नंदा लोलयेकर स्पर्धेने गोव्यात स्पर्धात्मक क्रिकेट रंगणार

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 6 नोव्हेंबर 2020

कोरोना विषाणू महामारी पार्श्वभूमीवर गोव्यात आता मैदानावरील क्रिकेटची प्रक्रिया सुरू होत आहे. माशे क्रिकेट क्लबच्या नंदा लोलयेकर करंडक स्पर्धेने राज्यात स्पर्धात्मक क्रिकेटला प्रारंभ होईल.

पणजी  : कोरोना विषाणू महामारी पार्श्वभूमीवर गोव्यात आता मैदानावरील क्रिकेटची प्रक्रिया सुरू होत आहे. माशे क्रिकेट क्लबच्या नंदा लोलयेकर करंडक स्पर्धेने राज्यात स्पर्धात्मक क्रिकेटला प्रारंभ होईल.

एकदिवसीय सामन्यांची नंदा लोलयेकर करंडक ही गोव्यातील एकमेव स्पर्धा आहे. यंदा स्पर्धेचा ३९वा मोसम आहे. कॉमनवेल्थ डेव्हलपर्स यांच्यातर्फे पुरस्कृत स्पर्धा माशे-काणकोण येथील निराकार मैदानावर येत्या १५ नोव्हेंबरपासून खेळली जाईल, असे क्लबचे अध्यक्ष डॉ. सुरेंद्र नाईक यांनी कळविले आहे. 
कोविड-१९ विषयक मार्गदर्शक शिष्टाचार पाळून ही स्पर्धा खेळली जाईल, मात्र गोवा क्रिकेट असोसिएशनच्या निर्देशानुसार महामारी परिस्थितीमुळे सुरक्षिततेच्या कारणास्तव गोव्याच्या संभाव्य रणजी संघात निवड झालेल्या ३१ खेळाडूंना या वर्षी या स्पर्धेत खेळता येणार नाही. 

नंदा लोलयेकर करंडक स्पर्धेत गोवा क्रिकेट असोसिएशनशी नोंदणी असलेल्या क्लबना भाग घेता येईल. माहितीसाठी सुदिन (दत्ता) लोलयेकर (९४२२६४०६४०), विशाल लोलयेकर (९०४९७७७०५०), संतोष सतरकर (९२८४५६११९६) किंवा यश प्रभुगावकर (९०४९६०१३२९) यांच्याशी संपर्क साधावा. सामने प्रत्येक शनिवार व रविवारी खेळले जातील. जानेवारी अखेरपर्यंत स्पर्धा संपविण्याचे आयोजकांचे नियोजन आहे. फेब्रुवारी महिन्यापासून गोवा क्रिकेट असोसिएशनतर्फे निराकार मैदानाच्या नूतनीकरणाचे काम सुरू केले जाईल, त्यामुळे स्पर्धा लवकर संपविण्यावर आयोजकांचा भर राहील, असे डॉ. सुरेद्र नाईक यांनी स्पष्ट केले 
आहे.

संबंधित बातम्या