पणजी महापालिकेच्या हरकती विचारात घ्या

दैनिक गोमन्तक
शनिवार, 19 डिसेंबर 2020

कचरा हाताळण्यासंदर्भात दिलेल्या निर्देशांचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवून १८ लाख रुपये जमा करण्याचा आदेश राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिला होता

पणजी: कचरा हाताळण्यासंदर्भात दिलेल्या निर्देशांचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवून १८ लाख रुपये जमा करण्याचा आदेश राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिला होता त्याला पणजी महापालिकेने दिल्लीतील राष्ट्रीय हरित लवादाकडे आव्हान अर्ज सादर केला होता. या अर्जावर व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सुनावणी होऊन लवादाने तो निकालात काढताना मंडळाला महापालिकेने उपस्थित केलेल्या हरकती विचारात घेऊन गुणवत्तेवर निर्णय द्यावा असा आदेश दिला 
आहे. 

पणजी महापालिका क्षेत्रातील कचरा विल्हेवाटीच्या ठिकाणी राज्य नियंत्रण मंडळाने दिलेल्या निर्देशांनुसार कचऱ्याची हाताळणी केली जात असल्याचा दावा अर्जात करण्यात आला होता. त्यासंदर्भातची माहिती मंडळाला देऊनही १८ लाख रुपये जमा करण्याचे निर्देश दिले आहेत ते बेकायदेशीर आहेत. या कचरा विल्हेवाटीमुळे पर्यावरणाला धोका व कोणतेच नुकसान झालेले नाही. तरीही मंडळाने नुकसान झाल्याचा ठपका ठेवला आहे योग्य नाही. 

राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने जारी केलेल्या आदेशात कचरा हाताळणीसंदर्भात झालेल्या चुकारपणाबद्दल कोणताच उल्लेख केलेला नाही. पणजी महापालिका व राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ या अधिकृत संस्था असल्याने या आव्हान अर्जावर सुनावणी घेण्यापेक्षा ते दोघेही त्यावर तोडगा काढू शकतात.

संबंधित बातम्या