दिवाळीतील प्रदूषण रोखण्याचा राष्ट्रीय हरित लवादाचा आदेश

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 10 नोव्हेंबर 2020

कोविड महामारीच्या काळात दिवाळीत हवेतील प्रदूषण फटाक्यांमुळे आणि अन्य स्रोतांतून वाढू नये, याची दक्षता राज्य सरकारांनी घ्यावी असा आदेश राष्ट्रीय हरित लवादाने जारी केला आहे.

पणजी  : कोविड महामारीच्या काळात दिवाळीत हवेतील प्रदूषण फटाक्यांमुळे आणि अन्य स्रोतांतून वाढू नये, याची दक्षता राज्य सरकारांनी घ्यावी असा आदेश राष्ट्रीय हरित लवादाने जारी केला आहे. ज्या भागात हवेतील प्रदूषणाने कमाल मर्यादा ओलांडली आहे, तेथे फटाक्यांवर बंदी घालण्यात यावी असेही लवादाने आपल्या आदेशात नमूद केले आहे. ज्या भागात हवेतील प्रदूषण कमी वा अल्प आहे त्या भागात हरित फटाके लावण्यास परवानगी असावी. मात्र, त्यावर नियंत्रण असावे असे लवादाने स्पष्ट केले आहे.

 याविषयासंदर्भात लवादाने स्वेच्छादखल याचिका दाखल करून घेतली आहे. या विषयासंदर्भात चिराग जैन यांनी मूळ अर्ज केला होता. लवादाने आपल्या आदेशात देशभरात फटाक्यांवरील बंदीसाठी असलेले विविध कायदे, त्यांच्या तरतुदी, प्रशासकीय आदेश, राज्य सरकारांनी केलेली उपयायोजना यांचा विस्तृत आढावा घेतला आहे. तमिळनाडू राज्याने शिवकाशी परिसरातील जनता फटाके बनवण्याच्या व्यवसायावर उपजिविकेसाठी कशी अवलंबून आहे, याविषयी लवादासमोर केलेले निवेदनही या आदेशात समाविष्ट करण्यात आले आहे.

फटाक्यांपासून प्रदूषण होणार नाही याची काळजी घेण्याची जबाबदारी लवादाने राज्याचे मुख्य सचिव आणि पोलिस महासंचालकांवर सोपवली आहे. त्यांनी आपापल्या राज्यात याविषयीचे आदेश जारी करावे असे लवादाने सांगितले आहे. दिवाळीनंतर येणाऱ्या नाताळ आणि नववर्ष स्वागतासाठीही हा आदेश लागू असेल असेही लवादाने स्पष्ट केले आहे. 
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि राज्या राज्यांतील प्रदूषण नियंत्रण मंडळाने हवेतील प्रदूषणावर नजर ठेवावी असे लवादाने आपल्या आदेशात नमूद केले आहे. या याचिकेवर १ डिसेंबरला पुढील सुनावणी होणार आहे तोवर कोणती उपाययोजना केली त्याची माहिती राज्य सरकारांनी लवादाला द्यावी, असे लवादाच्या आदेशात नमूद केले आहे.

संबंधित बातम्या