गोव्यातील मुलींचा जन्‍मदर सरासरी घटला, काय आहेत नेमकी निरीक्षणं ?

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 18 डिसेंबर 2020

राष्ट्रीय कौटुंबीक आरोग्य सर्व्हेक्षण २०१९- २०नुसार (एनएफएचएस) राज्यातील मुलींचा जन्‍मदर घटला आहे. राज्यात १००० मुलांच्या तुलनेत ८३८ मुली आहेत.

पणजी : राष्ट्रीय कौटुंबीक आरोग्य सर्व्हेक्षण २०१९- २० नुसार (एनएफएचएस) राज्यातील मुलींचा जन्‍मदर घटला आहे. राज्यात १००० मुलांच्या तुलनेत ८३८ मुली आहेत. २०१५- १६ सालच्या सर्व्हेक्षणात जन्‍मदर सरासरीत १००० मुलांमागे ९६६ मुली एवढे होते. तर दुसऱ्या बाजूला राज्यातील मुलींचा जन्‍मदरसुद्धा मागील वर्षीच्या सर्व्हेमध्ये १.७ वरून १.३ आल्याची माहिती मिळाली. या दोन्ही गोष्टी सामाजिक स्वास्थ्याच्या बाबतीत धोक्याची सूचना देत आहेत. 

हे सर्व्हेक्षण अनेक वेगवगेळ्या गोष्टींबाबत गंभीर स्वरूपाची माहिती देते. ग्रामीण भागामध्ये मुलींचा जन्‍मदर प्रमाण चांगले असल्याची माहिती सर्व्हेक्षणातून मिळते. ग्रामीण भागामध्ये १००० मुलांमागे १०९२ मुली असल्याची माहिती सर्व्हेक्षण अहवाल देतो, तर शहरी भागात हे प्रमाण मुलींच्‍या बाबतीत अतिशय कमी असल्याची धक्कादायक माहितीसुद्धा या सर्व्हेमधून मिळते. कारण शहरी भागात १००० मुलांमागे ९८६ मुली असे आहे. याचाच अर्थ शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागातील लिंग गुणोत्तर चांगले आहे. मागील पाच वर्षांत राज्यात जन्म झालेल्या १०० टक्के बाळांची सरकारी नोंद झाली आहे. 

 

सर्वेक्षणात काय म्‍हटले?

काही गोष्टींच्या बाबतीत हा सर्व्हे प्रगती झाल्याची माहिती देतो. सहा वर्षे वय असणाऱ्या मुलींनी शाळेत हजर राहण्याचे प्रमाण यावर्षी चार टक्क्यांनी वाढले आहे. २०१५- १६ साली राज्यात हे प्रमाण ८५.० टक्के इतके होते. यावर्षी ते ८९.० टक्क्यांपर्यंत वाढले आहे. मुलीचे लग्न १८ वर्षांच्या पूर्वी होऊ नये म्हणून आपल्याकडे कायदा कार्यरत आहे. २०१५-१६ सालच्या आकडेवारीनुसार राज्यात १८ वर्षांपेक्षा कमी वय असणाऱ्या मुलींच्या लग्नाचे प्रमाण ९.८ होते. यावर्षीच्या सर्व्हेनुसार हे प्रमाण ५.८ इतके असून ते कमी झाले आहे. १५ ते १९व्या वर्षात आई होणाऱ्या मुलींचे २०१५-१६ साली असणारे प्रमाण १६ टक्के होते. यावर्षीच्या सर्व्हेनुसार केवळ दोन टक्क्यांनी कमी झाले आहे, म्हणजेच यावर्षी हे प्रमाण १४ टक्के आहे. मुलगा आणि मुलींच्‍या शिक्षणाच्‍या बाबतीतसुद्धा हा सर्व्हे महत्त्‍वाची माहिती देतो. राज्यात शिक्षित पुरुषांचे प्रमाण ९६.३ टक्के आहे, तर शिक्षित महिला ९३ टक्के प्रमाण आहेत. इतकेच नव्हे तर इंटरनेट वापरणाऱ्या महिलांचे प्रमाण ७३.७ टक्के आहे आणि पुरुषांचे प्रमाण ८२.९ टक्के इतके आहे.

"जन्‍मदर सरासरी प्रमाण राज्यात कमी असण्याचे मुख्य कारण तणाव आहे. एकत्रित कुटुंबाची संकल्पना मागे पडली असून स्वतंत्र कुटुंबपद्धती अनेकांनी स्‍वीकारली आहे. कार्यालयीन, घरातील कामाचा ताण दिवसेंदिवस वाढत आहे त्‍यामुळेसुद्धा मूल होण्यासाठी समस्या निर्माण होत आहेत. कारण मूल होण्यासाठी जितके शारीरिक आरोग्य चांगले असावे लागते, तितकेच मानसिक आरोग्यसुद्धा तणावरहित असायला हवे. तुम्हाला दोन मुले असतील तर कर्करोग होण्याची शक्यता अत्यल्प होते. मद्यपान आणि धुम्रपान करणाऱ्या महिलांमध्येसुद्धा जन्‍मदर प्रमाण कमी होते. पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये या कारणांमुळे मूल न होण्याचे प्रमाण कमी आहे."
- डॉ. शेखर साळकर, कर्करोग तज्‍ज्ञ.

अधिक वाचा :

गोव्यामध्ये ऐन सणासुदीच्या काळात बीफचा तुटवडा होऊ देणार नाही ; मुख्यमंत्र्यांचं आश्वासन

गोवा मुक्तिसंग्रामाच्या हीरक महोत्‍सवी वर्षासाठी गोवा सज्ज : राष्‍ट्रपतींच्‍या आगमनाची तयारी

 

संबंधित बातम्या