राय येथे कुऱ्हाडीने वार करून मित्राचा खून

Dainik Gomantak
मंगळवार, 26 मे 2020

सतत चिडवत असल्‍याने रागाच्‍या भरात कृत्‍य

सासष्टी

मुकेश गजेंद्र सिंग हा मित्र झोपला असताना त्‍याच्‍यावर कुऱ्हाडीने वार करून खून केल्याची घटना कोल्याडोंगर- राय येथे रविवारी घडली. याप्रकरणी मायणा कुडतरी पोलिसांनी संशयित विवेक देवसिंग (४३) याला अटक केली आहे. मुकेश हा सतत चिडवित असल्याने रागाच्‍या भरात खून केल्याची कबुली संशयिताने दिली आहे. संशयिताला रिमांडसाठी न्यायालयात हजर केले असता, त्‍याला चार दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.
मायणा कुडतरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री ११वा.च्‍या सुमारास ही घटना घडली. मुकेश आणि विवेक हे दोघेही मूळ झारखंड येथील रहिवासी असून दोघेही गोव्यात राय येथील जुझे पॉल फर्नांडिस यांच्या मालकीच्या भाड्याच्या खोलीत भाडेकरू म्हणून राहत होते.

रिकामा बसून खातो म्‍हटल्‍याचा राग...
दोघेही मित्र पेशाने मजूर असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुकारण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे संशयित घरीच राहत होते. मुकेश हा विवेकला घरी रिकामा बसून खात असल्याने वारंवार चिडवत होता. या कारणावरून दोघांमध्ये अधूनमधून भांडणेही होत होती. रविवारी सकाळीही दोघांमध्ये या विषयावरून भांडण झाले होते. या दरम्यात मुकेश याने विवेकला दुपारी धमकी दिली होती. त्‍यामुळे विवेकला राग आला व तो मुकेशला मारण्याची संधी शोधत होता. रात्री दोघेही जेवून झोपले असता, विवेकने मुकेशवर कुऱ्हाडीने वार करून खून केला.

खून करून पलायन व अटक
खून करून संशयिताने घटनास्थळाहून पळ काढला आणि राय येथील चर्चजवळील शेतात लपून बसला. घरमालकाच्या मुलाने याप्रकरणी पोलिसांना माहिती दिल्यावर पोलिसांनी त्वरित कारवाई करून संशयिताला शोधून अटक केली. याप्रकरणी पोलिसांनी संशयितावर भादंसंच्या ३०२ कलमाखाली गुन्हा नोंद केला आहे. न्यायालयाने संशयिताला चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

संबंधित बातम्या