‘भारत बंद’चा गोव्यात उडाला फज्जा; विरोधकांचे आझाद मैदानावर धरणे

दैनिक गोमन्तक
बुधवार, 9 डिसेंबर 2020

जिल्हा पंचायत निवडणुकीच्या तोंडावरील आजच्या बंदला सर्व विरोधी पक्षांनी पाठिंबा देऊनही तो यशस्वी झाला नाही.

पणजी: जिल्हा पंचायत निवडणुकीच्या तोंडावरील आजच्या बंदला सर्व विरोधी पक्षांनी पाठिंबा देऊनही तो यशस्वी झाला नाही. राज्यातील जनतेचा भाजपच्या सरकारवर पूर्ण विश्वास आहे, ते बंदमध्ये सहभागी होणार नाहीत, असे भाजपचे नेते बंदपूर्वी सांगत होते. त्यावर आज जणू शिक्कामोर्तब झाले. विरोधी पक्ष, इतर संघटनांनी बंदला पाठिंबा देत केवळ आझाद मैदानावर धरणे धरले. त्यांनी बंद यशस्वी होण्यासाठी जाहीरपणे आवाहने आज केली असे दिसून आले नाही.

शेतकऱ्यांनी दिल्लीत चालवलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पुकारलेल्या देशव्यापी बंदला आज राज्यात जराही प्रतिसाद मिळाला नाही. जनजीवनावर बंदचा कोणताही प्रभाव जाणवला नाही. सर्व व्यवहार सुरळीत होते. सर्व पक्ष संघटनांनी आज येथील आझाद मैदानावर धरणे आंदोलन केले. कावरे येथे सकाळी दोन तास गाकुवेधनने खनिज वाहतूक रोखली होती, तर रात्री म्हापशात मेणबत्ती मोर्चा काढण्यात आला. त्याव्यतिरिक्त सर्वकाही नियमितपणे सुरू होते.

येत्या शनिवारी जिल्हा पंचायत मतदान असल्याने आणि या बंदच्या निमित्ताने सर्व विरोधी पक्ष एकत्र आल्याचे चित्र असल्याने बंदचा प्रभाव जाणवेल असे वाटत होते, मात्र मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी केलेल्या दाव्याप्रमाणे बंद जाणवलाच नाही.

गावडा - कुणबी - वेळीप - धनगर (गोकुवेध) महासंघाच्या केपे विभागाच्या कार्यकर्त्यांनी कावरे-केपे येथे खनिज वाहतूक करणाऱ्या ट्रकांना दोन तास रोखून धरले. ‘भारत बंद’ला, ‘कावरे आदिवासी बचाव समितीचा भारतीय शेतकऱ्यांना पाठिंबा’, ‘शेतकरी विरोधी कायदा मागे घ्या,’ अशा घोषणा देणारे फलक ‘गाकुवेध’च्या कार्यकर्त्यांनी हाती धरले होते. दोन तास रोखून धरलेल्या खनिजवाहू ट्रकांना नंतर सोडण्यात आले.  शेतकऱ्यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी तसेच केंद्र सरकारने संमत केलेल्या शेतकऱ्यांच्या विरोधातील अधिनियमांना विरोध दर्शवण्यासाठी बोडगेश्वर शेतकरी संघ, कामरखाजन टेनंट असोसिएशन आणि कुळ-मुंडकार संघर्ष समितीच्या संयुक्त विद्यमाने म्हापशात मेणबत्ती मोर्चा काढण्यात आला.

बंदला पेडणे तालुक्यात आज कोणताही परिणाम जाणवला नाही. फोंडा तालुक्‍यात भारत बंदचा परिणाम जाणवला नाही. गोव्यात कोळसा नको संघटने’ने मडगावात पदयात्रा काढून कृषी कायद्यांविरोधात पुकारण्यात आलेल्या भारत बंदला पाठिंबा दिला. ‘गावडा - कुणबी - वेळीप - धनगर’ (गाकुवेध) संघटनेच्या केपे विभागाचे कार्यकर्तेही यात सहभागी झाले. मडगावात आज सकाळपासून दैनंदिन व्यवहार नियमितपणे सुरू राहिले. म्हापसा शहरात तसेच बार्देश तालुक्यातही पूर्णत: अयशस्वी झाला.म्हापसा बाजारपेठ तर पूर्णत: खुली होती. 

शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढीसाठी हे तीन कायदे केले आहेत. हे जनतेला पटले आहे. त्याचमुळे जनतेने बंदला झुगारून दिले. गोव्यातील तमाम जनतेचे या निर्णयाबद्दल अभिनंदन.
- डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

विरोधी पक्षांनी पाठिंबा दिलेल्या बंदचा राज्यात फज्जा उडाला. जनतेचा भाजपवर विश्वास आहे हेही सिद्ध झाले. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी हे कायदे आहेत हेही शेतकऱ्यांना पटले आहे.
- सदानंद शेट तानावडे, भाजप प्रदेशाध्यक्ष.

संबंधित बातम्या