गोवा साधनसुविधा विकास महामंडळाने दखविला बेफिकीरपणा: राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण
National Highways Authority seeks clarification from Goa Construction Department

गोवा साधनसुविधा विकास महामंडळाने दखविला बेफिकीरपणा: राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण

मुरगाव: तब्‍बल ३२ कोटी रुपये खर्चून बायणा ते सडा-बोगदापर्यंत गेल्या सहा वर्षांपासून बांधण्यात येत असलेल्या रस्त्याचे काम अद्याप पूर्ण का होत नाही? याचा खुलासा बांधकाम खात्याने करावा, असा आदेश राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने दिला आहे. या विषयीची तक्रार सडा येथील आरटीआय कार्यकर्ते दामोदर दिवकर यांनी केली होती.

बायणा ते सडा - बोगदापर्यंतचा सुमारे ९ किलोमीटर लांबीचा २०१४ पासून गोवा साधनसुविधा विकास महामंडळाकडून बांधण्यात येणारा रस्ता अद्याप बांधून पूर्ण होत नाही, यामागे काहीतरी साटेलोटे असल्‍याचा संशय नागरिकांकडून व्यक्त होत आहे. या रस्त्याचे कासवगतीने आणि दर्जाबाबत प्रश्‍नचिन्ह निकृष्ट दर्जाचे काम चालले आहे, असा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे. मुरगाव बंदरातील वाहतुकीसाठी हा राष्ट्रीय महामार्ग १७ वरील रस्ता लवकरात लवकर बांधून पूर्ण करणे अत्यंत आवश्यक आहे. पण, त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे याची दखल घेऊन ‘दैनिक गोमन्‍तक’ने वृत्त प्रसिद्ध केले होते. त्यानंतर सडा येथील आरटीआय कार्यकर्ते दामोदर दिवकर यांनी वृत्ताची दखल घेत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे तक्रार केली 
होती.

काम का रखडले?
मुरगाव बंदराकडे जाणाऱ्या अवजड वाहनांसाठी ह्या महामार्गाचे रुंदीकरण लवकरात लवकर पूर्ण आवश्यक आहे. पण, गोवा साधनसुविधा विकास महामंडळाने बेफिकीरपणा दखविला आहे. कंत्राटदाराने गेल्या सहा वर्षांच्या काळात जेमतेम २५ टक्केच काम पूर्ण केले असून त्यामुळे उर्वरित शिल्लक काम कधीपर्यंत पूर्ण होईल, हे एक कोडे बनले आहे. 


मुरगाव बंदरारापर्यंत जाणाऱ्या ह्या रस्त्याचे रुंदीकरण होणे आवश्यक आहे. त्याच इराद्याने मंत्री मिलिंद नाईक यांनी पुढाकार घेऊन बायणा पासून ते सडा आणि बोगदापर्यंतच्या रस्त्याचे रुंदीकरण आणि सुशोभिकरण करण्याच्या कामाचे रणशिंग फुंकले होते. पण गोवा साधनसुविधा विकास महामंडळाकडून पुढे अपेक्षित काहीच हालचाली झाल्‍या नाहीत. रस्‍त्‍याचे काम का रखडले हे मात्र गुलदस्त्यात आहे.

गेल्या सहा वर्षांपासून या रस्त्याचे काम कासवगतीने सुरू आहे. मध्यंतरी कंत्राटदाराने पळ काढल्याने काम ठप्प झाल्याचे निमित्त महामंडळाने दिले होते. मध्यंतरी रेडकर हाऊस समोर रस्त्याचे फक्त रुंदीकरण करून काम बंद ठेवले आहे. दरम्यान, आरटीआय कार्यकर्ते दामोदर दिवकर यांनी या प्रकरणी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे तक्रार करून काम बंद का केले आहे, ह्याचा तपास करावा अशी मागणी केली आहे.

२५ टक्केसुद्धा काम झाले नाही!
दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर आणि विद्यमान मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांच्या उपस्थितीत बायणा ते सडा - बोगदापर्यंतच्या ९ किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या बांधकामाचा शुभारंभ ता. २६ ऑक्टोबर २०१४ रोजी सडा येथे मोठ्या समारंभपूर्वक करण्यात आला होता. ३२ कोटी खर्चून बांधण्यात येणाऱ्या या रस्त्यावर ठिकठिकाणी छोटे बगीचे, रस्ता रुंदीकरण, बस थांबे बांधण्याचे आराखड्यात नमूद केले होते. दीड वर्षात हा महत्त्वपूर्ण रस्ता बांधला जाईल अशीही घोषणा केली होती. पण, सहा वर्षे उलटली, तरी रस्त्याचे २५ टक्के सुद्धा काम पूर्ण झाले नाही

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com