'मतांचे विभाजन टाळण्यासाठी काँग्रेस आणि समविचारी पक्षांशी आघाडी करू'

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 20 नोव्हेंबर 2020

गोव्यात पक्षविस्ताराकडे अधिक लक्ष घालण्यासाठी महाराष्ट्रातील १३ मंत्री राज्यात विशेष लक्ष देणार असल्याचीही माहिती पक्ष निरीक्षक वर्मा यांनी यावेळी दिली. 

पणजी- धर्मनिरपेक्ष मतांचे विभाजन टाळण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेस आणि अन्य समविचारी पक्षांबरोबर आघाडी करण्यास तयार असल्याचे मत पक्षाचे गोव्यातील निरीक्षक नरेंद्र वर्मा यांनी व्यक्त केले. पणजीत आयोजित एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जोसेफ फिलिप डिसूझा आणि बेनौलीचे आमदार चर्चिल अलेमाव उपस्थित होते. 

गोव्यात पक्षविस्ताराकडे अधिक लक्ष घालण्यासाठी महाराष्ट्रातील १३ मंत्री राज्यात विशेष लक्ष देणार असल्याचीही माहिती पक्ष निरीक्षक वर्मा यांनी यावेळी दिली. 
 
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा गोव्यात विस्तार करण्याच्या हेतूने आणि सत्ताधारी भाजपला ठोस पर्याय देण्यासाठी राष्ट्रवादीने हालचाली सुरू केल्या आहेत. त्यांनी काँग्रेस आणि समविचारी पक्षांबरोबर जाण्याची तयारी दर्शवल्याने आगामी काळात राज्यातील राजकीय समीकरणे बदलतील. २०१७ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने भाजपला घाम फोडला होता. ४० जागांपैकी १७ जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या काँग्रेसला मात्र, तेथे सत्तेची घडी बसवता आली नव्हती. मात्र, आता राष्ट्रवादी काँग्रेस अधिक सक्रिय झाल्यास राज्यात आघाडीची सत्ता आल्यास नवल वाटायला नको.
   
नव्याने पक्षबांधणी करण्यासाठी भाजपचा बालेकिल्ला असलेले मतदारसंघ भेदण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पुढे सरसावला असून लागूनच असलेल्या महाराष्ट्रातील सत्ताधारी असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला यासाठी महाराष्ट्रातूनही बळ मिळेल. शिवाय आकड्यांच्या स्पर्धेत जिंकूनही सत्तेची गणिते जुळवता येत नसलेल्या काँग्रेससाठीही राष्ट्रवादी मोठा आधार असेल.  
  

संबंधित बातम्या