सत्तरीतील नाणूस किल्ल्याचे होणार नूतनीकरण; मुख्यमंत्र्यांची घोषणा

UNI
शुक्रवार, 29 जानेवारी 2021

सत्तरी तालुक्यातील ऐतिहासिक नाणूस किल्ल्याचे गोवा स्वातंत्र्याच्या हीरक महोत्सवी वर्षात नूतनीकरण होणार असून याबाबतची घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेचे सत्तरी इतिहास संवर्धन समितीचे समन्वयक अॅड. शिवाजी देसाई यांनी स्वागत केले आहे.

गुळेली - सत्तरी तालुक्यातील ऐतिहासिक नाणूस किल्ल्याचे गोवा स्वातंत्र्याच्या हीरक महोत्सवी वर्षात नूतनीकरण होणार असून याबाबतची घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेचे सत्तरी इतिहास संवर्धन समितीचे समन्वयक अॅड. शिवाजी देसाई यांनी स्वागत केले आहे. 

गेल्या अनेक वर्षांपासून सत्तरी इतिहास संवर्धन समिती दरवर्षी २६ जानेवारीला ‘चलो नाणूस किल्ला’ ही चळवळ आयोजित करते. या निमित्ताने २६ जानेवारी १८५२ या दिवशी जी क्रांतिवीर दीपाजी राणे यांनी पोर्तुगीजांविरोधात क्रांती करून सत्तरीवर तब्बल तीन वर्ष सार्वभौम सत्ता गाजवली त्या क्रांतीच्या आठवणींना उजळा देण्यासाठी हा कार्यक्रम करण्यात येतो. इतिहास संवर्धन समितीने सुरवातीपासून हा विषय लावून धरला. त्यासाठी सरकारला अनेक निवेदने दिली. एवढेच नव्हे, तर नाणूस किल्ल्याचा नेमका सर्वे नंबर कोणता? याची कागदपत्रे मिळत नव्हती. ही कागदपत्रे इतिहास संवर्धन समितीने अनेक ठिकाणाहून मिळविली. तसेच माहिती अधिकारातून अनेक अर्ज केले. सरकारला सर्वेक्षण करण्यास भाग पाडले. माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांनीदेखील या किल्ल्याचे सरकारी अधिकाऱ्यांमार्फत सर्वेक्षण केले. इतिहास संवर्धन समितीने अनेक सरकारी अधिकाऱ्यांच्या भेटी घेतल्या आणि या किल्ल्याचे दस्तावेज उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर यांच्या कार्यालयात सादर केले. त्यावर अभ्यास केला आणि मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना याबाबतीत ई-मेल देखील केला आणि त्याची फलनिष्पत्ती म्हणजे नाणूस किल्ल्याचे नूतनीकरण करण्याची घोषणा सरकारने केली. 

यासंदर्भात सत्तरी इतिहास संवर्धन समितीचे समन्वयक अॅड. शिवाजी देसाई म्हणाले, की हे यश तात्पुरते आहे. ही केवळ घोषणा ठरता कामा नये. इतिहास संवर्धन समितीच्या टीमने यासाठी प्रचंड मेहनत घेतली आहे. त्याचबरोबर नाणूस किल्ल्याचे संवर्धन होत असताना या संवर्धनाच्या माध्यमातून सत्तरीतील युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील याकडे आपण पाहिले पाहिजे. तसेच क्रांतिवीर दीपाजी राणे यांचा अश्वारूढ पुतळा वाळपई येथील हाथ चौकात उभा राहायला हवा. तसेच क्रांतिवीर दीपाजी राणे यांचे नाव वाळपई सरकारी इस्पितळाला द्यावे आणि त्याचबरोबर वाळपई ते फोंडा रस्त्याला क्रांतिवीर दीपाजी राणे यांचे नाव देणे आवश्यक आहे. इतिहास संवर्धन समितीने उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर यांचेही आभार मानले आहेत. त्यांनी याबाबत अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली असल्याचे त्यांनी सांगितले.

Edited By - Prashant Patil

संबंधित बातम्या