२२ नोव्हेंबरला राष्ट्रवादी करणार शक्तीप्रदर्शन

गोमन्तक वृत्तसेवा
रविवार, 8 नोव्हेंबर 2020

राष्ट्रवादी कॉंग्रेस आपल्या नव्या प्रदेश कार्यालयाच्या उद्‍घाटनाच्या निमित्ताने २२ नोव्हेंबर रोजी शक्तीप्रदर्शन करणार आहे. याचे नियोजन प्रदेशाध्यक्ष जुझे फिलीप डिसोझा यांनी राज्य कार्यकारीणीची बैठक घेऊन केले. बैठकीस आमदार चर्चिल आलेमावही उपस्थित  होते.

पणजी : राष्ट्रवादी कॉंग्रेस आपल्या नव्या प्रदेश कार्यालयाच्या उद्‍घाटनाच्या निमित्ताने २२ नोव्हेंबर रोजी शक्तीप्रदर्शन करणार आहे. याचे नियोजन प्रदेशाध्यक्ष जुझे फिलीप डिसोझा यांनी राज्य कार्यकारीणीची बैठक घेऊन केले. बैठकीस आमदार चर्चिल आलेमावही उपस्थित  होते.

पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी या कार्यालयाच्या उद्‍घाटनासाठी गोव्यात आपण येणार असल्याचे याअगोदरच जाहीर केले आहे. पणजी मार्केट परिसरात असलेल्या  या कार्यालयात सध्या विविध पदाधिकाऱ्यांसाठी कक्षांची निर्मिती, बैठक कक्ष बैठक व्यवस्था आदी कामे सध्या सुरु आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये जाण्यासाठी अनेक नेते उत्सुक आहेत. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे महाराष्ट्रातील राजकारणाप्रमाणे गोव्यातही विरोधकांची मोट बांधतील असे काही नेत्यांना वाटते. त्यापैकी काहींनी सदिच्छा भेटीच्या नावाखाली त्यांची भेट घेऊन राजकीय वातावरणाची माहिती त्यांना दिली आहे.

पटेल हे गोव्यात असताना आमदार आलेमाव यांच्या पुढाकाराने काही आमदारांनी त्यांच्याशी संपर्क साधून संभाव्य पक्ष प्रवेशाची चाचपणी केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार सत्ताधाऱ्यांपैकी महत्वाकांक्षी नेत्यांना आपली राजकीय कारकिर्द बहारदार करण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये संधी मिळू शकते, राज्याचे नेतृत्व करण्याची संधी मिळू शकते असे वाटते. दिगंबर कामत यांच्या मंत्रिमंडळात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कोट्यातून मंत्रीपद मिळवलेल्या या नेत्याची ही छुपी महत्वाकांक्षा आता दडून राहिलेली नाही.  

त्यामुळे राज्याच्या राजकारणात राष्ट्रवादी कॉंग्रेस महत्वाची भूमिका बजावणार असल्याने या पक्षाची धुरा आपल्या हाती असावी यासाठी अनेकजण इच्छूक आहेत. त्यासाठी हे नेते कार्यकर्त्यांची जमवाजमव करत असून २२ रोजी पटेल यांच्यासमोर शक्तीप्रदर्शन करण्याची तयारी ते करत आहेत. आझाद मैदानावर नेते, कार्यकर्त्यांनी एकत्र जमावे व तेथून फेरी काढून कार्यालयाच्या ठिकाणी पायी जावे असे नियोजन करण्यात आले आहे. यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसने पक्ष संघटनात्मक पातळीवर राज्यात पुन्हा काम सुरु केल्याचा संदेश राज्यभरात जाईल असा विचार या आयोजनामागे आहे. याची पूर्वतयारी करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष डिसोझा यांनी राज्य कार्यकारीणीची बैठक घेत नियोजन केले आहे.

संबंधित बातम्या