चीनला मागे रेटण्यासाठी नौदल सज्ज

अवित बगळे
शुक्रवार, 24 जुलै 2020

दाबोळीहून ‘मिग - २९ के’ झेपावली : क्षेपणास्र सज्जताही

पणजी

भारताकडे डोळे वटारून पाहणाऱ्या चीनने लडाखमध्ये काही आगळीक केली, तर त्याचा बंदोबस्त करण्यासाठी नौदलानेही महत्त्‍वाची भूमिका बजावणे सुरू केले आहे. दाबोळी येथील हंस नौदल तळावरून ‘मिग - २९ के’ या लढाऊ विमानांनी लडाखच्या दिशेने झेपावणे सुरू केले आहे. ‘विक्रमादित्य’ या विमानवाहू नौकेवर १८ ‘मिग - २९ के’ ही विमाने तैनात आहेत. त्याव्यतिरिक्त विमाने लडाखला पाठवण्यात येत आहेत.
लडाखच्या हवाई दलाच्या तळावर ही विमाने तैनात करण्यात येणार आहेत. रशियातून ‘मिग - २९’ची सुधारीत आवृत्ती असलेली ही लढाऊ विमाने खास नौदलाच्या गरजा लक्षात घेऊन तयार केली आहेत. ‘विक्रमादित्य’ या विमानवाहू नौकेवर ही विमाने तैनात असतात. या नौकेवर १८ विमाने ठेवता येत असली, तरी रशियाकडून ४० हून जास्त विमाने खरेदी करण्यात आली आहेत. दाबोळीच्या हंस नौदल तळावर ही विमाने असतात. सकाळी दाबोळी विमानतळाची धावपट्टी वापरून या लढाऊ विमानांचा सराव चालतो. भारतीय उपखंडापासून आफ्रिका खंडापर्यंत सागरी गस्त घालण्याची जबाबदारी हंस नौदल तळावर आहे. त्यासाठी या विमानांचा नियमितपणे वापर करण्यात येतो.

सुखोई, राफेलही दिमतीला...
लडाखमध्ये तैनात करण्यासाठी ‘सुखोई’ ही लढाऊ विमाने आहेत, त्या जोडीला नव्याने घेतली जाणारी राफेल लढाऊ विमानेही तैनात केली जाणार आहेत. मात्र, त्या दरम्यानच्या काळात काही घडलेच तर चीनला मागे रेटण्यासाठी नौदलाची ‘मिग - २९ के’ ही विमाने तेथे तैनात करण्याचे ठरवण्यात आले आणि दाबोळी येथील हंस नौदल तळावरून लडाखच्या दिशेने ही विमाने झेपावू लागली आहेत. इंदूर, बागडोगरा मार्गे ही विमाने लडाखला पोहोचू लागली आहेत. नौदलाचे वैमानिकच ती हाताळणार असून ही विमाने केवळ टेहाळणीसाठी नव्हे, तर हल्ल्यासाठी वापरण्यासाठी क्षेपणास्त्र सज्ज ठेवण्यात आली आहेत.

संबंधित बातम्या