National Dengue Day : गोव्यात डेंग्यू रुग्णांच्या संख्येत घट
सासष्टी : आरोग्य खात्यातर्फे आज, मंगळवारी मडगावातील नागरी आरोग्य केंद्रामध्ये राष्ट्रीय डेंग्यू दिवस साजरा करण्यात आला. याप्रसंगी गोव्यातील ‘एनव्हीबीडीसीपी’च्या राज्य कार्यक्रम अधिकारी डॉ. कल्पना महात्मे यांनी भारतातील डेंग्यूसंदर्भातील माहिती दिली. गोव्यात डेंग्यू रुग्णांच्या संख्येत घट झाली असली तरी सर्व नागरिकांनी सतर्क राहिले पाहिजे. तसेच सर्वांनी एकत्र येऊन डेंग्यू रोग पसरणार नाही याची खबरदारी घेतली पाहिजे, असे त्या म्हणाल्या.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रंजिता पै, दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळाचे प्रमुख डॉ. राजेंद्र बोरकर, मडगाव नागरी आरोग्य केंद्राचे प्रमुख डॉ. सुकुरो क्वाद्रोस, शिक्षण खात्याचे साहाय्यक संचालक मेल्विन डिकॉस्ता, गोवा कॅनचे निमंत्रक रोलंड मार्टिन्स तसेच आरोग्य क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
डेंग्यू, मलेरिया या रोगांच्या निर्मूलनासाठी नागरी आरोग्य केंद्राला जी मदत लागेल, ती मडगाव पालिकेतर्फे पुरविली जाईल, असे आश्र्वासन नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर यांनी दिले. डॉ. सपना साखळकर यांनी स्वागत केले. डॉ. प्रतिष्ठा कुंकळयेकर यांनी सूत्रसंचालन केले, तर संजय म्हाऊसकर यांनी आभार मानले.
स्वच्छता हाच पर्याय
डेंग्यू हा रोग डासांमुळे फैलावतो. त्यामुळे जिथे जिथे डासांची पैदास होते, ती ठिकाणे स्वच्छ ठेवली पाहिजेत, डेंग्यूविषयी जागृती करण्यासाठी बालवाडी, अंगणवाडी कामगारांसोबत जे स्वयंसाहाय्य गट आहेत, त्यांचीही मदत घेतली पाहिजे. गोव्यातील आरोग्य सेवा इतर राज्यांपेक्षा पुष्कळ चांगली असल्याचे महात्मे यांनी यावेळी सांगितले.
सर्वाधिक रुग्ण मडगावात
भारतातील २९ राज्यांमध्ये 2022 साली 2 लाख 33 हजार डेंग्यूचे रुग्ण होते. त्या वर्षी डेंग्यूमुळे 303 रुग्णांचा मृत्यू झाला. भारतात सर्वाधिक डेंग्यूचे रुग्ण 67, 271 पश्र्चिम बंगालात आहेत. 2021 साली गोव्यात 649 रुग्ण, 2022 साली 443 तर एप्रिल 2023 पर्यंत 39 रुग्ण आढळले आहेत. दक्षिण गोव्यात सर्वाधिक 31 रुग्ण मडगावात, तर उत्तर गोव्यात सर्वाधिक 67 रुग्ण म्हापशामध्ये आढळल्याचे डॉ. महात्मे म्हणाल्या.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.