मुरगावचे नगराध्यक्ष राऊत यांच्या बोलण्यातून कोट्यावधींची उड्डाणे

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 13 ऑक्टोबर 2020

वास्को मासळी मार्केट, मुरगाव पालिका इमारत नुतनीकरण, बायणा पावर हाऊस आणि सडा कचरा प्रकल्प या चारही प्रकल्पांवर आपल्या कार्यकाळात ३० कोटी रुपये खर्च करण्याची अनुमती घेण्यात आली आहे. जर मुदतवाढ मिळाल्यास आणखी ९ कोटी खर्चाची कामे हाती घेतली जातील, असे श्री. राऊत यांनी सांगितले.​

मुरगाव- नगराध्यक्ष या नात्याने मी मुरगाव पालिका क्षेत्रातील जनतेला काय दिले असे विचारू नका. कारण मी कोट्यवधी रुपये खर्चाचे प्रकल्प घोषित करणारा गोव्यातील एकमेव नगराध्यक्ष असेल, असे मुरगावचे नगराध्यक्ष नंदादीप राऊत यांनी पालिका कार्यालयातील आपल्या दालनात पत्रकारांना सांगितले.

वास्को मासळी मार्केट, मुरगाव पालिका इमारत नुतनीकरण, बायणा पावर हाऊस आणि सडा कचरा प्रकल्प या चारही प्रकल्पांवर आपल्या कार्यकाळात ३० कोटी रुपये खर्च करण्याची अनुमती घेण्यात आली आहे. जर मुदतवाढ मिळाल्यास आणखी ९ कोटी खर्चाची कामे हाती घेतली जातील, असे श्री. राऊत यांनी सांगितले.

विद्यमान मुरगाव पालिका मंडळाचा कार्यकाळ येत्या दोन आठवड्यात संपुष्टात येत आहे. त्यामुळे निवडणुका होणे आवश्यक होते, पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तीन महिने निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे. विद्यमान कार्यकाळ संपुष्टात आल्यावर पालिकेवर प्रशासकीय राजवट येते की निवडणूक होईपर्यंत सध्याचा कार्यकाळ वाढविण्यात येणार आहे हे अद्याप स्पष्ट नाही, तरीही नगराध्यक्ष नंदादीप राऊत आशावादी आहेत. कार्यकाळ वाढवून मिळाल्यास भरपूर कामे हाती घेतली जातील, असे त्यांनी सांगितले. १५ व्या वित्त आयोगाचाही निधी मिळणार असल्याचे ते म्हणाले.

आपण गेले १५ महिने नगराध्यक्षपदावर आहे. या काळात भरीव विकासावर लक्ष केंद्रीत करून कार्य केले. १४ व्या वित्त आयोगाचे २३ कोटी रुपये सरकारच्या सुडाकडे सुपुर्द करून तीन मोठे प्रकल्प उभारण्यास पुढाकार घेतला. वास्कोकरांचे स्वप्न असलेले मासळी मार्केट बांधण्यासाठी प्राधान्य दिले आहे. त्यावर १० कोटी रुपये खर्च केले जात असल्याचे श्री. राऊत यांनी सांगितले. पालिका इमारत नुतनीकरण हाही महत्त्वाचा प्रकल्प आहे. त्यासाठीही १० कोटी रुपये खर्च करण्यात येत असल्याचे ते म्हणाले. बायणा येथील बहुउद्देशीय पावर हाऊस प्रकल्प आणि सडा कचरा प्रकल्प या दोन्हीवर १० कोटींचा खर्च केला जाणार आहे, अशी माहिती श्री. राऊत यांनी देऊन एव्हढ्या मोठ्या खर्चाचे प्रकल्प गोव्यातील इतर कोणत्याच पालिका क्षेत्रात उभारण्यात येणार नाही ते आपण नगराध्यक्ष या नात्याने उभारण्यास पुढाकार घेतल्याचे ते म्हणाले.

आपल्याला मुदतवाढ मिळाल्यास १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून अधिक प्रमाणात विकास प्रकल्प राबविले जातील, असे श्री.राऊत यांनी सांगून कोरोना महामारीमुळे विकासकामे राबविण्यात काही प्रमाणात अडचणी आल्याचे ते म्हणाले. एव्हाना अनेक प्रकल्पांना चालना मिळाली असती, असेही ते म्हणाले.

संबंधित बातम्या