डिचोली येथील बसस्थानकावरील युवकाबाबत गूढ ?

प्रतिनिधी
सोमवार, 14 सप्टेंबर 2020

डिचोली बसस्थानकावर एक पंचविशीतला युवक संशयास्पद अवस्थेत असून, मागील आठ दिवसांपासून या युवकाने बसस्थानकावरच आश्रय घेतला आहे.

डिचोली: डिचोली बसस्थानकावर एक पंचविशीतला युवक संशयास्पद अवस्थेत असून, मागील आठ दिवसांपासून या युवकाने बसस्थानकावरच आश्रय घेतला आहे. त्याची बोलीभाषा आणि त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार संबंधीत युवक झारखंड येथील असल्याचे कळते. हा युवक डिचोलीतील बसस्थानकावर कसा आणि कोठून आला, त्याबद्‌दल मात्र गूढ निर्माण झाले आहे. संबंधीत युवक अशक्‍त वाटत असल्याने, या युवकाचे बसस्थानकावरच बरेवाईट तर होणार नाही ना, असा प्रश्‍न बसस्थानकावरील दुकानदार आणि प्रवासी व्यक्‍त करीत आहेत. या युवकाच्या एका पायाला जखम झाली असून, तो अशक्‍त वाटत आहे. 

युवकाबाबत गूढ ?
मागील जवळपास आठ दिवसांपासून या युवकाने कदंब बसस्थानकावरच आश्रय घेतला आहे. दिवसभर बसस्थानकावरील सोफ्यावर तो आपल्याच विश्वात हरवल्यागत बसून असतो. मध्येच सोफ्यावरच आड होणे, हा त्याचा नित्यक्रम ठरलेला आहे. तो कोणाकडेच काहीच मागत नाही. काही मिळेल ते खाऊन तो आपली गुजराण करीत आहे. त्याची दया येणारे काहीजण त्याला खायला काहीतरी देतात. अशी माहिती बसस्थानकावरील नियमित प्रवासी तसेच काही दुकानदारांकडून मिळाली. यासंबंधी संबंधित युवकाकडे चौकशी केली असता, आपण झारखंड येथील असून, राजेश दुंडूर असे नाव असल्याचे त्यांनी सांगितले. मासेमारी करणाऱ्या बोटीवर काम करण्यासाठी आपण मागील महिन्यात गोव्यात आल्याचे त्यांनी सांगितले. डिचोलीत येण्यापुर्वी तो नेमका कोठे आणि कोणाकडे कामाला होता. त्याबद्‌दल मात्र त्याच्याकडून निश्‍चित माहिती मिळू शकली नाही. आपणाजवळ ५ हजार रुपये होते आणि मोबाईल होता. मात्र पैसे आणि मोबाईल हरवल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, त्यांनी दिलेली माहिती खरी की खोटी ते त्यालाच माहित. मात्र, या युवकाचे बसस्थानकावरील आश्रयाबद्‌दल गूढ निर्माण झाले आहे. मध्यंतरी पोलिसांनी या युवकाची चौकशी करुन त्याला आपल्या गावी परतण्याचा सल्ला दिला होता. अशी माहिती मिळाली आहे.

संबंधित बातम्या