पालिकेची निवडणूक पुन्हा लांबणीवर

Municipal elections postponed again
Municipal elections postponed again

मुरगाव :  कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मुरगाव पालिकेची ऑक्टोबरमध्ये होणारी निवडणूक तीन महिने लांबणीवर पडली आहे. या खेपेस निवडणुकीत उतरण्यासाठी अनेक इच्छुक उमेदवार सज्ज झाले असून त्यांनी आपापल्या परीने प्रचारही सुरू केला आहे. विद्यमान मंडळातील बहुतेक नगरसेवक पुन्हा आखाड्यात उतरणार आहेत.


मुरगाव पालिका क्षेत्रात तसेच राज्यातील अन्य भागात कोरोनाची स्थिती भयानक बनली आहे.या रोगावर मात करण्यासाठी मार्गदर्शक तत्वे जारी केली आहे.त्यात सर्वात महत्त्वाचे म्हणजे किमान दोन मीटर अंतर ठेवून लोकांनी राहणे तसेच गर्दी टाळणे हे आहे. निवडणुका घेतल्यास मार्गदर्शक तत्त्वांची पायमल्ली होईल हे ध्यानात ठेवून पालिका निवडणुका तीन महिने लांबणीवर टाकण्यात आल्या आहेत. तशी घोषणा राज्य निवडणूक आयोगाने केली आहे.


गोव्यात जिल्हा पंचायतीच्या निवडणूकांचा फड रंगात आलेला असताना कोरोनाचा शिरकाव झाला. त्यामुळे निवडणुकीस अवघे दोन दिवस शिल्लक असताना जिल्हा पंचायत निवडणुक पुढे ढकलली ती अद्याप होत नाही. कोरोनाच्या वाढत्या प्रसारामुळे नजिकच्या काळात लवकर जिल्हा पंचायत निवडणूक होईल याची शाश्वती नाही. तोच प्रकार पालिका निवडणुकीच्या बाबतीत दिसून येत आहे.


मुरगाव पालिकेच्या निवडणुकीत उतरण्यासाठी अनेकांनी गेल्या दीड-दोन वर्षांपासून मोर्चेबांधणी सुरू केली होती. पदरमोड करून इच्छुकांनी आपापल्या प्रभाग परीसरात समाजसेवेची कामे हाती घेतली होती. पण, पालिका निवडणूक होण्याची आशा धूसर बनल्याने इच्छुक उमेदवार नाउमेद झाले आहेत.तथापि, आणखी तीन महिने प्रतिक्षा त्यांना करावी लागणार आहे.


विद्यमान पालिका मंडळाने अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची घोषणा केली होती ती त्यांच्या हयातीत फक्त घोषणाच राहिली आहे.कोणतेच प्रकल्प मंडळाला हाती घेता आले नाही.परीणामी विद्यमान पालिका मंडळ आतापर्यंतचे सर्वात अपयशी मंडळ ठरले.भाजपाचे सत्तारुढ मंडळ  तसेच नगरविकास मंत्री मुरगावचे असून सुद्धा विकास शुन्य मंडळ ठरले आहे. आम्ही हे करू, ते करू असे ठराव संमत करून घेतले पण त्या ठरावांना वाटाण्याच्या अक्षता लावण्याचे महान कार्य तेव्हढे मंडळाने केले. वास्को मासळी मार्केट, बायणा पावर हाऊस आणि पालिका इमारत नूतनीकरण हे तीन मोठे प्रकल्प मुदतीपूर्वी हाती घेण्यासाठी पालिका मंडळाने १४ व्या वित्त आयोगाचा निधी सरकारच्या सुडा कडे वर्ग केला आहे. पण, अद्याप या प्रकल्पाच्या हालचाली दिसून येत नाही.


दरम्यान, आगामी पालिका निवडणुकीत उतरण्यासाठी इच्छुक उमेदवार आपली मोर्चेबांधणी करीत आहेत. यंदाच्या निवडणुकीत उमेदवारांची भाऊगर्दी उसळेल, असे एकूण वातावरणातून दिसून येते. तथापि, प्रभाग आरक्षण कसे असेल यावर संभाव्य उमेदवारांचे भवितव्य अवलंबून आहे.

विद्यमान नगरसेवकांकडून मोर्चेबांधणी...
आगामी पालिका निवडणुकीत पुन्हा उतरण्यासाठी काही विद्यमान नगरसेवक मोर्चेबांधणी करीत आहेत. तथापि, प्रभाग आरक्षण कसे असेल हे गुलदस्त्यात असल्याने अनेकांची गोची झाली आहे. विद्यमान मंडळातील अवघ्याच काही नगरसेवकांनी आपल्या पाच वर्षांच्या कालावधीत स्पृहणीय आणि मनात भरणारे काम केलेले आहे. विशेषता नंदादीप राऊत, दाजी साळकर, यतीन कामुर्लीकर, फेड्रीक हेन्रीक, दीपक नागडे, लविना डिसोझा, सैफुल्ला खान, श्रद्धा आमोणकर, निलेश नावेलकर, शशिकांत परब, भावना भोसले व अन्य काहींनी आपली जबाबदारी बऱ्यापैकी पार पाडलेली आहे. काही नगरसेवक फक्त नावापुरतेच राहिले. कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर पुकारलेल्या टाळेबंदी काळात काही नगरसेवकांनी लोकांची केलेली सेवा न विसरणारी आहे. 

इच्छुक उमेदवारांची
समाजसेवा सुरू, पण...

आगामी पालिका निवडणूक लढविण्यासाठी विद्यमान नगरसेवकांबरोबरच अन्य बरेच जण इच्छुक आहेत.त्यांनी आपापल्या प्रभागात लहान सहान समाजसेवेची कामे सुरू केली आहे. सद्या गृह आधार योजनेसाठी महिलांना लागणाऱ्या मिळकतीचा आणि रहिवासी दाखला मिळवून देण्यासाठी इच्छुक उमेदवार कामाला लागले आहेत.यात विद्यमान नगरसेवकही कष्ट घेत आहेत.त्यांच्याचमुळे मुरगाव मामलेदार कार्यालयात दाखल्यांसाठी तोबा गर्दी उसळत आहे.कोरोनाचा प्रसार होण्याची भीती असतानाही गेल्या काही दिवसांपासून ही गर्दी दिवसेंदिवस वाढतच आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com