मुरगाव पालिका कर्मचारी पगाराविना

Baburao Revankar
रविवार, 9 ऑगस्ट 2020

पालिकेच्या तिजोरीत खडखडाट असल्याने कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन देता आला नाही. आणखी किमान आठ दिवस वेतन मिळणे अशक्य आहे, असे मत मुरगाव पालिकेचे मुख्याधिकारी अरविंद बुगडे यांनी व्यक्त केले. वेतन मिळेपर्यंत पालिका कर्मचारी संपावर, जातील असा इशारा कर्मचारी संघटनेचे नेते केशव प्रभू यांनी दिला. 

मुरगाव
पालिकेच्या तिजोरीत खडखडाट असल्याने कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन देता आला नाही. आणखी किमान आठ दिवस वेतन मिळणे अशक्य आहे, असे मत मुरगाव पालिकेचे मुख्याधिकारी अरविंद बुगडे यांनी व्यक्त केले. वेतन मिळेपर्यंत पालिका कर्मचारी संपावर, जातील असा इशारा कर्मचारी संघटनेचे नेते केशव प्रभू यांनी दिला. 
मुरगाव पालिकेची करोडो रुपयांची थकबाकी आहे. ती वसूल झाली असती तर वेतनाचा प्रश्नच निर्माण झाला नसता, असे श्री. बुगडे म्हणाले. जकात कराचे अनुदान सरकारकडे आहे. ते मिळाले तर वर्षभर चिंताच नाही. पण, नजिकच्या काळात ते मिळणे शक्य नसल्याने पालिकेला वेतनाची तरतूद करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. 
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर टाळेबंदी घोषित केल्यामुळे पालिकेच्या मिळकतीवर परीणाम झाला आहे. सध्या टाळेबंदी उठवली असली तरी वास्को परिसरात कोरोनाचा कहर वाढलेला आहे. त्यामुळे घरपट्टी, परवाना नुतनीकरण शुल्क भरण्यासाठी लोक पालिकेत येत नाहीत. वसुली विभागाच्या कर्मचाऱ्यांनाही लोकांच्या घरापर्यंत पाठवू शकत नाही. या सर्व कारणांमुळे पालिकेच्या तिजोरीवर ताण आला आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन देणे शक्य झाले नसल्याचे श्री. बुगडे यांनी सांगितले. 
दरम्यान, पालिकेत मेंटेनन्स विभागात कंत्राटावर काम करणाऱ्यांना वेतन वितरीत केल्याचे त्यांनी सांगितले. इतरांचे वेतन देण्यास किमान आठ दिवस लागतील, असे ते म्हणाले. 
नगराध्यक्ष नंदादीप राऊत यांनी पालिका कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन न मिळण्याचे कारण देताना सांगितले की, कोरोनामुळे पालिकेची मिळकत कमी झाल्याचे सांगितले. मुख्यधिकारी बुगडे यांनी विविध परवान्यांच्या फाईल्स लगेच हातावेगळ्या केल्यास पालिकेच्या तिजोरीत पैसे जमा होऊन वेतनाचा प्रश्न सुटू शकतो. पण, तसा प्रयत्न होत नाही. लोकांचे व्यावसायिक परवाने, घर दुरुस्ती, घरपट्टी हस्तांतरण ह्या अनेक फाईल्स गेल्या कित्येक दिवसांपासून मुख्याधिकाऱ्यांकडे पडून आहे, असे श्री. राऊत यांनी सांगितले. यापूर्वी वेतनाचा प्रश्न निर्माण झाला तेव्हा कायम ठेवीतून कर्मचाऱ्यांचे वेतन देण्यात आले. पण, या खेपेस शक्य नसल्याचे ते म्हणाले. 

संपादन ः संदीप कांबळे

Goa Goa Goa

संबंधित बातम्या