साहसी पर्यटनाच्या पहिल्याच दिवशी नौदल अधिकाऱ्याने गमावले प्राण

गोमन्तक वृत्तसेवा
रविवार, 4 ऑक्टोबर 2020

आपल्या पत्नी आणि मुलांसह सहलीसाठी आलेला नौदलाचा कॅप्टन पॅरामोटरिंग करताना जवळपास 50 मीटर उंचावरून पाण्यात कोसळल्याने त्याचे अपघाती निधन झाले.

मडगाव: कारवारच्या प्रसिद्ध समुद्र किनाऱ्यावर सहा महिन्यांच्या बंदीनंतर काल साहसी पर्यटनाला सुरुवात झाली. मात्र, या पर्यटनाच्या पहिल्याच दिवशी अनर्थ घडला. आपल्या पत्नी आणि मुलांसह सहलीसाठी आलेला नौदलाचा कॅप्टन पॅरामोटरिंग करताना जवळपास 50 मीटर उंचावरून पाण्यात कोसळल्याने त्याचे अपघाती निधन झाले. वसंत मधुसूदन रेड्डी(५५) असे या अधिकाऱ्याचे नाव आहे.  

या दुर्घटनेने समाज माध्यमावरील चर्चेला उधाण आले आहे. अशा प्रकारच्या साहसी पर्यटनाला परवानगी आणि त्यातील  सुरक्षिततेबद्दल प्रश्नचिन्ह उभे करण्यात आले आहे. रेड्डी हे सी-बर्ड नौदल तळावर काम करत होते. ते मूळ बंगळुरू येथील असून, त्यांची पत्नी व मुले गावाहून कारवारला आल्याने शुक्रवारी असलेली सुट्टी साजरी करण्यासाठी ते कारवार समुद्र किनाऱ्यावर आले होते, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली. 

नुकतीच टाळेबंदीच्या पाचव्या टप्प्यातील शिथितला जाहीर झाली. यानंतर प्रथमच शुक्रवारी या किनाऱ्यावरील साहसी पर्यटन सुरू झाले होते. या किनाऱ्यावर सुरू झालेल्या या पॅरा मोटरींगचा आनंद घेण्यासाठी  रेड्डी यांनी चालकाबरोबर आकाशात झेप घेतली असता, वर मोटर बंद पडली. सुमारे 50 मीटर उंचीवरून ते पाण्यात कोसळले. त्यांना लगेचच किनाऱ्यावर आणले गेले. मात्र, यात त्यांचा मृत्यू झाला.
 

संबंधित बातम्या