‘राष्ट्रवादी’चे प्रफुल्ल पटेल आज गोव्यात

गोमन्तक वृत्तसेवा
रविवार, 22 नोव्हेंबर 2020

राज्याच्या राजकारणात महत्त्वाची खेळी खेळण्याची चुणूक दाखवलेले राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल आज गोव्यात येणार आहे.

पणजी :  राज्याच्या राजकारणात महत्त्वाची खेळी खेळण्याची चुणूक दाखवलेले राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल आज गोव्यात येणार आहे. प्रसंगी आम्ही स्वबळावर लढू शकतो, असे त्यांनी मागील गोवा दौऱ्यात जाहीर करताच दोनच दिवसात कॉंग्रेसच्या नेत्यांनी पक्षाध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. सत्ताधारी भाजपमधील मंत्री व आमदार राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये जाण्यास इच्छूक असल्याची चर्चा असून त्याचा जाहीरपणे कोणीही आजवर इन्कार केलेला नाही.

विधानसभेत सध्या चर्चिल आलेमाव हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे एकमेव आमदार आहेत. त्यांचा प्रयत्न कॉंग्रेस आणि मगोतून भाजपमध्ये गेलेल्या आणि सध्या अपात्रता याचिकेची टांगती तलवार डोक्यावर असलेल्या १२ आमदार, मंत्र्यांपैकी काही जणांना तसेच भाजपमध्ये असूनही अस्वस्थ असणाऱ्यांना राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे वळवण्याचा आहे. आलेमाव यांच्या म्हणण्यानुसार कॉंग्रेसमध्येही एक गट असंतृष्ट असून तो राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे वळू शकतो. पटेल यांच्या मागील दौऱ्यात त्यांची काही जणांनी भेट घेतली होती, तर काही जणांनी दूरध्वनीवर चर्चा केली होती. त्यांची भेट घेणाऱ्यांत कॉंग्रेसमधून भाजपमध्ये गेलेल्या एका प्रमुख आमदाराचा समावेश होता त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे विधानसभा निवडणुकीआधी वजनदार नेते असतील असे दिसते. त्यामुळे पटेल यांनी विधानसभा निवडणुकीनंतर गोव्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस सत्तेत असेल असे विधान केले आहे. मागील विधानसभा निवडणुकीवेळी कॉंग्रेसने योग्य अशा जागा न दिल्यामुळे त्यांच्याशी राष्ट्रवादी कॉंग्रेसची आघाडी झाली नव्हती. कॉंग्रेसला त्यावेळी १७ तर राष्ट्रवादी कॉंग्रेसला एक जागा मिळाली होती. हे दोन्ही पक्ष एकत्र लढले असते, तर ४० जागांच्या विधानसभेत २१ हा बहुमताचा आकडा या पक्षांना गाठता आला असता.

राष्ट्रवादीच्या कार्यालयाचे आज पणजीत उद्‌घाटन
पणजी मार्केट परिसरात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नव्या कार्यालयाचे उद्‍घाटन उद्या (ता.२२) दुपारी साडेतीन वाजता प्रफुल्ल पटेल यांच्या हस्ते होणार आहे अशी माहिती प्रदेशाध्यक्ष जुझे फिलीप डिसोझा यांनी दिली. त्यांनी सांगितले, कार्यालयाच्या उद्‍घाटनानंतर आझाद मैदानावर कार्यकर्ता मेळावा होणार आहे. पक्षाध्यक्ष शरद पवारही लवकरच गोव्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्याशी चर्चा करूनच नंतर पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम जाहीर केला जाणार आहे. 

अधिक वाचा : 

पणजीत काँग्रेस नेत्यांची मध्यरात्री धरपकड! 

गोव्यातील समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांची गर्दी ; सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे उल्लंघन

कोळसा हाताळणी घटल्यास मुरगाव बंदरातील कामगारांवर स्वेच्छा निवृत्तीची टांगती तलवार 

 

संबंधित बातम्या