काँग्रेसचे आमदार रेजिनाल्ड यांना राष्ट्रवादी काँग्रेसची ‘ऑफर’

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 20 ऑक्टोबर 2020

रेजिनाल्ड हे २००७ पासून सलग तीनवेळा कुडतरीतून निवडून आले आहेत. तळागाळात काम करणारे व जनतेच्या प्रश्नावर आवाज उठवणारे नेते अशी त्यांची प्रतिमा आहे.

मडगाव- काँग्रेसचे कुडतरीचे आमदार रेजिनाल्ड लॉरेन्स यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून प्रदेशाध्यक्षपदाची ‘ऑफर’ देण्यात आली आहे. आम आदमी पार्टी (आप) नेही त्यांच्याशी संपर्क साधला आहे. तथापि, रेजिनाल्ड यांनी या प्रस्तावांना तूर्त कोणताही प्रतिसाद दिलेला नाही. 

रेजिनाल्ड हे २००७ पासून सलग तीनवेळा कुडतरीतून निवडून आले आहेत. तळागाळात काम करणारे व जनतेच्या प्रश्नावर आवाज उठवणारे नेते अशी त्यांची प्रतिमा आहे. तथापि, काँग्रेसमध्ये आपली उपेक्षा होत असल्याची त्यांची भावना असून ही भावना त्यांनी अनेकवेळा उघड केलेली आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेस गोव्यात राजकीय विस्ताराची तयारी करत असून या पक्षाकडून तरुण नेत्याचा शोध सुरू आहे. या अनुषंगाने अलिकडेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी रेजिनाल्ड यांची भेट घेऊन त्यांना पक्षात येण्याची व प्रदेशाध्यक्षपद स्वीकारण्याची ऑफर दिली. आम आदमी पार्टीच्या (आप) नेत्यांनीही त्यांच्याशी संपर्क साधला आहे. 

रेजिनाल्ड यांनी दक्षिण गोव्याचे विद्यमान खासदार फ्रान्सिस सार्दीन यांचा २००७ मध्ये कुडतरीत पराभव केला होता. ही निवडणूक रेजिनाल्ड यांनी सेव्ह गोवा पक्षातर्फे (चर्चिल आलेमाव यांच्या नेतृत्वाखालील)  लढवली होती. या निवडणुकीनंतर सेव्ह गोवा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होऊन आलेमाव व रेजानाल्ड काँग्रेसवासी बनले होते. आलेमाव यांनी मध्यंतरी काँग्रेसची साथ सोडली व ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले, तर रेजिनाल्ड गेली १३ वर्षे काँग्रेसशी एकनिष्ठ राहिले. 
 

संबंधित बातम्या