न्हावेली-साखळीत कंत्राटदाराचा खून

प्रतिनिधी
रविवार, 20 सप्टेंबर 2020

पश्चिम बंगालमधील कंत्राटदाराचा खून; न्हावेली-साखळी येथे आढळला मृतदेह

डिचोली: डिचोली तालुक्यातील न्हावेली-साखळी येथे निर्जनस्थळी झाडीत एका युवकाचा छिन्नविच्छिन्न आणि  संशयास्पद अवस्थेत मृतदेह आढळून आला आहे. 

कुजलेल्या अवस्थेतील मृतदेहाचे अवयव तीन ठिकाणी आढळून आल्याने हा खुनाचाच प्रकार असल्याच्या निकषापर्यंत पोलिस पोचले आहेत. हा मृतदेह मागील चार दिवसांपासून बेपत्ता असलेल्या मूळ पश्चिम बंगाल येथील रेहमान जमेदार (वय ३०) या राज्याबाहेरील मजूर कंत्राटदाराचा असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

साखळी येथे वास्तव्यास असलेला मयत रेहमान जमेदार हा मागील मंगळवारपासून (ता. १५) बेपत्ता होता. यासंबंधी त्याच्या भावाने साखळी पोलिसात तक्रार दिली होती. आज (शनिवारी) सायंकाळी  न्हावेली-साखळी येथे निर्जनस्थळी झाडीत एका युवकाचा छिन्नविछिन्न अवस्थेत मृतदेह असल्याची माहिती मिळताच डिचोली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपासकाम हाती घेतले. रात्री उशिरा मृतदेहाचा पंचनामा करून उत्तरीय तपासणीसाठी बांबोळी येथे गोमेकॉत पाठविला आहे. मयत रेहमान याच्या शरीराचे तीन ठिकाणी आढळून आलेले अवयव कापून टाकण्यात आले, की रानटी जनावरांनी त्याचे लचके तोडले. ते उत्तरीय तपासणी अहवालानंतरच स्पष्ट होणार आहे.

पोलिस अधीक्षक घटनास्थळी!
घटनेची माहिती मिळताच उत्तर गोव्याचे पोलिस अधीक्षक उत्कृष्ट प्रसून यांनी घटनास्थळी भेट दिली.

 यावेळी डिचोलीचे पोलिस उपअधीक्षक गुरूदास गावडे आणि पोलिस निरीक्षक संजय दळवी घटनास्थळी उपस्थित होते. 

पोलिस अधीक्षक श्री. प्रसून यांनी घटनेचा आढावा घेऊन योग्यदिशेने तपास करण्याचे आदेश पोलिस अधिकाऱ्यांना दिले. पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंद केला असून, त्यादृष्टीने तपास सुरू केला आहे.
 

संबंधित बातम्या