत व अमुक एक अधिकृत नाही, असे होता कामा नये. काही ठिकाणी पक्षाचे कार्यकर्ते एकत्र येऊन पॅनल स्थापन करू शकतात. आमचे कार्यकर्ते जिंकावेत यासाठी आम्ही त्यांना मदत करू असे त्यांनी नमूद केले.

संबंधित बातम्या