अकरा महिन्यांत डिचोलीत दोन मजुरांची हत्या

प्रतिनिधी
बुधवार, 23 सप्टेंबर 2020

न्हावेलीतील खुनाने ‘करोल’ खून प्रकरणाला उजाळा

डिचोली: गेल्या आठवड्यात न्हावेली-साखळी येथे झालेली निर्घूण हत्या धरून मागील अकरा महिन्याच्या आत डिचोली तालुक्‍यात खुनाच्या तीन घटना घडल्या आहेत. त्यात राज्याबाहेरील दोन मजुरांचे तर एका स्थानिक महिलेचा खून झाला आहे. तर न्हावेली येथील खून प्रकरणाने तर चार वर्षांपूर्वी आमोणे येथे घडलेल्या रतन करोल या रस विक्रेत्याच्या खुनाच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत.
 
मागील आठवड्यात न्हावेली येथे मजुराचा खून करुन त्याचे तुकडे करुन झाडीत फेकले होते. नेमकी साधारण अशीच घटना डिचोली तालुक्‍यात घडली होती. चार वर्षांपूर्वी आमोणे येथे रस विक्रीचा धंदा करणाऱ्या रतन करोल या मूळ राजस्थान येथील विवाहिताचा खून करण्यात आला होता. रतन करोल याच्या शरिराचे तुकडे करून नदीत फेकण्यात आले होते. या प्रकरणी संशयित आरीपींना अटक करण्यात पोलिसांना यश मिळाले.   

मागील वर्षी ऑक्‍टोबर महिन्याच्या १९ तारखेला डिचोलीतील नानोडा येथे मजुरांमध्ये झालेल्या वादातून इराण्णा गौड (मूळ-जालोर, बिजापूर-कर्नाटक) या मजुराने शब्बीर इमामसाब बैकती (मूळ-जळवाड, बिजापूर-कर्नाटक) या मजुराच्या मानेवर तीक्ष्ण हत्याराने वार करून त्याची हत्या केली होती. खून करून राज्याबाहेर पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या संशयित आरोपी इराण्णा गौड याला चार तासाच्या आत म्हापसा बसस्थानकावर अटक करण्यात डिचोली पोलिसांना यश आले. 

मागील आठवड्यात १५ रोजी न्हावेली-साखळी येथे मूळ पश्‍चिम बंगाल येथील जमीदार रेहमान याची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली. या खून प्रकरणी पोलिसांनी योग्यदिशेने तपास करताना मुख्य सूत्रधार चांदमिया जब्बार याच्यासह संजय पासवान आणि मिशान रेहमान या संशयित आरोपींच्या मुसक्‍या आवळण्यात यश मिळवले. या दोन्ही वेगवेगळ्या खून प्रकरणात गुंतलेले संशयितही राज्याबाहेरीलच आहेत. 

सहा महिन्यापूर्वी मागील फेब्रूवारी महिन्यात साखळी परिसरात एका विवाहित महिलेचा खून करण्याची घटना घडली होती. मागील २८ फेब्रुवारी रोजी कुळण-कारापूर येथे कालव्यात  धनश्री धर्मा मोरजकर या रावण-सत्तरी येथील विवाहित महिलेचा मृतदेह आढळून आला होता. धनश्री हिचा गळा आवळून खून करण्यात आल्याचे उत्तरीय तपासणीअंती निष्पन्न झाले होते. याप्रकरणी पोलिसांनी योग्यदिशेने तपास करताना संययिताच्या मुसक्‍या आवळल्या आहेत.

संबंधित बातम्या