‘सी फोम’ तयार होणे ही चिंताजनक बाब; किनारपट्टीतील लोकांना धोका

‘सी फोम’ तयार होणे ही चिंताजनक बाब; किनारपट्टीतील लोकांना धोका
sea foam.jpg

पणजी: दोन वर्षांपूर्वी 2019 मध्ये ‘सी फोम’ (Sea Foam) नावाचा प्रकार तयार झालेला पाहायला मिळाला होता. त्यात केरळ व तमिळनाडू यासह गोव्याचा (Goa) समावेश होता. या प्रकाराची गंभीर दखल घेऊन राष्ट्रीय सागरी विज्ञान संस्थेने (National Institute of Marine Science) त्याचा अभ्यास केला होता. त्याचा अहवाल समोर आला असून, ‘सी फोम’ तयार होणे ही जलस्रोतांच्या दृष्टीने गंभीर परिस्थिती आहे आणि त्याचे किनारपट्टीतील लोकांवर विपरित परिणाम होऊ शकतात, असा इशारा देण्यात आला आहे. 

2019 साली मान्सूनचे आगमन झाल्यानंतर वास्कोतील होले किनाऱ्यावर ‘सी फोम’ पाहायला मिळाला होता. त्याची दखल घेऊन राष्ट्रीय सागरी विज्ञान संस्थेने त्यामागची कारणे व किनारपट्टीवर त्याचा परिणाम यावर अभ्यास केला. हा अभ्यास त्या संस्थेच्या वैज्ञानिकांनी प्रसिद्ध केलेला आहे. 

‘सी फोम’ निर्माण होणे याकडे गंभीर बाब म्हणून पाहायला हवे. अन्यथा त्याच्यात माणसाच्या आरोग्यावर आणि गोव्याच्या पर्यटन उद्योगावर विपरित परिणाम करण्याची क्षमता आहे, याकडे त्यात लक्ष वेधण्यात आले आहे. या किनाऱ्यावर एरव्ही पर्यटकांची भरपूर गर्दी असते. जेथे ‘सी फोम’ तयार झाल्याचे पाहायला मिळाले ते ठिकाण जिथे लोक आंघोळ करायला जातात त्यापासून शंभर मीटर दूर आहे. हा किनारा प्रख्यात जपानी गार्डनलाही जोडलेला आहे. तिथे एरव्ही गर्दी असते आणि मुले त्या ठिकाणी भेट देत असतात. सदर मुले नंतर किनाऱ्यावरही जात असतात. त्यामुळे यासंदर्भात अधिक जागृती करण्याची आणि फोम व्यवस्थापन पद्धती असण्याची गरज असल्याचे सदर अहवालात म्हटले आहे. 

पोहायला जाणाऱ्यांना धोका..!
गोव्यातील राष्ट्रीय सागरी विज्ञान संस्थेचे वैज्ञानिक डॉ. सुहास शेट्ये यांच्या नेतृत्वाखाली वैज्ञानिकांनी या प्रकाराचा अभ्यास केला. याअंतर्गत फोमशी संबंधित बॅक्टेरियांचाही अभ्यास करण्यात आला. तसेच पृष्ठभागावरील पाण्याचे व इतर नमुने गोळा करण्यात आले. सदर फोमशी काही घातक बॅक्टेरिया निगडीत असल्याचे आणि अशा फोमची निर्मिती झाली असता मासेमारीला जाणारे मच्छीमार, पोहायला जाणाऱ्या व्यक्ती यांना त्यापासून धोका संभवतो, असेही या अहवालातून स्पष्ट झाले आहे.

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com