Artist in Goa : संतुरवादनात डॉक्टरेट मिळालेला एकमेवाद्वितीय गोमंतकीय कलाकार

गोमंतकीय प्रतिभाशाली संतुरवादक नरेश मडगावकर यांनी आपल्या कर्तृत्वाने ही कठीण गोष्ट साध्य करून दाखविली आहे.
Naresh Madgaonkar
Naresh Madgaonkar Dainik Gomantak

Naresh Madgaonkar : हार्मोनियम शिकता शिकता संतूर सारखे कठीण वाद्य वाजविण्याचा ध्यास घेऊन, त्या वाद्यावर एक गोमंतकीय तरुण प्रभुत्व मिळवतो आणि साऊथ वेस्टर्न अमेरिकन युनिव्हर्सिटीची संतुरमध्ये डॉक्टरेट मिळवतो ही गोष्टच मुळी थक्क करणारी आहे. गोमंतकीय प्रतिभाशाली संतुरवादक नरेश मडगावकर यांनी आपल्या कर्तृत्वाने ही कठीण गोष्ट साध्य करून दाखविली आहे.

वयाच्या आठव्या वर्षी नरेशच्या वयाची मुलं खेळात रमत तेव्हा नरेशच्या हातात हार्मोनियम हे वाद्य आले. म्हापसा येथील स्वरशृंगार संगीत विद्यालयात, संगीत शिक्षक राजेंद्र सिंगबाळ यांच्याकडे तो हार्मोनियमवादनाचे शिक्षण घेऊ लागला. त्या दरम्यान महान संतुरवादक पं. शिवकुमार शर्मा यांचे वादन नरेशने ऐकले आणि तो एवढा प्रभावित झाला की त्या वाद्याचा ध्यासच त्याने घेतला. संतूर शिकविणारे गोव्यात कोणी नव्हते कारण संतुरवादनाच्या वाटेला जाऊन त्यावर प्रभुत्व मिळविणे हे फार आव्हानात्मक होते.

नरेशने प्रारंभी एकलव्याप्रमाणे एकट्यानेच संतुरची साधना केली आणि बऱ्यापैकी ते आत्मसात केले. तो संतुरवादनाचे कार्यक्रमही करू लागला. दरम्यान नामवंत हार्मोनियमवादक डॉ.सुधांशु कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाचा लाभ त्याला झाला आणि त्याची प्रगतीकडे वाटचाल सुरू झाली. कालांतराने ख्यातनाम संतुरवादक पं. सतीश व्यास यांचे शिष्यत्त्व त्याला लाभले आणि त्याच्या वादनाला खऱ्या अर्थाने प्रतिष्ठा लाभली. बऱ्याच तांत्रिक खुबी, खाचखळगे त्याला शिकायला मिळाले. आपले ज्येष्ठ बंधू तबलावादक सतीश मडगावकर यांच्यासह त्याने आजपर्यंत संतुरवादनाचे 2700 कार्यक्रम केले आहेत.

Naresh Madgaonkar
Pratika Marathe : भरतनाट्यम क्षेत्रातला उगवता गोमंतकीय तारा

‘मोक्ष’ हे नरेशचे फ्युजन बँड आहे. पाश्चात्त्य शास्त्रीय संगीत वाद्यवृंदात संतूर वाजविणारा तो एकमेव वादक असावा. ‘स्टोकहोम फेस्टिवल’- स्वीडन, ‘दिल्ली कला महोत्सव’, ‘आंतरराष्ट्रीय श्रावण महोत्सव’, ‘आयसीसीआर, मुंबई’, ‘सम्राट व सूरश्री केसरबाई संगीत संमेलन’- गोवा, ‘गुजरात आर्ट फेस्टिवल’- गांधीनगर, ‘हिमाचल कला महोत्सव’ अशा प्रतिष्ठित संगीत महोत्सवात आपले संतुरवादन सादर करून नरेशने वाहवा मिळवली आहे. त्याच्या वादनाचे अल्बमही निघाले आहेत. ‘स्वरकुल’- पुणे या संस्थेचा महाराष्ट्र भूषण, पुणे येथील स्वामी विवेकानंद संगीत रत्न व पुण्य भूषण, गुजरात येथील एनहान्स ग्रुपचा स्पंदन, लोककल्याण साधना मुंबई, अक्षरमंच मुंबईचा महाराष्ट्र गौरव अशा पुरस्कारांनी त्याला गौरविण्यात आले आहे. नरेशची सांगीतिक वाटचाल गौरवास्पद आहे. या कलाकाराकडून तरुण होतकरू कलाकारांनी स्फूर्ती घ्यावी असेच त्याचे कर्तृत्व आहे.

- नितीन कोरगावकर

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com