नावशी मरिना प्रकल्प लोकांना नको तर रद्द ..मुख्यमंत्र्यांची बैठकीअंती ‘दिवाळी भेट’ 

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 14 नोव्हेंबर 2020

नावशी येथील मरिना प्रकल्प जर स्थानिकांना नको असेल तर तो त्यांच्यावर लादला जाणार नाही. या प्रकल्पासंदर्भातचा दस्तावेज मागवून घेऊन तो रद्द करण्यात येईल असे आश्‍वासन आज मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांताक्रुझचे आमदार फ्रांसिस सिल्वेरा व कुडका - बांबोळी - तळावली पंचायत मंडळाला दिले.

पणजी :  नावशी येथील मरिना प्रकल्प जर स्थानिकांना नको असेल तर तो त्यांच्यावर लादला जाणार नाही. या प्रकल्पासंदर्भातचा दस्तावेज मागवून घेऊन तो रद्द करण्यात येईल असे आश्‍वासन आज मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांताक्रुझचे आमदार फ्रांसिस सिल्वेरा व कुडका - बांबोळी - तळावली पंचायत मंडळाला दिले. त्यामुळे या प्रकल्पाविरोधातील आंदोलनाची तीव्रता कमी झाली आहे. मुख्यमंत्र्यांनी हा प्रकल्प रद्द करण्याचे बैठकीत स्पष्ट करून विरोधकांची हवाच काढून घेतली आहे व तेथील स्थानिकांना दिवाळी भेट दिली. 

गेल्या रविवारी (८ नोव्हेंबर) शिरदोण पंचायतीजवळ नावशी मरिना प्रकल्पाला जोरदार विरोध करण्यात आला होता. त्यावेळी उपस्थित असलेल्या स्थानिक आमदार फ्रांसिस सिल्वेरा यांना लोकांनी हा प्रकल्प रद्द करावा किंवा विरोधकांना पाठिंबा देण्यासाठी सरकारमधून बाहेर पडण्याचा पर्याय दिला होता. त्यानंतर गेल्या बुधवारी आमदार फ्रांसिस सिल्वेरा यांनी मुख्यमंत्र्यांना या प्रकल्पाला असलेला विरोध याची सविस्तर माहिती देऊन आज (१३ नोव्हेंबर) बैठक निश्‍चित केली होती.

त्यानुसार कुडका - बांबोळी - तळावली पचंयात मंडळाचे सदस्य, तसेच या प्रकल्पामुळे परिणाम होणाऱ्या इतर पंचायतींचे सरपंच तसेच सदस्यपंच व सांताक्रुझचे आमदार फ्रांसिस सिल्वेरा यांनी आज सकाळी आल्तिनो - पणजी येथील शासकीय बंगल्यावर मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक घेतली. या बैठकीवेळी नावशी प्रकल्पामुळे मोठा फटका बसणार असलेल्या कुडका - बांबोळी - तळावलीच्या पंचसदस्यांनी मुख्यमंत्र्यांकडे मुद्दे मांडले. मुख्यमंत्र्यांनी त्यांची बाजू ऐकून घेतल्यानंतर जर हा प्रकल्प लोकांच्या हिताविरोधात तसेच त्याचा मोठा फटका पर्यावरणाला होणार असल्यास तो रद्द 
केला जाईल. लोकांच्या हिताविरुद्ध हे सरकार नाही. त्यामुळे त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या मान्य केल्या जातील असे मुख्यमंत्र्यांनी या उपस्थितांना सांगितले.

संबंधित बातम्या