राष्ट्रीय पर्यटन दिन : गोव्यात आता घेता येणार 'निळाशार समुद्र ते हिरव्यागार शेतीचा' आनंद

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 25 जानेवारी 2021

‘इंडियन कोस्टल ॲग्रिकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूट’ने कृषी-पर्यावरणीय पर्यटन (‘ॲग्रो-इको टूरिझम’) या विषयाकडे लक्ष केंद्रीत करून त्यावरच अधिकाधिक भर देण्याचे ठरवले आहे.

म्हापसा :  जुने गोवे येथील ‘आयसीएआर’/ ‘सीसीएआरआय’ अर्थांत ‘इंडियन कोस्टल ॲग्रिकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूट’ने कृषी-पर्यावरणीय पर्यटन (‘ॲग्रो-इको टूरिझम’) या विषयाकडे लक्ष केंद्रीत करून त्यावरच अधिकाधिक भर देण्याचे ठरवले आहे. नियमित पर्यटकांव्यतिरिक्त अन्य देशी-विदेशी पर्यटकांना आकर्षित करण्याच्या उद्देशाने हा ‘ॲग्रो-इको टूरिझम’ उपक्रम राबवण्यात येत आहे. त्या ठिकाणी भेटी देणाऱ्यासाठी ‘पाहण्याजोगे काहीतरी’, ‘अनुभव घेण्याजोगे काहीतरी’ आणि ‘खरेदी करता येण्याजोगे काहीतरी’ अशा स्वरूपाचा एकत्रित उपक्रम राबवण्यात येत आहे.

गोव्यात बरे होणाऱ्या कोरोना रुग्णांची संख्या दुप्पट

पर्यटन आणि कृषिविषयक उपक्रमांच्या समन्वयातून नवनवीन व्यवसायक्षेत्रे गोवावासीयांना उपलब्ध होण्याचे सामर्थ्य लक्षात घेऊन त्या दृष्टिकोनातून या संकल्पनेला सर्वतोपरी चालना देण्याचा प्रयत्न शासकीय पातळीवरून चाललेला आहे. यासंदर्भात बोलताना ‘आयसीएआर’/ ‘सीसीएआरआय’ मधील एका वैज्ञानिकाने सांगितले, की ग्रामीण भागांतील लोकांना व्यवसायाची नवीन क्षेत्रे पादाक्रांत करण्याच्या संदर्भात सरकारचा हा उपक्रम साक्षात गुरुकिल्ली ठरणार आहे. त्यायोगे त्यांच्या आर्थिक आर्थिक परिस्थितीत कमालीची सुधारणा होणार आहे. इतरही संबंधित समाजघटकांना आर्थिक सुबत्ता प्राप्त होणार असून, त्यांच्या दैनंदिन जीवनात बरकत प्राप्त होईल.

गोवा विधानसभा अधिवेशन : विरोधकांच्या कोळसा आमका नाकाच्या घोषणा

‘ॲग्रो-इको टूरिझम’ या संकल्पनेनुसार, गोवा राज्याला भेट देणाऱ्या पर्यटकांना तसेच अन्य लोकांनाही विविध नावीन्यपूर्ण सेवा देण्यात येतील. त्याचबरोबरच, स्थानिक नागरिकांना रोजगाराच्या विपुल संधी उपलब्ध देणे हा दृष्टिकोन आहे. वाहतूकव्यवस्था, खाद्यजिन्नस आणि भोजनाची आस्थापने, पर्यटकांसाठी मार्गदर्शक अर्थांत गाइड्‍स तसेच क्षेत्रीय पर्यटनाबाबत टूर्सचे आयोजक इत्यादींच्या माध्यमातून हा रोजगार गोमंतकीयांना प्राप्त होणे शक्य आहे.
जैवविविधता आणि संशोधन केंद्रासाठी ‘आयसीएआर’ हे एक महाकेंद्रच ठरणार आहे. त्याशिवाय, कृषी क्षेत्रातील पिके, पशुपालन, मत्स्यपालन आणि तत्सम क्षेत्रात ‘ॲग्रो-इको टूरिझम’ ही संकल्पना साहाय्यभूत ठरणार आहेच. तसेच, पर्यावरणातील एकंदर वनस्पती, प्राणिमात्र आणि नैसर्गिक साधनसंपत्तीचे रक्षणही अप्रत्यक्षपणे होणार आहे.

मतदार राजा..जागा हो ! मतदारांना जागविणारा ‘मतदार दिन’ 

‘ॲग्रो-इको टूरिझम’च्या माध्यमातून कृषी व पर्यटन क्षेत्र आणि कृषीविषयक व्यापार-उदिम यांच्या समन्वयाचे प्रतीकात्मक सुसंघटन ठरणार आहे. त्यायोगे शेतकरीवर्गाला अतिरिक्त अर्थिक उत्पन्न प्राप्त होण्याची अपेक्षा आहे. संबंधित भागाचे संवर्धन होण्याबरोबरच सर्वांगीण विकासही त्यायोगे अभिप्रेत आहे.

पर्यटकांसाठी विविध आकर्षणे!

जुने गोवे येथील ‘आयसीएआर’ तथा ‘सीसीएआरआय’मध्ये पक्षी, प्राणी, कृषिद्योग, पिकांसंदर्भातील बासष्ट जाती-प्रजातींची जैवविविधता, ससेपालन, शोभिवंत तथा आकर्षक पोल्ट्री प्रकल्प, मत्स्यपालन, कृमिकीटकयुक्त सेंद्रीय खत प्रकल्प, मधुमक्षिका पालन उपक्रम, तसेच वैद्यकीक तथा सुगंधी वनस्पतींच्या 82 प्रजातींची माहिती अशी प्रेक्षणीय स्थळे पर्यटकांना उपलब्ध करण्याचा विचार आहे. तसेच, खेकड्यांच्या व माशांच्या साहाय्याने वैद्यकीय उपचार, नर्सरीसंदर्भातली उपक्रम, झाडावर चढणे, वनस्पती रोपणाच्या पद्धती, मसाले आणि फुले यांच्यासंदर्भातील वंशवृद्धीच्या बाबतीत अनुभव-अनुभूती पर्यटकांना प्राप्त होणार आहे. खरेदीची सुविधाही पर्यटकांना उपलब्ध करून दिली जाईल. त्याअंतर्गत कृषी उत्पादनांची विक्री, काजूबिया, सफरचंद इत्यादी प्रक्रिया केलेल्या कृषी उत्पादनांची विक्री, आयस्क्रीमप्रधान उत्पादने, नारळाचे शुद्ध तेल, कोकम सरबत, ताजी अंडी, पोल्ट्रीमधील पक्षी, नर्सरीमधील वनस्पती, वैद्यकीय तथा संगंधी वनस्पती यांची विक्री केली जाईल.

संबंधित बातम्या