महसूल गुप्तचर विभागाकडून मुरगाव बंदरातील २४ कंटेनर जप्त

प्रतिनिधी
गुरुवार, 3 सप्टेंबर 2020

विदेशात नैसर्गिक दगड निर्यात करण्यात येत आहे, असे खोटे नमूद करून नैसर्गिक गार्नेट निर्यात करण्यासाठी मुरगाव बंदरात आणून ठेवलेले २४ कंटेनर महसूल गुप्तचर संचालनालयाच्या गोवा विभागाने जप्त केले.

मुरगाव: विदेशात नैसर्गिक दगड निर्यात करण्यात येत आहे, असे खोटे नमूद करून नैसर्गिक गार्नेट निर्यात करण्यासाठी मुरगाव बंदरात आणून ठेवलेले २४ कंटेनर महसूल गुप्तचर संचालनालयाच्या गोवा विभागाने जप्त केले.

आयात-निर्यात व्यवसाय करणाऱ्या मे. आर्यन माईन्स ॲण्ड मिनरल्स कंपनीमार्फत नैसर्गिक गार्नेट निर्यात करण्यासाठी २४ कंटेनर एमपीटीच्या यार्डमध्ये आणून ठेवले होते. याची शहानिशा केल्यानंतर गार्नेट ऐवजी ३०-६० आकाराचे नैसर्गिक दगड या कंटेनरमध्ये असल्याचे महसूल गुप्तचर संचालनालयाच्या अधिकाऱ्यांना आढळून आले. निर्यात करण्यात येणाऱ्या मालाची खोटी माहिती देऊन २४ कंटेनर मधून नैसर्गिक गार्नेट निर्यात करण्यात येणार होते. त्यापूर्वीच महसूल गुप्तचर संचालनालयाने कारवाई करून ते सर्व कंटेनर जप्त केले आहेत.

नैसर्गिक दगड निर्यात करण्याची परवानगी इंडियन रेअर अर्थ लिमिटेड (आयआरईएल) या कंपनीला आहे. पण, मे. आर्यन माईन्स ॲण्ड मिनरल्स ही कंपनी अवैधरित्या नैसर्गिक दगडाची निर्यात करण्याच्या तयारीत असताना महसूल गुप्तचर संचालनालयाने कारवाई करुन भांडाफोड केली.

मुरगाव बंदरातून अवैधरित्या खनिज निर्यात करण्याचा प्रकारही यापूर्वी घडलेला आहे. पण, कोणावरच कारवाई झालेली नाही. पाकिस्तानमधून आणलेला नाफ्ता मुरगाव बंदरात उतरविण्याचाही प्रकार गेल्या वर्षी घडला. हे प्रकरणही दडपण्यात आले. यात मोठे राजकारणी गुंतल्याचा आरोप करण्यात आला होता.

एमपीटीच्या वाहतूक विभागातून माल हाताळण्याच्या बाबतीत हयगय केली जात आहे, असे प्रकार अनेक वेळा घडत आहे. ‘न्यू शी नलिनी’ जहाज प्रकरणही एमपीटीच्या घोडचुकीमुळे देशभर गाजले होते. ही गोष्ट ताजी असतानाच बुधवारी अवैध मालाची निर्यात करण्यासाठी आणलेले कंटेनर महसूल गुप्तचर संचालनालयाने जप्त केल्याने एमपीटीच्या बे-कारभाराची चिरफाड झाली आहे.

सध्या अभिनेता सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात आंतरराष्ट्रीय ड्रग्स व्यवहाराचे संबंध जुळले जात आहे. हे ड्रग्स जहाजातून भारतात आयात केले जात असावे, असा संशय निर्माण झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर बंदरातील आयात निर्यात करणाऱ्या कंटेनरची बारकाईने तपासणी केली जात आहे. मुरगाव बंदरातून परदेशात निर्यात करण्यासाठी आणून ठेवलेल्या कंटेनरमध्ये नोंदणी केलेल्या मालाऐवजी भलताच माल भकून निर्यात केला जातो, हे या छाप्यातून उघड झाले आहे.

संबंधित बातम्या