ड्रग्जपुरवठा प्रकरणी एफ. अहमद अटकेत; एनसीबीची कारवाई

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 2 सप्टेंबर 2020

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने मुंबई व दिल्ली येथे अमेरिका व कॅनडा येथून आयात केलेला मारीज्युना (बड) नावाचा अमलीपदार्थ जप्त केला. या चौकशीत संशयित एफ. अहमद याचे नाव समोर आले होते.

पणजी: मुंबई व दिल्ली येथे सुमारे १ कोटी ७० लाख रुपये किमतीचे जप्त केलेल्या अमली पदार्थांच्या बेकायदा पुरवठा प्रकरणाशी लागेबांधे असलेल्या व कळंगुट येथील एका नामांकित रिसॉर्टचा चालक असलेल्या एफ. अहमद याला नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या (एनसीबी) पथकाने अटक केली. 

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने मुंबई व दिल्ली येथे अमेरिका व कॅनडा येथून आयात केलेला मारीज्युना (बड) नावाचा अमलीपदार्थ जप्त केला. या चौकशीत संशयित एफ. अहमद याचे नाव समोर आले होते. तो गोव्यातील कळंगुटमधील असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली. 

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने केलेल्या चौकशीत संशयित एफ. अहमद हा अमलीपदार्थ बंगळुरूला पुरवठा करत होता. हा अमलीपदार्थ दिल्ली येथून मुंबईला व मुंबईहून गोव्यात पुरवठा करण्यात येणार होता. त्यापूर्वीच तो दिल्ली येथील पोस्टाने आलेल्या सामानातून जप्त करण्यात आला होता. जप्त करण्यात आलेल्या साडेतीन किलो मारिज्युना (बड) या अमलीपदार्थाची किंमत आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये सुमारे १ कोटी ७० लाख रुपये आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या पथकाने बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या गूढ मृत्यूप्रकरणी  अमलीपदार्थ पुरवठादार असलेल्या हणजूण येथील हॉटेल व्यावसायिकाच्या चौकशीसाठी आले होते मात्र तो सापडला नव्हता. त्यामुळे या प्रकरणाशी संशयित एफ. अहमद याचा संबंध आहे का या दृष्टिकोनातूनही चौकशी सुरू करण्यात आली आहे.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या